सेंट जॉन्स : ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील दारुण अपयशानंतर वेस्ट इंडिज क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक फिल सिमन्स पायउतार झाले आहेत. वेस्ट इंडिज संघाला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत प्राथमिक फेरीतच गाशा गुंडाळावा लागला होता. या अपयशाचे पडसाद मायदेशात उमटले. ट्वेन्टी-२० क्रिकेटमधील वेस्ट इंडिज हा सर्वात यशस्वी संघ मानला जातो. दोन वेळा वेस्ट इंडिज संघाने विश्वविजेतेपद मिळविले आहे. या वेळी वेस्ट इंडिज संघाला झिम्बाब्वे संघाकडून पराभव पत्करावा लागला. या पराभवामुळे वेस्ट इंडिज संघ ‘अव्वल १२’ फेरीपासून दूर राहिला. विश्वचषक स्पर्धेच्या मुख्य फेरीसाठी पात्र न ठरण्याची वेळ वेस्ट इंडिज संघावर प्रथमच आली.

विंडीज संघ मायदेशी परतल्यावर अपयशाचे परिणाम दिसून यायला सुरुवात झाली. वेस्ट इंडिज क्रिकेट मंडळाने मुख्य प्रशिक्षक सिमन्स यांना पदभार सोडण्यास सांगितले आहे. पुढील महिन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणारी कसोटी क्रिकेट सामन्यांची मालिका सिमन्स यांच्यासाठी अखेरची असेल, असे वेस्ट इंडिज क्रिकेट मंडळाने स्पष्ट केले आहे.

वेस्ट इंडिज संघाच्या अपयशी कामगिरीबाबत मुख्य प्रशिक्षक सिमन्स यांनी माफी मागितली आहे. ‘‘हे अपयश निश्चित बोचणारे आहे. अपयशाची जबाबदारी स्वीकारून मी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेनंतर प्रशिक्षकपदाचा राजीनामा देण्याचा विचार करत होतो. पण, आता विचार करण्याची वेळच राहिलेली नाही. आता ऑस्ट्रेलियाविरुद्ध मी संघाकडून अधिक कामगिरी करून घेण्याचा प्रयत्न करेन,’’ असे सिमन्स यांनी म्हटले आहे.

Story img Loader