६ जूनच्या उत्तररात्री जागतिक महासत्ता असलेल्या पण क्रिकेटच्या पटलावर लिंबूटिंबूत गणना होणाऱ्या अमेरिकेने ट्वेन्टी२० वर्ल्डकप स्पर्धेत चक्क पाकिस्तानला हरवलं. अमेरिका आणि क्रिकेट हेच अतर्क्य, त्यात ते वर्ल्डकप खेळत आहेत हे आणखी अविश्वसनीय आणि नुसते ‘आलेले गेलेले’ नसून पाकिस्तानसारख्या मोठ्या संघाला नमवण्याची किमया करत आहेत हे त्याहून अचंबित करणारं. पण हे खरं आहे. क्रिकेटचा पट जागतिक क्षितिजावर नेण्याचं आयसीसीने पक्कं केलं आणि अनेक छोट्या संघांना वर्ल्डकपच्या व्यासपीठावर खेळण्याची संधी मिळाली. त्या रात्रीपर्यंत सौरभ नेत्रावळकर हे नाव क्रिकेट फॉलो करणाऱ्यांनादेखील जेमतेमच माहिती होतं. पण त्या रात्री सौरभने सुपर ओव्हरमध्ये १८ धावांचा यशस्वी बचाव केला आणि त्याचं नाव ट्रेन्डिंग होऊ लागलं.

अमेरिकेच्या संघाचा प्रमुख गोलंदाज असलेल्या सौरभची केवळ भारतीय ही ओळख नाही. भारतीय आहेच पण महाराष्ट्राचा आहे. त्यातही मुंबईचा आणि अस्खलित मराठी बोलणारा कार्यकर्ता. एका मराठमोळ्या मुलाने पाकिस्तानला जिंकू दिलं नाही. पाकिस्तानला आपल्या माणसाने रोखलं याला राष्ट्रवादाची किनारही जोडली गेली आणि सौरभ नेत्रावळकर हे नाव घरोघरी पोहोचलं. मालाड ते अमेरिका असं सौरभचं स्थित्यंतर. इंजिनिअर होऊन अमेरिका गाठणारे अनेक आहेत पण तिथे जाऊन काम करुन, क्रिकेट खेळून अमेरिकेकडून खेळणारे दुर्मीळ आहेत. सौरभ या दुर्मीळ गटात मोडतो.

संधी आणि स्थलांतर एकाच कुळातले असावेत का? असूही शकतात. हा वर्ल्डकप स्थलांतरितांची गोष्ट उलगडणारा आहे म्हटलं तर वावगं ठरणार नाही. सौरभ या पंक्तीतलं झळाळतं नाव. २०१० साली झालेल्या U19 वर्ल्डकप स्पर्धेत सौरभने भारताचं प्रतिनिधित्व केलं होतं. मुंबई क्रिकेटमधले वयोगट स्पर्धांचे टप्पे पार करत रणजीही खेळला. पण स्पर्धा टोकाची. सौरभ अभ्यासातही हुशार. करिअरमध्ये एकाक्षणी त्याने क्रिकेटऐवजी सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगची निवड केली आणि तो अमेरिकेला रवाना झाला. ओरॅकलसारख्या कंपनीत जॉब, उत्तम पगार, चांगली जीवनशैली हे सगळं झालं. पण क्रिकेटची आवड स्वस्थ बसू देईना. सौरभने वर्क लाईफ बॅलन्स ही चौकट सांभाळत खेळायला सुरुवात केली. अमेरिकेत दक्षिण आशियाई पट्टयातल्या मंडळींचे काही भाग आहेत. त्यामुळे क्रिकेट तिथे पाहिलं जातं, थोडंही खेळलंही जातं. अमेरिकेचा लाडका खेळ बेसबॉल पण आता तिथे किचिंत क्रिकेटचं मूळ रुजू पाहत आहे. अमेरिकेच्या संघासाठी सौरभचा भारतीय डोमेस्टिक क्रिकेटमधला अनुभव पुरेसा होता. अल्पावधीतच तो त्यांचा प्रमुख गोलंदाज झाला. विशेष म्हणजे त्याच्या कंपनीने त्याला ही आवड जोपासू दिली आहे. १७ तारखेपर्यंत सौरभ रजेवर आहे. अमेरिकेची कामगिरी पाहता त्याला ही रजा वाढवायला लागू शकते. अमेरिकेत जाऊनही सौरभ देशांग्ल झालेला नाही. त्याच्या इन्स्टा हँडलवरच्या एका व्हीडिओत मन उधाण वाऱ्याचे युकेलेलवर वाजवताना दिसतो.

