Dinesh Lad says Four friends along with Rohit Sharma ate 65 eggs : रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने टी-२० विश्वचषक २०२४ चे विजेतेपद पटकावले आहे. भारतीय संघाने दुसऱ्यांदा टी-२० विश्वचषक ट्रॉफी जिंकली आहे. टीम इंडियासाठी विराट कोहलीने अंतिम सामन्यात अर्धशतक झळकावले. तर जसप्रीत बुमराह आणि हार्दिक पंड्या यांनी अप्रतिम गोलंदाजी केली. या खेळाडूंमुळेच टीम इंडियाला तब्बल १७ वर्षांनंतर टी-२० विश्वचषक ट्रॉफी जिंकण्यात यश आले आहे. यानंतर कर्णधार रोहित शर्माने टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृतीची घोषणा केली. यावर आता त्याचे बालपणीचे कोच दिनेश लाड यांनी प्रतिक्रिया दिली.
रोहितने आपल्या प्रतिभेला न्याय दिला –
इंडिया टीव्हीशी बोलताना रोहित शर्माचे बालपणीचे प्रशिक्षक दिनेश लाड म्हणाले की, ‘ज्या १२ वर्षांच्या मुलाला मी पाहिले होते, आज त्याच्या हातात विश्वचषक पाहून खूप आनंद झाला आहे. पूर्वी तो ऑफ स्पिन गोलंदाजी करायचा पण जेव्हा मी त्याची फलंदाजी पाहिली तेव्हा मी त्याला फलंदाजी करण्यास प्रोत्साहन देऊ लागलो. रोहित शर्माकडे नेहमीच प्रतिभा होती, त्याने आपल्या प्रतिभेला न्याय दिला.’
रोहितची २०११ च्या विश्वचषकासाठी निवड झाली नव्हती –
दिनेश लाड पुढे म्हणाले की, ‘जेव्हा रोहित शर्माची २०११ च्या विश्वचषक संघात निवड झाली नाही, तेव्हा त्यांच्यासाठी हे खूप धक्कादायक होते. तेव्हा मी त्याला म्हणालो की जर तू क्रिकेटला वेळ दिला नाहीस तर सगळे तुला विसरतील. तेव्हा रोहितने सर तुम्हाला पुन्हा तक्रार करण्याची संधी देणार नाही, असे वचन दिले होते. त्या दिवसापासून आजपर्यंत रोहितचा आलेख सातत्याने वाढत आहे.’
प्रतिभा असेल तर तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल –
रोहित शर्माचे बालपणीचे प्रशिक्षक पुढे म्हणाले, ‘गरीब कुटुंबातील असण्याने काही फरक पडत नाही, तुमच्यात प्रतिभा असेल तर तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल, हे रोहितने सिद्ध केले. अथक परिश्रम करून त्यांनी हे यश मिळवले. चांगला खेळ करून देशाला गौरव मिळवून द्या, असे मी प्रत्येक वेळी सांगितले आहे. रोहितची निवृत्ती हा चांगला निर्णय आहे. नवीन खेळाडूंना संधी मिळाली पाहिजे. जागतिक कसोटी चॅम्पियनशिप हे त्याचे पुढील लक्ष्य आहे.’
हेही वाचा – भारताच्या विजयानंतर बोलताना बुमराह झाला भावुक, ‘अँकर’ पत्नीशी संवाद साधून होताच मारली मिठी, पाहा VIDEO
रोहितसह चार मुलांनी ६५ अंडी खाल्ली होती –
दिनेश लाड यांनी रोहित शर्माबद्दल पुढे बोलताना एक मजेशीर किस्सा ही सांगितला. ते म्हणाले, ‘२००७ मध्ये पहिल्यांदा टी-२० विश्वचषक जिंकल्यानंतर रोहित माझ्या घरी आला होता. त्यावेळी रोहितच्या घरी नॉनव्हेज बनवले जात नव्हते. त्यामुळे तो माझ्या घरी आला आणि म्हणाला, सर मला अंडी खायची आहेत. त्यावेळी रोहितसह एकूण चार मुलांनी ६५ अंडी खाल्ली होती. यावेळी मी १०० अंडी आणून माझ्या घरी ठेवतो, बघू रोहित किती अंडी खातो.’
© IE Online Media Services (P) Ltd