Three important turning points in India’s victory : टी-२० विश्वचषक २०२४ च्या दुसऱ्या उपांत्य फेरीत भारताने इंग्लंडचा ६८ धावांनी पराभव करत अंतिम फेरीतील आपले स्थान पक्के केले आहे. गयानाच्या प्रॉव्हिडन्स स्टेडियमवर नाणेफेक गमावल्यानंतर भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना १७१ धावा केल्या. याला प्रत्युत्तर देताना इंग्लंडचा संपूर्ण संघ १०३ धावांवर गडगडला. या सामन्यात रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादव यांनी फलंदाजीत टीम इंडियासाठी कमाल केली, तर गोलंदाजीत अक्षर पटेल आणि कुलदीपच्या फिरकीसमोर इंग्लिश फलंदाज लोटांगण घालताना दिसले. अशाप्रकारे, सामन्यात तीन टर्निंग पॉइंट्स आले ज्यामुळे संपूर्ण इंग्लंड संघ भारतासमोर नतमस्तक झाला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

१. रोहित-सूर्याची ७३ धावांची निर्णायक भागीदारी –

पावसाने व्यत्यय आणलेल्या सामन्यात रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादव यांनी फिरकी गोलंदाजांसाठी उपयुक्त असलेल्या खेळपट्टीवर शानदार फलंदाजी केली. या सामन्यात टीम इंडियाची पहिली विकेट अवघ्या १९ धावांवर पडली. यानंतर ऋषभ पंतही संघाचा ४० धावा असताना पॅव्हेलियनमध्ये परतला. अशा स्थितीत भारतीय संघाच्या अडचणी वाढल्या होत्या, पण त्यानंतर कठीण खेळपट्टीवर रोहित आणि सूर्यकुमार यादव यांनी उत्कृष्ट फलंदाजी करत ७३ धावांची भागीदारी केली. या भागीदारीमुळेच टीम इंडियाला १७१ धावांपर्यंत मजल मारता आली. टीम इंडियाकडून रोहित शर्माने ५७ आणि सूर्याने ४७ धावा केल्या.

२. कर्णधार रोहित शर्माचा मास्टर स्ट्रोक –

१७२ धावांच्या लक्ष्याचा बचाव करण्यासाठी टीम इंडिया मैदानात उतरली, तेव्हा इंग्लंडचे सलामीवीर जोस बटलर आणि फिल सॉल्ट यांनी पहिल्याच षटकापासूनच आपली ताकद दाखवायला सुरुवात केली होती. दोघेही मुक्तपणे फटके मारत होते, विशेषत: वेगवान गोलंदाजांविरुद्ध, पण नंतर चौथ्या षटकात रोहित शर्माने मास्टर स्ट्रोकटी चाल खेळली आणि पॉवरप्लेमध्ये अक्षर पटेलकडे चेंडू सोपवला. अक्षरने पहिल्याच षटकात जोस बटलरला आपल्या जाळ्यात अडकवून मोठ्या माशांची शिकार केली. यानंतर विकेट पडण्याची प्रक्रिया सुरू झाली आणि ती कधीच थांबली नाही. या सामन्यात अक्षर पटेलने ४ षटकात २३ धावा देत ३ बळी घेतले. या दमदार कामगिरीसाठी त्याला सामनावीर म्हणूनही निवडण्यात आले.

हेही वाचा – IND vs ENG : ‘इस बार ट्रॉफी डिलीवर…”, भारताच्या विजयानंतर स्विगी-झोमॅटोने इंग्लंडची उडवली खिल्ली, पोस्ट व्हायरल

३. कुलदीप यादवचा परफेक्ट कॅमिओ –

कुलदीप यादवचा कॅमिओ इंग्लंडविरुद्ध टीम इंडियाचा तिसरा टर्निंग पॉइंट ठरला. भारतीय डावातील सातव्या षटकात कुलदीप गोलंदाजीसाठी आला. पहिल्या षटकात कुलदीपला विकेट मिळाली नसली तरी दुसऱ्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर त्याने सॅम करनला बाद करून इंग्लंडच्या कॅम्पला हादरवून सोडले. यानंतर कुलदीपकडून असे वादळ पाहायला मिळाले की, इंग्लंडला पुन्हा स्वतःवर नियंत्रण ठेवता आले नाही. कुलदीपने अचूक कॅमिओ दाखवत ४ षटकांत केवळ १९ धावांत ३ बळी घेतले.

हेही वाचा – IND vs ENG : ऋषभ पंतच्या चपळाईने चाहत्यांना झाली धोनीची आठवण, मोईन अलीच्या स्टंपिगचा VIDEO व्हायरल

वर्षानुवर्षे विश्वचषक जिंकण्याची प्रतीक्षा संपुष्टात येणार –

२०११ मध्ये एकदिवसीय विश्वचषक जिंकण्यात टीम इंडियाला अखेरचे यश मिळाले होते. त्यानंतर कोणत्याही फॉरमॅटचा विश्वचषक जिंकता आलेला नाही. आता अंतिम फेरीत दक्षिण आफ्रिकेला पराभूत करून विश्वचषक आणि आयसीसी ट्रॉफी जिंकण्याचा दुष्काळ संपवण्याची संधी आहे. टी-२० विश्वचषकाबद्दल बोलायचे तर २००७ पासून भारताने या फॉरमॅटमधील विश्वचषक उंचावलेला नाही.

मराठीतील सर्व T20 World Cup बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Three important turning points in indias victory kuldeep axar cameo captain master stroke rohit suriya 73 run partnership vbm