BCCI shares Sir Vivian Richards video with Team India : भारतीय संघाने शनिवारी बांगलादेशचा पराभव करून उपांत्य फेरीतील आपले स्थान जवळपास पक्के केले आहे. टी-२० विश्वचषक २०२४ च्या सुपर-८ टप्प्यात भारताने बांगलादेशचा ५० धावांनी पराभव केला. या सामन्यात भारतीय संघाने तिन्ही विभागात चांगली कामगिरी केली. भारतीय संघाने या विश्वचषकात आतापर्यंत एकही सामना गमावलेला नाही आणि सुपर-८ टप्प्यातही सलग दोन सामने जिंकले आहेत. बांगलादेशविरुद्धच्या विजयानंतर बीसीसीआयने भारताच्या ड्रेसिंग रुममध्ये आलेले सर व्हिव्हियन रिचर्ड्स यांचा व्हिडीओ शेअर केला आहे.
भारताचा सुपर-८ टप्प्यातील अंतिम सामना २४ जून रोजी ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. दरम्यान, नेहमीप्रमाणे, बीसीसीआयने रविवारी सोशल मीडियावर भारतीय ड्रेसिंग रूमचा एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये वेस्ट इंडिजचे महान खेळाडू सर व्हिव्हियन रिचर्ड्स दिसत आहेत. यावेळी ते भारताच्या ड्रेसिंग रूममध्ये होणाऱ्या सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक पुरस्कार सोहळ्याचा भाग होते. यावेळी त्यांनी कार अपघातानंतर दमदार पुनरागमन करणाऱ्या ऋषभ पंतचे तोंडभरून कौतुक केले, ज्यााच व्हिडीओ आता व्हायरल होत आहे.
टीम इंडियाचे क्षेत्ररक्षण प्रशिक्षक टी दिलीप यांनी विवियन रिचर्ड्सला भारतीय ड्रेसिंग रूममध्ये बोलावले. संपूर्ण टीमने व्हिव्हियन रिचर्ड्सचे ड्रेसिंग रूममध्ये स्वागत केले. व्हिव्हियन रिचर्ड्सने विराट कोहलीला येताच मिठी मारली आणि टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्याशी हस्तांदोलन केले. वेस्ट इंडिजच्या या महान खेळाडूने स्पर्धेतील आतापर्यंतच्या कामगिरीबद्दल भारतीय संघाचे कौतुक केले. वेस्ट इंडिजने या स्पर्धेत स्थान मिळवले नाही तर भारतीय संघाला पाठिंबा देऊ, असेही रिचर्ड्स म्हणाले.
ऋषभ पंतला मिळाले नवीन टोपणनाव –
याशिवाय माजी दिग्गज खेळाडूने भारताचा यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंत यालाही नवे नाव दिले आहे. वास्तविक पंतला भारतीय क्रिकेटचा स्पायडर मॅन म्हटले जाते पण आता विवियन रिचर्ड्स यांनी त्याला एक नवीन नाव दिले आहे. सर व्हिव्हियन रिचर्ड्स यांनी ऋषभ पंतला ‘पॉकेट रॉकेट’असे संबोधले. सर व्हिव्हियन रिचर्ड्सकडून नवीन नाव मिळाल्यानंतर पंतने या महान दिग्गजांना मिठी मारली. विशेष म्हणजे प्रत्येक सामन्यानंतर संघाचे क्षेत्ररक्षण प्रशिक्षक टी दिलीप खेळाडूंना सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक पदकासाठी नामांकित करतात आणि हा ट्रेंड सध्या सुरू असलेल्या स्पर्धेतही कायम आहे. सर व्हिव्हियन रिचर्ड्सशिवाय रवी शास्त्री, युवराज सिंग आणि राहुल द्रविड यांनी वेगवेगळ्या खेळाडूंना हा पुरस्कार दिला आहे.
हेही वाचा – VIDEO : पॅट कमिन्सने रचला इतिहास! टी-२० विश्वचषकाच्या इतिहासात ‘हा’ पराक्रम करणारा जगातील पहिलाच गोलंदाज
बांगलादेशविरुद्धच्या सामन्यानंतर संघाचे क्षेत्ररक्षण प्रशिक्षक टी दिलीप यांनी सूर्यकुमार यादव, रोहित शर्मा, अक्षर पटेल यांना सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक पुरस्कारासाठी नामांकन दिले. यानंतर व्हिव्हियन रिचर्ड्स यांनी जगातील टी-२० नंबर वन फलंदाज सूर्यकुमार यादवला पदक प्रदान केले. यावेळी तो सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षण पुरस्काराचा विजेता ठरला. या सामन्यात सूर्याने लिटन दासचा झेल घेतला, तो अतिशय अप्रतिम झेल होता. ज्यामुळे त्याला सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षणाचे पदक मिळाले.