अमेरिकेचा अख्खा संघ स्थलांतर या घडामोडीचे कंगोरे उलगडणारा आहे. अमेरिकेच्या संघात कोरे अँडरसन आहे. काही वर्षांपूर्वी वनडेतलं वेगवान शतक झळकावण्याचा मान न्यूझीलंडच्या कोरेच्या नावावर होता. दांडपट्टा स्टाईल बॅटिंग, उसळत्या चेंडूचा मारा करुन डावखुरी गोलंदाजी आणि न्यूझीलंडचा असल्यामुळे चांगला फिल्डर हे ओघाने आलंच. कोरे आयपीएलमध्ये होता. बंगळुरू, दिल्ली आणि मुंबईकडून खेळला. कोरोना काळात कोरेने अमेरिका गाठली. इथल्या मेजर लीग क्रिकेट या स्पर्धेत खेळू लागला. अमेरिकेच्या संघाकडून खेळण्यासाठीचे निकष पूर्ण केले आणि अमेरिकन झाला. कोरेचा अनुभव अमेरिकेच्या संघासाठी अगदीचा कामाचा.

सौरभप्रमाणेच मुंबईत क्रिकेटची धुळाक्षरं गिरवणारा हरमीत सिंग अमेरिकेच्या संघात आहे. हरमीतची वाटचाल खाचखाळग्यांनी भरलेली. देशांतर्गत क्रिकेटमधला उमदा फिरकीपटू असं त्याचं वर्णन केलं जायचं. आयपीएलमध्ये राजस्थान संघाकडून खेळू लागला. पण फिक्सिंग संदर्भातल्या प्रकरणात त्याचं नाव घेतलं गेलं. तो आळ होता, आरोप सिद्ध झाले नाहीत. हरमीत दोषी नसल्याचं सिद्ध झालं. पण या प्रकाराने हरमीतला संधीने नाकारलं. मुंबईकडून खेळण्याचं स्वप्न दुरावलं. शिवाजी पार्क जिमखान्याचा हरमीत भारतासाठी U19 वर्ल्डकपही खेळला होता. पण एकदा बट्टा बसला की बसतोच. हरमीत त्रिपुराकडून खेळला. हे फार दिवस चालू शकत नाही म्हटल्यावर हरमीतने अमेरिकेला जाण्याचा निर्णय घेतला. तिथे सगळं ताटावर पाटावर नव्हतंच. हरमीतने पेट्रोल पंपावर काम केलं, मॉलमध्ये काम केलं. तिथल्या भारतीय मुलांना ट्रेनिंग दिलं. मेजर लीग क्रिकेट स्पर्धेला प्रोफेशनल खेळाडू हवे होते. या सरदाराची फिरकीवरची हुकूमत त्यांच्या कामी आली. अमेरिकेच्या राष्ट्रीय संघाकडून खेळण्याचं स्वप्न या लीगच्या माध्यमातून सुकर झालं.

पोटाची खळगी भरायला माणसं कुठेही जातात. कोणी शिकायलाच बाहेर पडतं, कोणी बेटर प्रॉस्पेक्ट्ससाठी बाहेर पडतं. कोणी अगतिकतेतून बाहेर पडतं. अमेरिकेचा कर्णधार मोनाक पटेल गुजरातमधल्या आणंदचा. मोनाक वयोगट स्पर्धांमध्ये खेळला पण त्यापुढे किती जाता येईल याविषयी साशंकता असल्याने मोनाकने अमेरिका गाठली. मोनाकने अमेरिकेत चायनीज रेस्तराँ काढलं. Teriyaki Madness असं त्याचं नाव. दोन वर्ष झोकून देऊन काम केलं. शेफ आणि मॅनेजर अशा दोन्ही जबाबदाऱ्या सांभाळल्या. पण हॉटेल चालेना. त्याचवेळी त्याच्या आईला कॅन्सर झाल्याचं स्पष्ट झालं. मोनाक न्यूजर्सीला परतला. त्याच काळात तो अमेरिकेसाठी खेळू लागला. आईची तब्येतही सुधारु लागली. गुजरात क्रिकेट असोसिएशनऐवजी मोनाकची बॅट अमेरिकेसाठी तळपू लागली. मुख्य फलंदाज ही भूमिका निभावताना संघाची सूत्रं त्याच्या हातात आली. गुजरातपासून पाकिस्तानची सीमा फार दूर नाही. परवा पाकिस्तानविरुद्ध मोनाकने सख्ख्या शेजाऱ्यांना बॅटने इंगा दाखवला. बहुविध संस्कृतीचं प्रतीक असणाऱ्या अमेरिकेच्या संघाची मोट बांधण्याचं काम मोनाक करतो आहे. पाकिस्तानविरुद्ध त्याच्या खेळाचं वर्णन करताना रमीझ राजा म्हणाले, monak playing like monarch.

