वृत्तसंस्था, मेलबर्न : ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या आठव्या पर्वाला रविवारपासून सुरुवात होणार असून पहिल्या दिवशी प्राथमिक फेरीत श्रीलंकेपुढे नामिबिया, तर नेदरलँड्सपुढे संयुक्त अरब अमिरातीचे आव्हान असेल. प्राथमिक फेरीत आठ संघांचा सहभाग असून यापैकी चार संघ ‘अव्वल १२’ फेरीत प्रवेश करतील.

ऑस्ट्रेलियात होणाऱ्या या स्पर्धेच्या ४५ सामन्यांपैकी पहिल्या सामन्यात श्रीलंकेची धक्कादायक निकाल नोंदवण्याची क्षमता असलेल्या नामिबियाशी गाठ पडणार आहे. या सामन्यात दसून शनकाच्या नेतृत्वाखालील श्रीलंकेचे पारडे जड मानले जाते आहे. श्रीलंकेने नुकत्याच झालेल्या आशिया चषकाचे जेतेपद पटकावताना भारत, पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेशसारख्या संघांना पराभूत केले होते. त्यामुळे श्रीलंकेचा आत्मविश्वास दुणावलेला आहे.

तसेच अमिराती येथे झालेल्या गेल्या ट्वेन्टी-२० विश्वचषकातही श्रीलंका आणि नामिबिया हे संघ आमनेसामने आले होते. त्या सामन्यात श्रीलंकेने नामिबियाला ९६ धावांवर रोखल्यानंतर हे लक्ष्य सात गडी राखून गाठले होते. त्यामुळे या पराभवाची परतफेड करण्यासाठी नामिबियाचा संघ उत्सुक असेल. श्रीलंकेची कुसाल मेंडिस आणि वानिंदू हसरंगा, तर नामिबियाची डेव्हिड विसावर भिस्त असेल.

पहिल्या दिवशीच नेदरलँड्स आणि अमिराती यांच्यातही सामना होईल. अमिरातीला केवळ दुसऱ्यांदा ट्वेन्टी-२० विश्वचषकात खेळण्याची संधी मिळणार आहे. अमिराती आणि नेदरलँड्स यांच्यात यापूर्वी आठ ट्वेन्टी-२० सामने झाले असून दोन्ही संघांनी चार-चार विजय मिळवले आहेत. परंतु ‘आयसीसी’च्या स्पर्धामध्ये नेदरलँड्सने वर्चस्व गाजवताना चारपैकी तीन सामने जिंकले आहेत. त्यामुळे अमिरातीचा संघ आपला खेळ उंचावण्यासाठी प्रयत्नशील असेल. अमिरातीची वेगवान गोलंदाज झहूर खान, तर नेदरलँड्सची अष्टपैलू बास डे लीडे व कर्णधार स्कॉट एडवर्डसवर मदार आहे.

आजचे सामने

नामिबिया वि. श्रीलंका

  • वेळ : सकाळी ९.३० वा.

नेदरलँड्स वि. अमिराती

  • वेळ : दुपारी १.३० वा.
  • थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, २, १ हिंदी (संबंधित एचडी वाहिन्यांवर)

Story img Loader