Three major turning points of India’s victory : टी-२० विश्वचषक २०२४ मधील १९वा सामना रविवारी कट्टर प्रतिस्पिर्धी भारत-पाकिस्तान यांच्यात पार पडला. या रोमांचक सामन्यात भारताने पाकिस्तानचा ६ धावांनी धुव्वा उडवत आपले वर्चस्व कायम राखले. या सामन्यात नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघ ११९ धावांत गारद झाला. यानंतर १२० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायला उतरलेल्या पाकिस्तान संघाला भारताच्या गोलंदाजांनी ११३ धावांवर गारद विजयावर शिक्कामोर्तब केला. या रोमांचक झालेल्या सामन्यात टीम इंडियाच्या विजयाचे ३ मोठे महत्त्वाचे टर्निंग पॉइंट होते, अन्यथा पाकिस्तान संघाने भारतीय संघाला जवळपास पराभवाची धुळ चारलीच होती. चला तर मग ते ३ मोठे टर्निंग पॉइंट होते, जाणून घेऊया.
१. ऋषभ पंतची ४२ धावांची महत्त्वपूर्ण खेळी –
ऋषभ पंतने पाकिस्तानविरुद्धच्या टी-२० विश्वचषकातील दबावाच्या सामन्यात ४२ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. ऋषभ पंतच्या ४२ धावांच्या या अनमोल खेळीने अखेर टीम इंडियाच्या विजयात निर्णायक भूमिका बजावली. ऋषभ पंतने ही अवघड खेळी अशा वेळी खेळली, जेव्हा टीम इंडियाच्या विकेट एका टोकाकडून एका पाठोपाठ सतत पडत होत्या. ऋषभ पंतने अक्षर पटेलसह (२०) तिसऱ्या विकेटसाठी ३९ धावांची भागीदारी केली. अक्षर पटेल बाद झाल्यानंतरही ऋषभ पंतने एक टोक सांभाळत धावा केल्या. ऋषभ पंतच्या या महत्त्वपूर्ण खेळीमुळे भारतीय संघाला ११९ धावांपर्यंत मजल मारता आली. ऋषभ पंतने ४२ धावा केल्या नसत्या तर भारताला हा सामना गमवावा लागला असता.
२. बुमराह महत्त्वाच्या ३ विकेट्स घेत ठरला खरा ‘गेमचेंजर’
जसप्रीत बुमराहने भारताला पाकिस्तानविरुद्धच्या नीचांकी धावसंख्येच्या सामन्यात विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. भारताचा धडाकेबाज वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने पाकिस्तानविरुद्धच्या टी-२० विश्वचषकाच्या सामन्यात जगाला दाखवून दिले की तो जगातील सर्वोत्तम गोलंदाजांपैकी का आहे. या सामन्यात जसप्रीत बुमराहने पाकिस्तानचा खतरनाक फलंदाज मोहम्मद रिझवान (३१), कर्णधार बाबर आझम (१३) आणि इफ्तिखार अहमद (५) यांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. त्याचबरोबर बुमराहने आपल्या स्पेलमध्ये फक्त १३ धावांच खर्च केल्या. बुमराहने पाकिस्तानच्या या तीन महत्त्वाच्या विकेट्स घेतल्या नसत्या तर भारत हा सामना जिंकू शकला असता. त्यामुळे भारतासाठी खरा ‘गेमचेंजर’ जसप्रीत बुमराह ठरला.
३. कमी धावसंख्येच्या सामन्यांमध्ये रोहितचा आक्रमक कर्णधार
पाकिस्तानविरुद्धच्या या कमी धावसंख्येच्या सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारतीय संघाचा डाव १९ षटकांत ११९ धावांवर आटोपला. पाकिस्तान हा सामना सहज जिंकेल असे वाटत होते, पण रोहित शर्माने हार मानली नाही. कमी धावसंख्येच्या सामन्यातही रोहित शर्माने आपल्या आक्रमक नेतृत्त्व शैलीने हरलेल्या सामन्याचे विजयात रूपांतर केले. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे रोहित शर्माने आपल्या वेगवान गोलंदाजांवर विश्वास दाखवला. जसप्रीत बुमराह, हार्दिक पंड्या आणि अर्शदीप सिंग यांनी रोहित शर्माच्या या विश्वासाला तडा जाऊ दिला नाही. या सामन्यात जसप्रीत बुमराहने तीन, हार्दिक पंड्याने दोन आणि अर्शदीप सिंगने एक विकेट घेतली. रोहित शर्माने चतुराईने आपल्या गोलंदाजांना त्यांची षटके पूर्ण करायला लावली आणि मैदानात बदल केले.
हेही वाचा – IND vs PAK : भारताविरुद्धच्या पराभवानंतर नसीम शाहला अश्रू अनावर, रोहित शर्माने दिला धीर, पाहा VIDEO
टीम इंडियाने सर्वात लहान धावसंख्येचा केला यशस्वी बचाव –
टी-२० विश्वचषकात भारताने सर्वात लहान धावसंख्येचा यशस्वी बचाव केला आहे. या बाबतीत भारताने श्रीलंकेची बरोबरी केली. दोघांनी १२० धावांच्या लक्ष्याचा बचाव केला आहे. श्रीलंकेने २०१४ च्या टी-२० विश्वचषकात चितगाव येथे न्यूझीलंडविरुद्ध अशी कामगिरी केली होती. त्याच वेळी, भारतीय संघाने टी-२० मध्ये यशस्वी बचाव केलेली ही सर्वात लाहन धावसंख्या आहे. यापूर्वी टीम इंडियाने २०१६ मध्ये हरारे येथे झिम्बाब्वेसमोर १३९ धावांच्या लक्ष्याचा बचाव केला होता.