विराट कोहलीने अगदी शेवटच्या चेंडूपर्यंत लढवलेली खिंड, युवा अर्शदीप सिंगचा भेदक मारा आणि हार्दिक पंड्याच्या अष्टपैलू योगदानामुळे भारतीय संघाने टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत विजयारंभ केला. रविवारी ‘अव्वल १२’ फेरीच्या चित्तथरारक सामन्यात भारताने पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानवर चार गडी राखून सरशी साधली. या विजयाचा खरा शिल्पकार ठरला तो विराट कोहली. काही महिन्यांपूर्वी कोहलीच्या भारतीय टी-२० संघातील स्थानाबाबत प्रश्न उपस्थित केले जात होते. मात्र, रविवारी मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर (एमसीजी) ९० हजारहून अधिक प्रेक्षकांच्या उपस्थितीत झालेल्या सामन्यात कोहलीने आपल्या टीकाकारांना चोख प्रत्युत्तर दिले. कोहलीने ५३ चेंडूंत सहा चौकार आणि चार षटकारांच्या साहाय्याने नाबाद ८२ धावांची खेळी करताना भारताचा विजय साकारला. या विजयानंतर विराटची पत्नी अभिनेत्री अनुष्का शर्माने इन्स्टाग्रामवर एक खास पोस्ट केली आहे. त्यामुळे अनुष्काही चर्चेत आहे. असं असतानाच विराटने सामन्यानंतर अनुष्काशी फोनवर बोलणं झाल्याची माहिती दिली आहे.

नक्की वाचा >> Ind vs Pak: बोल्ड झाल्यानंतरही विराट तीन धावा का पळाला अन् सामना संपताना नाबाद कसा राहिला? टर्निंग पॉइण्ट ठरले ‘ते’ दोन चेंडू

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ८ बाद १५९ अशी धावसंख्या केली. भारताने १६० धावांचे लक्ष्य सहा गडय़ांच्या मोबदल्यात अखेरच्या चेंडूवर गाठले. आव्हानाचा पाठलाग करताना भारताच्या डावाची सुरुवात अडखळती झाली. नसीम शाहने सलामीवीर केएल राहुल (४), तर हॅरिस रौफने कर्णधार रोहित शर्मा (४) आणि सूर्यकुमार यादव (१५) यांना झटपट माघारी पाठवले. त्यामुळे पॉवर-प्लेच्या सहा षटकांअंती भारताची ३ बाद अशी स्थिती होती. डावखुऱ्या अक्षर पटेलला पाचव्या क्रमांकावर बढती मिळाली. परंतु त्याच्यात आणि कोहलीमधील ताळमेळ चुकला. त्यामुळे अक्षर (२) धावबाद झाली.

कोहली आणि हार्दिक या अनुभवी जोडीने भारताचा डाव सावरला. ‘एमसीजी’च्या मोठय़ा मैदानावर या जोडीने एक-दोन धावा काढून धावफलक हलता ठेवण्याला प्राधान्य दिले. १० षटकांअंती भारताची ४ बाद ४५ अशी धावसंख्या होती आणि विजयासाठी ११५ धावांची आवश्यकता होती. पुढील पाच षटकांत मिळून या दोघांनी ५५ धावांची भर घातली. पुढील दोन षटकांत मिळून केवळ १२ धावा झाल्या. हा सामना भारतीय संघाच्या हातून निसटणार असे वाटत होते. त्याच वेळी कोहलीने शाहीन आफ्रिदीने टाकलेल्या १८व्या षटकात तीन चौकार मारले. पुढील षटकात त्याने रौफच्या गोलंदाजीवर दोन षटकार मारत दडपण कमी केले.

नक्की वाचा >> Ind vs Pak: अनुष्का शर्माच्या ‘त्या’ पोस्टला ४७ लाखांहून अधिक Likes; विराट कोहली ही कमेंट करत म्हणाला, “प्रत्येक क्षणी माझ्या…”

भारताला विजयासाठी अखेरच्या षटकात १६ धावांची गरज होती. डावखुरा फिरकीपटू मोहम्मद नवाजने पहिल्या चेंडूवर हार्दिकला (३७ चेंडूंत ४० धावा) बाद केले. हार्दिक आणि कोहलीने ११३ धावांची भागीदारी रचली. त्यानंतरच्या दोन चेंडूंवर मिळून तीन धावाच निघाल्या. मात्र, नवाजचा पुढील चेंडू ‘नो-बॉल’ ठरला. कमरेवरील हा चेंडू कोहलीने सीमारेषेबाहेर पोहोचवला. त्यानंतर नवाजने वाइड चेंडू टाकला. भारताला तीन चेंडूंत पाच धावांची गरज असताना नवाजने कोहलीच्या यष्टी उडवल्या. मात्र, चेंडू ‘फ्री-हिट’ असल्याने कोहली बाद झाला नाही, शिवाय चेंडू यष्टीला लागून मागच्या दिशेने गेल्याने भारताला तीन धावा करता आल्या. पुढील चेंडूवर दिनेश कार्तिक बाद झाला. मात्र, त्यानंतर वाइड चेंडू आणि मग अश्विनने एक धाव काढून भारताचा विजय सुनिश्चित केला.

नक्की वाचा >> Ind vs Pak: शेवटच्या दोन ओव्हर पाहण्यासाठी उड्डाण पाच मिनिटांनी लांबवलं? विमान मुंबई एअरपोर्टच्या रनवेवर धावत असतानाच…

सामना संपल्यानंतर पारितोषक वितरण समारंभ झाल्यानंतर दिलेल्या मुलाखतीमध्ये ३३ वर्षीय विराटने आपलं अनुष्काशी फोनवर बोलणं झालं अशी माहिती दिली. तसेच ती सध्या फार आनंदात असल्याचं त्याने सांगितलं. “मी माझी पत्नी अनुष्काबरोबर बोललो. ती फार आनंदात आहे. तिने मला केवळ एकच गोष्ट सांगितली की, ‘इथे लोक फार आनंदात आहेत. ते मला फोन करुन आनंद व्यक्त करत आहेत. नेमकं काय करायचं मला कळत नाहीय.’ त्यामुळे बाहेर नेमकं काय सुरु आहे मला ठाऊक नाही. मैदानावर जाऊन खेळायचं एवढच माझं काम आहे,” असं विराट अनुष्कासोबतच्या संभाषणाबद्दल म्हणाला.

मराठीतील सर्व T20 World Cup बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Virat kohli reveals conversation with wife anushka sharma after india t20 world cup win vs pakistan scsg