नितीश कुमार हे नाव सध्या देशभरात चर्चेत आहे. कारणं तुम्ही जाणताच. दूर अमेरिकेतही एक नितीश कुमार चर्चेत आहे. पाकिस्तानविरुद्ध शेवटच्या चेंडूवर चौकार लगावत नितीश कुमारने सामना टाय करून दिला. तो चौकार बसला नसता तर पाकिस्तान जिंकलं असतं. नितीश कुमारचा जन्म कॅनडातला. शिक्षण इंग्लंडमध्ये आणि खेळतोय अमेरिकेसाठी. नव्वदीच्या दशकात बालपण घालवलेल्या पिढीला टोरँटो हा एक जिव्हाळ्याचा कोपरा वाटतो. भारत-पाकिस्तान मॅच होण्याचं कॅनडातलं ठिकाण. नितीशचे बाबा टोरँटो क्रिकेट क्लबसाठी खेळायचे. क्रिकेटची आवड पिढीजात. कोरोना काळात टोरँटोत सर्वाधिक काळ लॉकडाऊन होता. साहजिकच सगळं ठप्प होतं. भरपूर क्रिकेट खेळायला मिळावं या विचारातून नितीश कॅनडाहून अमेरिकेला पोहोचला. परवाच्या खेळीनंतर नितीश कुमारवरून मीम्स फिरू लागली.

याच अमेरिकेच्या संघात दोन पाकिस्तानमध्ये जन्मलेले खेळाडू आहेत. अली खान आणि शयान जहांगीर. अटकेपार झेंडे लावणे हा वाक्प्रचार अलीला लागू होतो कारण तो पाकिस्तानातल्या अटकेचाच आहे. २०१० मध्ये तो कुटुंबीयांबरोबर अमेरिकेला स्थायिक झाला. कॅरेबियन प्रीमिअर लीग स्पर्धेत पहिल्या चेंडूवर कुमार संगकाराला बाद केल्यावर तो चर्चेत आला. काही दिवसांपूर्वीच आयपीएलविजेत्या कोलकाता नाईट रायडर्स संघाचाही तो भाग होता. आयपीएल खेळणारा अमेरिकेचा पहिला खेळाडू अशी बिरुदावली त्याला मिळाली. जहांगीर पाकिस्तानमध्ये फर्स्ट क्लास क्रिकेटही खेळला. चांगल्या संधीच्या शोधात तो अमेरिकेत आला.

भारतातलं डोमेस्टिक क्रिकेट फॉलो करणाऱ्यांना मिलींद कुमार हे नाव नवीन नाही. दिल्लीकडून खेळायचा. २०१८-१९ रणजी हंगामात सिक्कीमकडून खेळताना मिलींदने धावांची टांकसाळच उघडली. हंगामात सर्वाधिक धावा मिलींदच्या नावावर होत्या. १४० कोटींच्या देशात राष्ट्रीय संघाकडून खेळण्याचं स्वप्न स्वप्नच राहू शकतं हे लक्षात घेऊन मिलींद अमेरिकेत आला. मेजर लीग क्रिकेट स्पर्धेत टेक्सास सुपर किंग्सकडून खेळतो. अमेरिकेच्या संघातही नियमित आहे.

फार्मासिटिकल सायन्समध्ये मास्टर्स आणि मेडिकल रिसर्च कंपनीत काम करणारा निसर्ग पटेल अमेरिकेच्या संघात आहे. त्याचं शालेय शिक्षण भारतात झालं आहे. वर्ल्डकपच्या निमित्ताने ज्यांना आदर्श मानतो अशा भारतीय खेळाडूंविरुद्ध त्याला उभं ठाकायचं आहे.

शॅडले क्लाऊड व्हॅन चॉलवॉक हा मूळचा आफ्रिकेचा पण आता अमेरिकेकडून खेळतो. नॉस्थुश केजिगे याचा जन्म अमेरिकेतला पण मूळचा कर्नाटकचा. त्याच्याकडे दयानंद सागर कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगची बायोटेक्नॉलॉजीची डिग्री आहे. कर्नाटकात टिकाव धरणं कठीण आहे लक्षात आल्यावर तो अमेरिकेला परतला. एका स्पर्धेदरम्यान ड्वेन ब्राव्होने त्याला हेरलं. आता तो अमेरिकेचा चतुर बॉलर झाला आहे.

