Virat Kohli Only Player to Win 4 ICC Trophies: विराट कोहलीच्या ७६ धावांच्या संयमी आणि महत्त्वपूर्ण खेळीसह भारताने दक्षिण आफ्रिकेवर अंतिम सामन्यात मोठा विजय नोंदवला. भारताच्या सर्वच खेळाडूंसह विराटनेही भारताच्या विजयात मोठी भूमिका बजावली. संपूर्ण टी-२० विश्वचषकात विराटची बॅट शांत होती पण जेव्हा संघाला फायनलमध्ये त्याच्या उत्कृष्ट खेळीची अपेक्षा होती तेव्हा तो मैदानात टिकला आणि महत्त्वपूर्ण ७६ धावा करत संघाला मोठ्या धावसंख्येपर्यंत नेण्यात हातभार लावला. विराट कोहलीने पहिल्यांदाच टी-२० प्रकारातील एखादे जेतेपद आपल्या नावे केले आहे. पण यासह विराट कोहली जागतिक क्रिकेटच्या इतिहासात ४ वर्ल्डकप जिंकणारा पहिला वहिला खेळाडू ठरला आहे.

कोहलीने पहिल्याच षटकात तीन चौकार लगावत शानदार सुरुवात केली. रोहित शर्मा, ऋषभ पंत आणि सूर्यकुमार यादव झटपट बाद झाल्यामुळे कोहलीला मोठी भूमिका बजावावी लागली आणि त्याने ते उत्कृष्टपणे पारही पाडलं. विराटने संयमाने खेळत आपले अर्धशतक पूर्ण केले आणि मग जोरदार फटकेबाजी केली. बाद होण्यापूर्वी कोहलीने ५९ चेंडूत ७६ धावा केल्या. फायनलमधील आपल्या खेळीसह कोहलीने गौतम गंभीरला मागे टाकून टी-२० विश्वचषक फायनलमध्ये भारतासाठी सर्वाधिक धावा करणारा खेळाडू बनला. २००७ च्या टी-२० विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात गंभीरने पाकिस्तानविरुद्ध ७५ धावा केल्या होत्या.

हेही वाचा – IND vs SA Final: रोहित शर्माने विजयानंतर बार्बाडोसच्या खेळपट्टीवरील मातीची चव का चाखली? VIDEO मध्ये पाहा कॅप्टनने नेमकं काय केलं?

विराट कोहलीचा अनोखा विक्रम

टी-२० विश्वचषकात विराट कोहली फॉर्ममध्ये परत येण्याच्या प्रतिक्षेत होता. पण एकाच ७६ धावांच्या महत्त्वपूर्ण खेळीने विराटने सर्वांनाच तो किंग कोहली का आहे हे पटवून दिले. ३५ वर्षीय विराट कोहली हा विश्वचषकाच्या इतिहासातील एकमेव क्रिकेटपटू बनला आहे ज्याने पांढऱ्या चेंडूच्या क्रिकेटमधील सर्व ट्रॉफी आपल्या नावे केल्या आहेत.

हेही वाचा – T20 World Cup Prize Money: भारताने टी-२० वर्ल्डकप जिंकताच कोट्यवधींचा वर्षाव, दक्षिण आफ्रिकालाही मिळाली मोठी बक्षिसाची रक्कम

T20 विश्वचषक ट्रॉफीचे जेतेपद पटकावताच कोहलीने त्याच्या कारकिर्दीत ४ व्हाईट-बॉल ICC ट्रॉफी जिंकल्या आहेत. विराटने २००८ मध्ये १९ वर्षांखालील वर्ल्डकप जिंकला होता, त्यानंतर २०११ चा वर्ल्डकप, २०१३ची चॅम्पियन्स ट्रॉफी आणि आता २०२४ चा टी-२० वर्ल्डकप जिंकणारा विराट कोहली एकमेव खेळाडू आहे.

विराट कोहलीने जिंकलेल्या आयसीसी ट्रॉफी

१९ वर्षांखालील वर्ल्डकप – २००८
एकदिवसीय विश्वचषक – २०११
चॅम्पियन्स ट्रॉफी – २०१३
टी-२० विश्वचषक – २०२४

विराटच्या ट्रॉफी कलेक्शनमध्ये आता एकमेव ट्रॉफी बाकी आहे ती म्हणजे कसोटी चॅम्पियनशिप. कोहलीने त्याच्या कारकिर्दीत दोन आयसीसी कसोटी चॅम्पियनशिप फायनलमध्ये भाग घेतला आहे, परंतु दोन्ही प्रसंगी भारताला पराभवाचा सामना करावा लागला. टी-२० विश्वचषकाचे जेतेपद पटकावल्यानंतर विराटने टी-२० क्रिकेटला अलविदा केलं आहे.