ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या टी२० विश्वचषक २०२२च्या स्पर्धेत भारताला उपांत्य फेरीत इंग्लंडकडून १० विकेट्सने दारूण पराभव स्विकारावा लागला. या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना ६ विकेट्स गमावत १६८ धावा केल्या. या सामन्यात विराट कोहली याच्या फलंदाजीवर भारताच्या माजी प्रशिक्षकाने प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. सध्या विराट कोहली मायदेशात परतला असून मुंबई विमानतळावर त्याचे आगमन झाल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
१८ नोव्हेंबरपासून न्यूझीलंड मालिका सुरू होत आहे. या मालिकेत तीन टी२० आणि तीन एकदिवसीय सामने खेळवले जाणार आहेत. टीम इंडियाच्या वरिष्ठ खेळाडूंना न्यूझीलंड दौऱ्यासाठी विश्रांती देण्यात आली आहे. त्यात विराट कोहली, रोहित शर्मा आणि केएल राहुल यांचा समावेश आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेनुसार, आता मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनाही या मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली आहे. त्यांच्या जागी राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे संचालक आणि माजी अनुभवी फलंदाज व्हीव्हीएस लक्ष्मण हे टीम इंडियाच्या कार्यवाहक मुख्य प्रशिक्षकाची जबाबदारी स्वीकारतील.
टीम इंडिया विश्वचषकातून बाहेर पडल्यानंतर चोहीकडून सध्या टीकेचा भडीमार सुरु आहे. त्यामुळे भारतीय संघांचे खेळाडू हे तणावात असतील असे वाटत होते. मात्र विराट कोहली मायदेशात येताच त्याचे मुंबई विमानतळावर स्वागत करण्यात आले. अनेक चाहत्यांनी त्याच्यासोबत फोटो देखील काढले. त्याच्याबॉडी लँग्वेजकडे बघून तो खूप शांत आणि संयमी वाटत आहे. त्याच्यावर कुठल्याही प्रकारचा दबाव आहे असे वाटत नव्हते.
न्यूझीलंड दौऱ्यावर असलेल्या टी२० मालिकेत हार्दिक पांड्या टीम इंडियाचे नेतृत्व करणार आहे. त्याचबरोबर शिखर धवन वनडे मालिकेत कर्णधार असेल. रोहित शर्मासह इतर दिग्गज खेळाडू पुढील महिन्यात बांगलादेश दौऱ्यावर टीम इंडियात परतणार आहेत. टीम इंडिया बांगलादेश दौऱ्यावर तीन एकदिवसीय आणि दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. ४ डिसेंबरपासून सुरू होणार आहे. इंग्लंडविरुद्धच्या पराभवानंतर भारतीय खेळाडूंनी पुनरागमन करण्यास सुरुवात केली आहे. कोहली आधीच ॲडलेडहून निघून गेला आहे. त्याचवेळी रोहित आणि राहुलही लवकरच भारताला रवाना होणार आहेत.