Kapil Dev Remark On Virat Kohli & Rohit Sharma: टी २० विश्वचषकात भारतीय संघाचे दोन हात म्हणता येतील असे खेळाडू म्हणजे कर्णधार रोहित शर्मा व माजी कर्णधार विराट कोहली. दोघांच्याही धावांचे रेकॉर्ड्स कमी जास्त प्रमाणात सारखे असले तरी या व्यतिरिक्त या दोघांमध्ये काहीच साधर्म्य नाही असं म्हणता येईल. कोहली हा आक्रमक खेळाडू म्हणून ओळखला जातो. विरोधी संघाच्या डोळ्यात डोळे घालून पाहणारा, नजरेतच एक दरारा असणारा, जिंकल्यावर दमदार सेलिब्रेशन करणारा आणि हरल्यावर तितक्याच उघडपणे नाराजी दाखवणारा खेळाडू म्हणजे विराट कोहली. तर रोहित शर्माचा चेहराच मुळात फार शांत आहे, अनेकदा या शांतपणाला आळशीपणा समजून ट्रोलिंगही यापूर्वी झाले आहे. पण या ट्रोलर्सना रोहितने वेळोवेळी आपल्या बॅटच्या फटक्यांनी शांत केले आहे. याशिवाय दोघांच्या शरीरयष्टीतही असलेला फरक यापूर्वी अनेकदा ऑनलाईन अधोरेखित झाला आहे. रोहित व विराटमधील याच फरकाबाबत अलीकडेच भारताला पहिल्यांदा विश्वचषक जिंकवून देणारे कर्णधार कपिल देव यांनी भाष्य केले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रोहित आणि कोहलीच्या स्वभावातील फरक

गुरुवारी भारताच्या इंग्लंडविरुद्धच्या उपांत्य फेरीपूर्वी, कपिल देव यांनी रोहित आणि कोहलीच्या स्वभावातील फरक सांगितला आहे. कपिल म्हणाले की, “कोहली हा जिममध्ये वजन उचलून मेहनत घेणारा आहे, जे आहे ते उघड उघड आक्रमकपणे दाखवणारा आहे. पण रोहित तसा नाही. त्याला माहित आहे की तो वेगळा आहे आणि तीच त्याची खासियत आहे.”

कपिल यांनी एबीपीशी बोलताना सांगितले की, “जर विराट कोहली १५० किलो, २५० किलो वजनाचे डंबेल उचलू शकत असेल, तर याचा अर्थ रोहितनेही असेच केले पाहिजे असे नाही. रोहितला त्याचा खेळ चांगलाच माहीत आहे. तो स्वतःमध्येच खेळतो. तो विराट कोहलीसारखा उड्या मारत नाही, रोहितला त्याच्या मर्यादांची जाणीव आहे आणि त्या बाबतीत त्याच्यापेक्षा चांगला कोणी नाही, अगदी विराटही नाही. मी असं म्हणेन रोहितकडे एकच पॅक आहे आणि तो मोठा षटकार मारण्यासाठी पुरेसा आहे.”

‘रोहित संपूर्ण टीमला आनंदी ठेवतो’: कपिल देव

भारताचे माजी सलामीवीर आकाश चोप्रा यांनी होस्ट केलेल्या या शोमध्ये पाकिस्तानचा माजी कर्णधार वसीम अक्रम देखील उपस्थित होता. या चर्चेतच चोप्रा यांनी कपिलला रोहितच्या नेतृत्व करण्याच्या कौशल्याबाबत प्रश्न केला होता. यावर कपिल देव म्हणाले की, “रोहित हा केवळ महान खेळाडू नाही तर खेळाडूंना कशाची गरज आहे हे समजणारा एक चांगला नेता देखील आहे. अनेक मोठे खेळाडू येतात, पण ते स्वतःसाठी येतात, अगदी स्वतःसाठी कर्णधारपदही करतात पण रोहितला बॉक्समध्ये एक अतिरिक्त टिक मिळते कारण तो संपूर्ण संघाला आनंदी ठेवतो.”

हे ही वाचा<< IND vs ENG: रोहित शर्माच्या मनात एकच चिंता; T20 WC सेमीफायनलआधी स्वतः म्हणाला, “सामना उशिरापर्यंत चालला तर..”

भारत विरुद्ध इंग्लंड उपांत्य फेरीत रोहित व कोहलीचा मोठा रोल

रोहित आणि कोहली या दोघांसाठी, भारताकडून T20 विश्वविजेतेपद जिंकण्याची ही कदाचित शेवटची संधी असेल आणि दोघेही या संधीचे सोने करण्यासाठी प्रयत्न करतील अशी अपेक्षा आहे. रोहितने आधीच स्पष्ट केले आहे की वैयक्तिक रेकॉर्ड्स किंवा धावांची चिंता न करता पॉवरप्लेमध्ये खेळण्याचा त्याचा मानस आहे. संघासाठी जे आवश्यक असेल तसा रोहितचा खेळ असेल. ही गोष्ट तशी रोहितच्या ऑस्ट्रेलिया विरुद्ध सामन्यातील फलंदाजीत सुद्धा दिसून आली होतीच. रोहितची ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४१ चेंडूत ९२ धावांची धडाकेबाज खेळी टी २० विश्वचषकामधील हायलाईट ठरली आहे. तर भारताला विराट कोहलीकडून इंग्लंड विरुद्ध सामन्यात धावांची आशा असेल. टी २० विश्वचषकात कोहलीने अपेक्षेहून फार कमी धावा केल्या आहेत. हा दुष्काळ आजच्या सामन्यात तरी संपवा अशी आशा आहे.

मराठीतील सर्व T20 World Cup बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Virat kohli lifts 150kg dumbbells rohit sharma one pack enough to hit big sixes kapil dev bold statement before ind vs eng angers fans svs