IND vs ENG Match Highlights, Shoaib Akhtar Reaction: तब्बल १० वर्षांची प्रतीक्षा संपवून काल, २७ जूनच्या मध्यरात्रीपर्यंत चालू असलेल्या सामन्यात भारताने इंग्लंडवर ६८ धावांनी विजय मिळवला. स्वतः कर्णधार रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल यांनी एकत्रित १७१ धावा करून १७२ धावांचं आव्हान इंग्लंडसमोर ठेवलं होतं. या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडच्या फलंदाजांची टॉप ऑर्डर, मिडल ऑर्डर पूर्णपणे ढासळली. कुलदीप व अक्षरच्या फिरकीसमोर इंग्लंडचे खेळाडू टिकूच शकले. २०२२ मध्ये एकही विकेट न गमावता भारताला हरवणाऱ्या इंग्लंडला यंदा कशीबशी १०० धावांपर्यंत मजल मारता आली. कुलदीप व अक्षरने प्रत्येकी तीन व बुमराहने दोन विकेट्स या सामन्यात घेतल्या तर सूर्यकुमार यादव, जडेजाच्या अप्रतिम फिल्डिंगमुळे दोन खेळाडू धावबाद झाले. भारताच्या या विजयानंतर साहजिकच विविध स्तरातून रोहित शर्माच्या शिलेदारांवर स्तुती सुमने उधळली जात आहेत. अशातच, ‘रावळपिंडी एक्सस्प्रेस’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शोएब अख्तरने व्हिडीओच्या माध्यमातून भारताच्या विजयावर दिलेली प्रतिक्रिया लक्ष वेधून घेत आहे.
X अकाउंटवर पोस्ट केलेल्या १ मिनिट २४ सेकंदांच्या व्हिडिओमध्ये शोएब अख्तर भारतीय खेळाडूंचे गुण गाताना पाहायला मिळतो. अख्तर म्हणाला की, “हिंदुस्थानचे यश पाहून खूप आनंद झाला. हिंदुस्थानची टीम ही खरोखरच या यशासाठी पात्र होती. रोहित शर्मासारखा कर्णधार व फलंदाज ज्या टीममध्ये आहे त्यांना हे यश मिळणारच होतं. मी केव्हापासून सांगतोय, रोहित शर्मासारखा कुणी दुसरा फलंदाजच नाहीये. हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव व रोहित हे तिन्ही फलंदाज तगडे आहेत, त्यापैकी एक अष्टपैलू खेळाडू आहे जो सामना जिंकून देऊ शकतो. हिंदुस्थान जिंकल्याचा मला खूप आनंद झाला. पण मला जर तज्ज्ञांनी, फॉलोअर्सनी सांगावं, या इंग्लंडच्या संघाला कोणत्या आईनस्टाईनने हा सल्ला दिला होता की, टॉस जिंकूनही भारतासारखा संघ समोर असताना, आधी गोलंदाजी निवडावी? ज्या संघात कुलदीप, अक्षर, सारखे सामना काढून देणारे फिरकीपटू आहेत, जडेजा, बुमराह आहे, तिथे तुम्ही फलदांजीसाठी सेकंड इनिंगमध्ये उतरण्याचा विचारच कसा करू शकता? हा सल्ला कुणी दिला असावा? हा चांगला निर्णय होता असं मला तरी अजिबात वाटत नाही.”
शोएब अख्तरचा भारताच्या विजयानंतर Video
हे ही वाचा<< IND vs ENG: टीम इंडियाच्या फायनल प्रवेशासह रोहित शर्माचे विराट कोहलीवर मोठे वक्तव्य, म्हणाला – “१५ वर्ष खेळलेल्या…”
दरम्यान, शोएब अख्तरच्या या व्हिडीओखाली काहींनी कमेंट करून, “पाकिस्तानसुद्धा सेमी फायनलपर्यंत पोहोचायला हवा होता, त्यांना हरवायला तर अजून मजा आली असती”, असं म्हणत फिरकी घेतली आहे. दुसरीकडे, टी २० विश्वचषकातील दुसऱ्या उपांत्य फेरीतील या विजयामुळे टीम इंडियाने तब्बल १० वर्षांनी अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. यापूर्वी २०१४ मध्ये भारत विश्वचषकाचा अंतिम सामना खेळला होता. तर २००७ मध्ये एम. एस. धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने विश्वचषक आपलं नाव कोरलं होतं. आता शनिवारी, २९ जूनला भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका असा अंतिम व निर्णायक सामना होणार आहे.