टी२० विश्वचषकाच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात अत्यंत खराब प्रदर्शन करून भारत या स्पर्धेतून बाहेर पडला. यानंतर भारतीय संघावर सर्वच स्तरातून टीका केली जात आहे. तसेच संघाचे प्रदर्शन आणि रोहित शर्माची कप्तानी यावरूनही अनेक प्रश्न उभे राहिले आहेत. यादरम्यान, पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शोएब अख्तरने भारतीय संघाची कठोर शब्दात निंदा केली आहे. त्याने म्हटलंय की भारतीय संघ या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात जाण्याच्या लायकच नव्हता.
शोएबने काल १० नोव्हेंबरला ट्विटरवर एक व्हिडीओ शेअर केला होता. त्यामध्ये त्याने भारतीय संघाची निंदा केली आहे. तो म्हणाला की हा अतिशय लज्जास्पद पराभव आहे. भारतीय संघने खूपच निराशाजनक प्रदर्शन केले. यानंतर ते हरण्याच्या आणि स्पर्धेतून बाहेर पाडण्याच्याच लायक होते. इंग्लंडने भारताला अतिशय वाईट पद्धतीने हरवले. भारताची गोलंदाजी अत्यंत वाईट होती. वेगवान गोलंदासाठी हा पीच उपयुक्त होता मात्र भारताकडे असा एकही वेगवान गोलंदाज नव्हता. भारताने चहलला का खेळवले नाही असा प्रश्नही त्याने यावेळी विचारला आहे. भारताची संघनिवड गोंधळलेली होती असेही तो म्हणाला.
घटस्फोटाच्या चर्चांवर सानिया मिर्झाचं शिक्कामोर्तब? म्हणाली, “तुटलेलं हृदय…”
अख्तरच्या म्हणण्यानुसार, बटलर आणि हेल्स यांच्या आक्रमक फलंदाजीनंतर भारताने सामना जिंकण्याच्या आशाच सोडून दिल्या होत्या. तो म्हणाला की भारतासाठी खरंच हा एक वाईट दिवस होता. नाणेफेक हरल्यानंतरच भारताचे मनोबल डगमगले होते. इंग्लंडच्या फलंदाजीच्या पहिल्या पाच षटकांमध्येच भारताने हात वर केले. निदान त्यांनी प्रयत्न तरी करायला हवे होते. मात्र या सामन्यात भारताने कोणत्याही प्रकारची आक्रमकता दाखवली नाही.
इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, जो त्यांच्यासाठी अतिशय फायदेशीर ठरला. भारतीय संघाचे फलंदाज चांगले प्रदर्शन करत नव्हते. तथापि, विराट कोहली आणि हार्दिक पंड्याने उत्कृष्ट प्रदर्शन करत अर्धशतक झळकावले. या दोघांमुळेच भारतीय संघ १६८ धावांपर्यंत मजल मारू शकला. मात्र इंग्लने कोणताही गडी बाद न होता हे लक्ष्य अगदी सहज साध्य केले.