भारतीय संघाचं मुंबईत जंगी स्वागत करण्यात आलं. त्यांनी विश्वचषकावर भारताचं नाव कोरल्याने क्रिकेट चाहत्यांचा उर दाटून आला आहे. त्यामुळे भारतीय संघाची एक झलक पाहण्यासाठी मरीन ड्राईव्हवर जनसागर उसळला होता. मरीन ड्राईव्ह ते वानखेडे स्टेडिअमवर उत्साहाची लाट उसळली होती. या गर्दीत मुंबई पोलिसांनी चोख कामगिरी केली आहे. या गर्दीचं नियंत्रण करून कायदा सुव्यवस्था बिघडू दिली नाही. याबाबत खेळाडूंनीही मुंबई पोलिसांचे आभार मानले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुंबईच्या रस्त्यावर विजयी रथ वानखेडे स्टेडिअमवर पुढे सरकत असताना गर्दीने उच्चांक गाठला होता. मुंबई आणि आजूबाजूच्या शहरातील अनेक क्रिकेट प्रेमी मुंबईच्या दिशेने आले होते. त्यामुळे येथे चेंगराचेंगरी होण्याची दाट शक्यता होता. अभूतपूर्व गर्दी वाढल्याने पोलिसांनी तत्काळ बंदोबस्तात वाढ केली आणि मरीन ड्राईव्हच्या दिशेने मुंबईकरांनी न येण्याचं आवाहन केलं. अशा परिस्थितीतही योग्य नियोजन झाल्याने विराट कोहलीने मुंबई पोलिसांचे आभार मानले आहेत.

“मुंबई पोलिसांचे सर्व अधिकारी व कर्मचारी यांचे मनःपूर्वक आदर आणि आभार. विजयी परेडदरम्यान तुम्ही अभुतपूर्व कामगिरी पार पाडली. तुमचे समर्पण आणि सेवा अत्यंत प्रशंसनीय आहे”, असं विराट कोहलीने म्हटलं.

हेही वाचा >> क्रिकेटपटूंसाठी झालेली गर्दी फक्त बघू नका, मुंबईकरांची ‘ही’ जागरूकताही बघा; थेट पोलीस आयुक्तांनी शेअर केला Video!

विराट कोहलीच्या या ट्वीटला मुंबई पोलिसांनी रीट्वीट केलं आहे. “तुमचा पराक्रम कमी नाही. तो बंदोबस्ताला पात्र आहे. कालचं विराट सेलीब्रेशन ही आमच्यासाठी ट्रॉफी आहे”, असं मुंबई पोलिस म्हणाले.

रविंद्र जडेजानेही मानले आभार

रविंद्र जडेजानेही मुंबई पोलिसांचे आभार मानले आहेत. तो म्हणाला, “मुंबई पोलिसांचे खूप आभार. तुम्ही अत्यंत चख कामगिरी काल पार पाडली.” जडेजाच्या या ट्वीटवर मुंबई पोलीस म्हणाले, “धन्यवाद सर. आम्हाला आशा आहे की मुंबईकरांनी आयोजित केलेले भव्य स्वागत तुम्हाला आवडले असेल. आणि मुंबई पोलिसांनी तुमच्यासाठी केलेला बंदोबस्ताचं तुम्ही कौतुक केल्याबद्दल धन्यवाद.”

दरम्यान, गुरुवारच्या विजयी मिरवणुकीत टीम इंडियाच्या स्वागतासाठी हजारोंच्या संख्येनं मुंबईकर मरीन ड्राईव्हवर उपस्थित होते. मात्र, इतक्या मोठ्या संख्येनं गर्दी जमा झाल्यामुळे काही लोकांना श्वास कोंडल्याचा त्रास झाल्याचं आता समोर आलं आहे. तसेच, काहींची प्रकृतीही अस्वस्थ झाल्यामुळे त्यांना तातडीने रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करावं लागलं. त्यामुळे एकीकडे गर्दीमध्ये आपल्या लाडक्या क्रिकेटपटूंच्या स्वागताचा उत्साह दिसत असताना दुसरीकडे गर्दीमुळे काही प्रश्नही निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं.

मराठीतील सर्व T20 World Cup बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Virat celebration in mumbai mumbai polices response to players tweets kohli and jadeja said sgk