Gautam Gambhir’s reaction on Rohit Virat T20I retirement : विराट कोहली-रोहित शर्मानंतर अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाने देखील टी-२० विश्वचषक २०२४ चे विजेतेपद जिंकल्यानंतर टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. टीम इंडियाचा माजी सलामीवीर आणि संघाचा मुख्य प्रशिक्षक होण्याच्या शर्यतीत आघाडीवर असलेल्या गौतम गंभीरने विराट कोहली आणि रोहित शर्माबाबत वक्तव्य केले आहे. गौतम गंभीर म्हणाला की, दोन्ही दिग्गज क्रिकेटपटूंनी भारतीय क्रिकेटसाठी खूप काही केले आहे.

बार्बाडोस येथे खेळल्या गेलेल्या टी-२० विश्वचषक २०२४ च्या अंतिम सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेचा सात धावांनी पराभव केला. अशा प्रकारे भारतीय संघाने दुसऱ्यांदा टी-२० विश्वचषकावर आपले नाव कोरले. यानंतर हिटमॅन रोहित शर्मा आणि स्टार फलंदाज विराट कोहलीने टी-२० क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. रोहित शर्माने आतापर्यंत १५९ टी-२० सामन्यात भारताचे प्रतिनिधित्व करताना ४२३१ धावा, तर विराट कोहलीने १२५ सामन्यात ४१८८ धावा केल्या आहेत. रोहित शर्मा देखील भारताचा सर्वात यशस्वी टी-२० कर्णधार बनला आहे. कारण भारतीय संघाने त्याच्या नेतृत्त्वाखावली ५० टी-२० सामने जिंकले आहेत आणि एक विश्वचषक देखील जिंकला आहे.

विराट-रोहितच्या निवृत्तीवर गौतम गंभीर काय म्हणाला?

विराट-रोहितच्या निवृत्तीवर पत्रकारांशी बोलताना गौतम गंभीर म्हणाला, “टी-२० विश्वचषक जिंकून कारकीर्दीला पूर्णविराम देण्यापेक्षा आणखी चांगले काय असू शकते. हे दोघेही महान खेळाडू असून त्यांनी भारतीय क्रिकेटसाठी खूप काही केले आहे. मी त्यांचे अभिनंदन करू इच्छितो. मला खात्री आहे की ते देश आणि संघाच्या यशात योगदान देत राहतील.” भारताच्या विजयावर गौतम गंभीर म्हणाला, “संपूर्ण देश खूप आनंदी आहे. माझ्याकडून रोहित शर्मा आणि संपूर्ण संघाचे अभिनंदन.”

हेही वाचा – Team India : भारताच्या टी-२० संघाचा पुढील कर्णधार कोण? रोहित शर्मानंतर ‘या’ तीन खेळाडूंची नावं आघाडीवर

विजेतेपदाच्या सामन्याबद्दल बोलायचे झाल्यास, विराट कोहलीच्या ७६ धावा आणि अक्षर पटेलच्या ४७ धावांच्या जोरावर भारतीय संघाने ७ गडी गमावून १७६ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेचा संघ १६९ धावा करू शकला आणि ७ धावांच्या फरकाने सामना गमावला. हेनरिच क्लासेनने संघाला विजयाकडे नेण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला, मात्र हार्दिक पंड्याने १७व्या षटकात त्याला बाद करून भारतीय संघात पुनरागमन केले. हार्दिकने शेवटच्या षटकात डेव्हिड मिलरलाही बाद केले. त्यामुळे तिथेच भारतीय संघाचा विजय निश्चित झाला.

Story img Loader