आयसीसी स्पर्धेत भारत पुन्हा एकदा नॉकआउट सामन्यातून बाहे पडला आहे. यावेळी भारताला इंग्लंडविरुद्ध पराभव पत्करावा लागला. टी-२० विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत अॅडलेडमध्ये भारताचा १० गडी राखून पराभव झाला. या सामन्यात विराट कोहलीने अर्धशतक केले. त्याने कठीण परिस्थितीत ४० चेंडूत ५० धावा केल्या. कोहली सध्या या स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे, पण त्याचे यश संघाला अंतिम फेरीत नेऊ शकले नाही.
चाहत्यांनाही कोहलीबद्दल वाईट वाटत आहे कारण विराटने गेल्या आठ वर्षांत झालेल्या चार टी-२० विश्वचषकांपैकी तीनमध्ये जबरदस्त कामगिरी केली आहे. त्याने संघाचे ओझे आपल्या खांद्यावर उचलले, पण त्याला ट्रॉफी उचलता आली नाही. यावेळी विराटने सहा सामन्यांच्या सहा डावात २९६ धावा केल्या. त्याची सरासरी ९८.६७ होती आणि त्याचा स्ट्राइक रेट १३६.४१ चा होता. या दरम्यान विराटने तीन अर्धशतके झळकावली.
टी-२० वर्ल्ड कप ट्रॉफी कोहलीच्या नशिबी नाहीच –
कोहलीने २०१४ आणि २०१६ मध्येही जबरदस्त कामगिरी केली होती. विराटने २०१४ मध्ये ३१९ धावा केल्या होत्या, जेव्हा टीम इंडिया फायनलमध्ये श्रीलंकेविरुद्ध हरली होती. त्यानंतर २०१६ मध्ये घरच्या मैदानावर झालेल्या टी-२० वर्ल्ड कपमध्ये विराटने २७३ धावा केल्या होत्या. त्यानंतर टीम इंडियाला वेस्ट इंडिजविरुद्धच्या सेमीफायनलमध्ये पराभवाचा सामना करावा लागला होता. २०२१ मध्ये टीम इंडिया बाद फेरीपर्यंत पोहोचू शकली नाही. यावेळी संघाने उपांत्य फेरी गाठली आणि आता बाहेर पडले. यावरुन विराट कोहलीच्या नशिबात टी-२० विश्वचषक ट्रॉफी नाही असे दिसते. त्याच्या उपस्थित भारतीय संघाने एकदिवसीय विश्वचषक आणि चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली आहे.
२०१४ पासून भारताने ७ नॉकआउट सामने गमावले –
भारतीय संघाने शेवटचे २०१३ मध्ये आयसीसी ट्रॉफी जिंकली होती. तेव्हा भारतीय संघाने चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात पराभूत केले होते. त्यानंतर आयसीसी टूर्नामेंटमध्ये ७ नॉकआउट सामने खेळले, पण विजय मिळवता आला नाही.
आयसीसी टी-२० विश्वचषक २०१४ अंतिम फेरी – श्रीलंकेविरुद्ध पराभूत
आयसीसी एकदिवसीय विश्वचषक २०१५ उपांत्य फेरी – ऑस्ट्रेलियाविरुद्ध पराभूत
आयसीसी टी-२० विश्वचषक २०१६ उपांत्य फेरी- वेस्ट इंडिजविरुद्ध पराभूत
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०१७ अंतिम फेरी – पाकिस्तानविरुद्ध पराभूत
आयसीसी एकदिवसीय विश्वचषक २०१९ उपांत्य फेरी – न्यूझीलंडकडून पराभूत
आयसीसी कसोटी चॅम्पियनशिप २०२१ अंतिम फेरी – न्यूझीलंडविरुद्ध पराभूत
आयसीसी टी-२० विश्वचषक २०२२ उपांत्य फेरी- इंग्लंडविरुद्ध पराभूत