रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने दिवाळीच्या एक दिवस आधी आपल्या चाहत्यांना आनंदाची भेट दिली. भारताने पाकिस्तानवर ४ विकेट्सने दणदणीत विजय नोंदवला. यासह टीम इंडियाने २०२२ च्या टी-२० विश्वचषकाची सुरुवातही विजयाने केली. अखेरच्या चेंडूवर पाकिस्तानच्या या पराभवानंतर शेजारील देशाचे दिग्गज खेळाडू संतापले आहेत.
काही पाकिस्तानी क्रिकेट तज्ज्ञ त्यांच्या संघावर ताशेरे ओढत आहेत, तर काही अंपायरकडे बोट दाखवत आहेत. त्यापैकी एक शोएब अख्तर देखील आहे. सामन्यानंतर शोएबने पंचांच्या निर्णयावर बोट उचलले, त्यानंतर भारतीय चाहत्यांनी त्याला आरसा दाखवला.
खरं तर, भारतीय डावाच्या शेवटच्या षटकात पाकिस्तानी फिरकी गोलंदाज मोहम्मद नवाजने कमरेच्यावर बॉल फेकला, ज्याला पंचांनी नो बॉल म्हटले. या चेंडूवर विराट कोहलीने षटकार ठोकला. अंपायरच्या या निर्णयावर शोएब अख्तरने बोट उचलले आहे.
विराट कोहलीचा एक फोटो शेअर करत शोएब अख्तरने लिहिले, ”अंपायर भाइयों आज रात सोच-विचार करने के लिए आपके लिए खाना”
शोएबच्या या पोस्टवर अनेक भारतीय चाहत्यांनी कमेंट करून त्याला आरसा दाखवला आहे. एका चाहत्याने म्हटले की, किमान चेंडूपर्यंत एक रेष ओढली, ज्यामध्ये चेंडू कमरेच्यावर असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे.
सामन्याबद्दल बोलायचे झाले तर बाबर आझम आणि मोहम्मद रिझवानच्या अपयशानंतर शान मसूद आणि इफ्तिखार अहमद यांच्या अर्धशतकांच्या जोरावर पाकिस्तानने २० षटकांत ८ गडी गमावून १५९ धावांपर्यंत मजल मारली. त्याचवेळी भारताकडून अर्शदीप आणि हार्दिक पंड्याने प्रत्येकी ३ बळी घेतले.
१६० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना टीम इंडियाची सुरुवात चांगली झाली नाही. एका वेळी भारताने ३१ धावांत चार विकेट गमावल्या होत्या. त्यानंतर विराट कोहलीला हार्दिक पांड्याची साथ लाभली आणि दोन्ही फलंदाजांनी शतकी भागीदारी करून संघाला विजय मिळवून दिला. भारताचा पुढील सामना २७ ऑक्टोबर रोजी नेदरलँडशी होणार आहे.