Rohit Sharma Virat Kohli T20 World Cup Victory Parade Viral Video: टीम इंडियाच्या वर्ल्डकप विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी हजारोंच्या संख्येने चाहते काल ४ जुलैला मरीन ड्राईव्हवर पोहोचले होते. विश्वविजेत्या भारतीय संघाची एक झलक पाहण्यासाठी सर्वच जण पाऊस असूनही गर्दीत वाट पाहत उभे होते आणि संघाची विजयी परेड सुरू होताच चाहत्यांचा आनंद द्विगुणित झाला. नरिमन पॉइंटपासून वानखेडे स्टेडियमपर्यंत ही विजयी परेड निघाली. यावेळी, रोहित आणि विराटचा एक व्हीडिओ पाहायला मिळत आहे, ज्यामध्ये विराट कोहली खुल्या बसमध्ये मागे उभ्या असलेल्या रोहितचा हात धरून त्याला पुढे आणतो आणि त्याच्या हातात ट्रॉफी देत उंचावतो. हा क्षणाचा व्हीडिओ सध्या व्हायरल होत आहे.

हेही वाचा – रोहित, विराट, जडेजानंतर बुमराहचं निवृत्तीबाबत मोठं वक्तव्य, स्षष्ट शब्दात सांगत म्हणाला, “मी आता…”

नवी दिल्लीहून भारतीय संघाचे विमान मुंबईत उशिरा पोहोचले, त्यामुळे परेड ५ ऐवजी ७.३० नंतर सुरू होऊ शकली. खेळाडूंव्यतिरिक्त वरिष्ठ उपाध्यक्ष राजीव शुक्ला, बीसीसीआयचे अध्यक्ष जय शाह यांच्यासह भारतीय क्रिकेट बोर्डाचे अधिकारीही बसमध्ये होते. यावेळी बस पुढे आली तेव्हा जय शाह राजीव शुक्ला, विराट कोहली, मोहम्मद सिराज असे खेळाडू पुढे उभे होते. तर रोहित शर्मा बसच्या मागे एका बाजूला बसला होता आणि तिथून चाहत्यांना अभिवादन करत होता. यानंतर काही वेळाने विराट कोहली सर्वांना बाजूला करत रोहितजवळ मागे गेला.

हेही वाचा – मिलरचा शॉट अन् आशा सोडलेला रोहित… सूर्यकुमार यादवने तो कॅच घेण्याआधी रोहितच्या मैदानावरील प्रतिक्रियेचा VIDEO व्हायरल

विराट कोहली खुल्या बसमध्ये मागे असलेल्या रोहित शर्माजवळ पोहोचला आणि त्याच्याशी बोलून त्याला जबरदस्ती पुढे यायला लावलं. रोहितचा हात पकडत त्याला बसमध्ये पुढे आणले. जिथे राजीव शुक्ला उभे होते. विराटने त्यांना बाजूला होण्यास सांगत रोहितला हात धरून पुढे केले आणि त्याच्या हातात विजयाची ट्रॉफी दिली आणि या दोघांनी मिळून ही ट्रॉफी उंचावली. हे दृश्य पाहून वानखेडेवरील गर्दीचा जल्लोष शिगेला पोहोचला होता.

रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या या प्रसंगाने चाहत्यांची मनं जिंकली आहेत. रोहित शर्मा आणि विराट कोहली या भारतीय संघाच्या महान खेळाडूंनी टी-२० विश्वचषक २०२४ च्या जेतेपदानंतर टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. रोहित शर्मा २००७ मध्ये वर्ल्डकप विजेत्या संघातील सर्वात तरुण खेळाडू होता आणि आता रोहितच्या नेतृत्त्वाखालील भारतीय संघाने २०२४ चा टी-२० विश्वचषक पटकावला. रोहित शर्मासाठीही गोष्ट खूप खास असणार आहे.