Yuvraj Singh and Shahid Afridi discussing after India vs Pakistan match video viral : अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये आयोजित करण्यात आलेल्या टी-२० विश्वचषक २०२४ चा उत्साह चाहत्यांमध्ये जबरदस्त आहे. या स्पर्धेत आतापर्यंत अनेक रोमांचक सामने झाले आहेत. रविवारी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामनाही असाच झाला, जो टीम इंडियाने सहा धावांनी जिंकला. या सामन्यासाठी अनेक दिग्गज न्यूयॉर्कमध्ये पोहोचले होते. यामध्ये युवराज सिंग आणि शाहिद आफ्रिदीचाही समावेश आहे. दोघेही या स्पर्धेचे आयसीसी ॲम्बेसेडर म्हणून उपस्थित आहेत. आता या दोघांचा भारत-पाकिस्तान सामन्याबाबतच्या संभाषणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, तो नक्की काय आहे? जाणून घेऊया.
या व्हिडीओमध्ये युवराज सिंग आणि शाहिद आफ्रिदी यांच्यात सामन्यासंदर्भात संभाषण सुरू असल्याचे दिसत आहे. हे संभाषण टीम इंडियाने थरारक पद्धतीने सामना जिंकल्यानंतरचे आहे. भारताला केवळ ११९ धावांवर रोखल्यानंतरही पाकिस्तानला सामना जिंकता न आल्याने आफ्रिदी नाराज दिसत होता. बाबर आझमच्या नेतृत्वाखालील संघ विजयापासून ४० धावा दूर असताना युवराजने पाकिस्तानच्या विजयाचे भाकीत केले होते, असेही त्याने म्हटले आहे. यावर युवराजने उत्तर दिले की, मी तसे बोललो होतो, पण मला भारताच्या विजयावर विश्वास होता.
युवराज सिंग आणि शाहिद आफ्रिदीमधील संवाद –
या व्हिडीओमध्ये युवराज सिंग पाकिस्तानच्या शाहिद आफ्रिदीला म्हणाला, लाला, उदास का आहेस? काय झालं? यावर आफ्रिदी म्हणाला, मी दु:खी आहे हे योग्य नाही का? हा सामना आम्ही (पाकिस्तान) गमावयला हवा होता का? आम्हाला जिंकण्यासाठी ४० धावा करायच्या होत्या तेव्हा युवराज मला म्हणाला, ‘लाला, अभिनंदन! मी निघतोय, बाकी असलेला सामना बघणार नाही.’
यावर शाहिद आफ्रिदी म्हणाला, ‘त्यावेळी मी युवीला म्हणालो होती की, या खेळपट्टीवर ४० धावा पण खूप आहेत. इतक्या लवकर माझे अभिनंदन करू नको.’ यानंतर युवराज सिंग म्हणाला, ‘मी मात्र पाकिस्तान जिंकेल असे सांगितले होते. पण तरीही तिथून आपण (भारत) जिंकू शकतो यावर माझा विश्वास होता. हरणे आणि जिंकणे हा खेळाचा भाग आहे. त्यामुळे महत्त्वाचं म्हणजे आपल्यातील हर्षोल्लास असाच चालू राहिला पाहिजे.’
हेही वाचा – T20 WC 2024 : ‘क्रिकेट आता एक व्यवसाय झालाय…’, आयपीएलबद्दल माजी खेळाडू शाहिद आफ्रिदीचे मोठे वक्तव्य
भारताने आयर्लंड आणि पाकिस्तान या दोन्ही संघांविरुद्धचे सामने जिंकून टी-२० विश्वचषक २०२४ मध्ये सुपर-८ मधील स्थान मिळवण्यासाठी स्वत:ला उत्तम स्थितीत आणले. भारताचे शेवटचे दोन सामने अमेरिका आणि कॅनडाविरुद्ध आहेत. भारताला सुपर-८ मध्ये नेण्यासाठी एक विजयही पुरेसा आहे. १२ जूनला अमेरिकेविरुद्धच्या सामन्यानंतर भारताचा सामना १५ जूनला कॅनडाशी होणार आहे. सुपर-८ साठी पात्र ठरताच टीम इंडिया अ गटातील अव्वल संघ राहण्याची खात्री आहे.