USA beat Canada by 7 wickets in T20 World Cup 2024 : आयसीसी टी-२० विश्वचषक २०२४ स्पर्धेला सुरूवात झाली आहे. पहिला सामना यजमान अमेरिका आणि कॅनडा यांच्यात खेळला गेला. या सामन्यात अमेरिकेने ७ विकेट्सनी कॅनडावर मात करत ऐतिहासिक विजय नोंदवला. या सामन्यात अमेरिकेने टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वात मोठे धावांचे आव्हान अवघ्या १७.४ षटकात पूर्ण केले. टी-२० विश्वचषकात अमेरिकेचा हा पहिला विजय आहे. हा ऐतिहासिक विजय चाहते विसरू शकणार नाहीत. या सामन्यात स्फोटक फलंदाजीचे प्रदर्शन करणारा ॲरॉन जोन्स अमेरिकेच्या विजयाचा हिरो ठरला.
कॅनडातील डॅलस येथील ग्रँड प्रेरी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात अमेरिकेने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, जो पूर्णपणे त्यांच्या बाजूने गेला. कॅनडाने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ५ गडी गमावून १९४ धावा केल्या. नवनीत धालीवालने संघासाठी सर्वात मोठी खेळी खेळली. त्याने ४४ चेंडूत ६ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने ६१ धावा केल्या. त्यानंतर लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या अमेरिकेने १७.४ षटकांत विजय नोंदवला. अमेरिकेच्या फलंदाजांसमोर कॅनडाचे गोलंदाज पूर्णपणे असहाय्य दिसत होते.ॲरॉन जोन्सने अमेरिकेसाठी सर्वात मोठी खेळी खेळली, त्याने ४० चेंडूत ४ चौकार आणि १० षटकारांच्या मदतीने ९४* धावा केल्या. याशिवाय अँड्रिज गसने ४६ चेंडूंत ७ चौकार आणि ३ षटकारांसह ६५ धावा केल्या.
अमेरिकेचा कॅनडावर एकतर्फी विजय –
१९५ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना अमेरिकेची सुरुवात खूपच खराब झाली. पहिल्याच षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर स्टीव्हन टेलरच्या रूपाने संघाने पहिली विकेट गमावली, जो खाते न उघडताच पॅव्हेलियनमध्ये परतला. त्यानंतर कर्णधार मोनांक पटेल आणि अँड्रिज गस यांनी दुसऱ्या विकेटसाठी ४२ धावांची (३७ चेंडू) भागीदारी केली. ही भागीदारी १८व्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर कर्णधार पटेलच्या विकेटने संपुष्टात आली. मोनांकने १६ चेंडूत २ चौकारांच्या मदतीने १६ धावांची खेळी साकारली.
हेही वाचा – VIDEO : रोहितला भेटण्यासाठी फॅन पोहोचला मैदानात, सुरक्षारक्षकाने पकडल्यानंतर हिटमॅनची रिॲक्शन व्हायरल
यानंतर अँड्रिज गूस आणि ॲरॉन जोन्स यांनी तिसऱ्या विकेटसाठी १३१ धावांची (५८ चेंडू) जलद भागीदारी केली. या भागीदारीमुळे स्पर्धा अमेरिकेच्या बाजूने गेली. या भागीदारीनंतर हा सामना अमेरिकेसाठी एकतर्फी ठरली. ही शानदार भागीदारी १६व्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर अँड्रिज गसच्या विकेटने संपुष्टात आली. अँड्रिजने ४६ चेंडूंत ७ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने ६५ धावांची खेळी केली. यानंतर कोरी अँडरसन आणि ॲरॉन जोन्स यांनी चौथ्या विकेटसाठी २४ (१२ चेंडू) धावांची नाबाद भागीदारी करून अमेरिकेला विजय मिळवून दिला. जोन्सने नाबाद ९४ धावा केल्या, तर अँडरसन ५ चेंडूत धावा केल्यानंतर नाबाद राहिला.
हेही वाचा – T20 WC 2024 : गोलंदाजीतील विलंब पडणार महागात, वर्ल्डकपपासून लागू होणार ‘स्टॉप क्लॉक’ नियम
अमेरिकेच्या फलंदाजांकडून कॅनडाच्या गोलंदाजांची धुलाई –
अमेरिकेच्या फलंदाजांनी कॅनडाच्या गोलंदाजांची धुलाई केली. कॅनडाकडून कलीम सना, डिलन हेलिगर आणि निखिल दत्ता यांनी प्रत्येकी १ विकेट्स घेतली. निखिल दत्ता संघासाठी सर्वात महागडा ठरला, त्याने २.४ षटकात १५.४० च्या इकॉनॉमीमध्ये ४१ धावा दिल्या. याशिवाय परगट सिंगने एका षटकात १५ धावा दिल्या. जेरेमी गॉर्डनने १४.७० च्या इकॉनॉमीमध्ये ३ षटकात ४४ धावा दिल्या आणि कर्णधार साद बिन जफरने ४ षटकात १०.५० च्या इकॉनॉमीमध्ये ४२ धावा दिल्या.