जसदीप सिंगचा जन्म अमेरिकेतला. त्याच्या घरचे तो ३ वर्षांचा असताना भारतात परतले. पण १३व्या वर्षी जसदीप पुन्हा अमेरिकेला रवाना झाला. ३१वर्षीय जेसी त्यांच्या गोलंदाजी माऱ्याचा महत्त्वाचा भाग आहे. पण हे फक्त अमेरिकेच्या संघापुरतं मर्यादित नाही. कॅनडाचं नेतृत्व करणारा नवनीत धालिवालचा जन्म भारतातला. कॅनडातला भारतीय आणि प्रामुख्याने पंजाबी टक्का किती वाढलेला याचा डेमो म्हणजे हा संघ आहे.

ओमानच्या संघात नाशिककर प्रतीक आठवले आहे. याच संघातला कश्यप प्रजापती गुजरातमधल्या खेडाचा. त्यांचा कर्णधार अकीब इलियास हा मूळचा पाकिस्तानचा. ओमान संघातला पाकिस्तानच्या खेळाडूंचं प्रमाण पाहिलं तर हा पाकिस्तानचा एक्सटेंडेंड संघच वाटतो. पाकिस्तानच्या संघाची कामगिरी यथातथाच होते आहे. त्यांनी ओमानमधल्या खेळाडूंचा निवडीसाठी विचार करायला हरकत नाही.

यंदा युगांडाचा संघही वर्ल्डकपमध्ये आहे. रोनक पटेल, दिनेश नाकरानी, अल्पेश राजमनी ही मंडळी गुजरातमधली. कोणाचं स्वप्न कुठे पूर्ण होईल काही सांगता येत नाही. स्कॉटलंड या सगळ्यांच्या तुलनेत अनुभवी संघ. स्कॉटलंडचा कर्णधार ऑस्ट्रेलियाचा आहे. संघात भारतीय वंशाचे अनेक खेळाडू आहेत. दक्षिण आफ्रिकेहून आलेले कार्यकर्तेही आहेत.

२०१९ वनडे वर्ल्डकपवेळी अस्मादिकांनी स्थलांतर आणि क्रिकेट अशी एक सीरिज केली होती. कोलपॅकमुळे दक्षिण आफ्रिकेचं झालेलं ब्रेनड्रेन, कॅरेबियन बेटं ते इंग्लंड असं संक्रमण करणारा जोफ्रा आर्चर, पाकिस्तानातून ऑस्ट्रेलियाला गाठणारा उस्मान ख्वाजा, लुधियानाचा इश सोधी न्यूझीलंडचं प्रमुख अस्त्र कसा होतो यावर लिहिलं होतं. अफगाणिस्तानच्या संघापैकी अनेकांनी रेफ्युजी कॅम्पमध्येच राहून क्रिकेट शिकलं आहे. तेव्हा संघातल्या एखाद्या खेळाडूपुरती मर्यादित अशी स्थलांतराची कहाणी आता अख्ख्या संघालाच लागू होताना दिसते आहे.

२०००च्या दशकात हिंदी चित्रपटसृष्टीत दिल चाहता है चित्रपटाने एक नवं कवाड उघडलं. या चित्रपटातला गोव्याच्या किल्ल्यावरचा तीन मित्रांचा संवाद आजही पाहिला जातो. त्यात आकाश आपल्या मित्रांना म्हणतो, ही जागा किती सुंदर आहे, आपण इथे दरवर्षी आलं पाहिजे. त्यावर सिद म्हणतो, माहिती नाही. दरवर्षी सोडा कदाचित १० वर्षातही एकत्र जमणं होईल का माहिती नाही. त्याचं पुढचं वाक्य मनात आरपार घुसतं- किसकी जिंदगी किसे कहाँ ले जाती है क्या पता….

वेस्ट इंडिज-अमेरिकेत भरलेला हा ट्वेन्टी२० मेळा पाहताना या वाक्याची सातत्याने प्रचिती येते. या स्पर्धेत नुसते खेळाडूच नाही तर खेळपट्टीही स्थलांतर करुन आली आहे. भारत-पाकिस्तानचा सामना न्यूयॉर्कमध्ये होतोय आणि खेळपट्टी अॅडलेडमध्ये तयार झालेली आहे. संधी आणि स्थलांतराचं हे गुणोत्तर कुणाला पावतं पाहूया.