Virat Kohli Reveals Story Of Photo With Rohit Sharma: भारतीय संघाने टी-२० विश्वचषक २०२४ चे जेतेपद पटकावत १४ वर्षांनंतर आयसीसी ट्रॉफीवर आपले नाव कोरले. भारतीय संघासाठी आणि संपूर्ण भारतासाठी हा खरोखरच भावनिक आणि अविस्मरणीय क्षण होता. भारताच्या विजयानंतर खेळाडू आणि टीम मॅनेजमेंटचे अनेक फोटो व्हायरल झाले, त्यातील एक फोटो क्रिकेट चाहत्यांच्या हृदयात घर करून बसला आहे आणि तो फोटो म्हणजे रोहित आणि विराटचा. विराट कोहली आणि रोहित शर्माने भारताचा तिरंगा खांद्यावर घेत वर्ल्ड कप ट्रॉफीसोबत फोटो काढला, जो खूप व्हायरल होत आहे. या फोटोमागची कहाणी विराट कोहलीने सांगितली आहे, ज्याचा व्हीडिओ सध्या व्हायरल होत आहे.
रोहित शर्माने आयसीसी टी-२० विश्वचषक २०२४ जिंकल्यानंतर लगेचच टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. त्याच्या काही मिनिटांपूर्वी, विराट कोहलीनेही अंतिम सामन्यात संघाला गरज असताना ७६ धावांची महत्त्वपूर्ण खेळी करत सामनावीराचा पुरस्कार पटकावला. या पुरस्कारानंतर बोलताना विराटनेही टी-२० फॉरमॅटला निरोप दिला. यांनतर रविवारी रवींद्र जडेजानेही या दोघांप्रमाणेच टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली.
विराट कोहलीने येऊन रोहितच्या हातात विजयाटी ट्रॉफी दिली आणि मग त्या दोघांनी खांद्यावर तिरंगा घेत एक फोटो काढला. हा फोटो सर्वच भारतीयांसाठी एक भावुक क्षण होता. रोहित शर्मा आणि विराट कोहली ही दोन नावे भारतीय चाहत्यांसाठी खूपच जिव्हाळ्याचा विय आहेत. या दोघांचा एकत्र फोटो म्हणजे सर्वांसाठीच एक मोठा क्षण होता. भारताच्या विजयानंतर स्टार स्पोर्ट्शी बोलताना विराट कोहलीने त्या दोघांच्या या आय़कॉनिक फोटोबद्दल सांगितले.
विराट म्हणाला, “विश्वचषक जिंकणं ही रोहितसाठीही खूप खास गोष्ट आहे. त्याचे कुटुंब इथे आहे, समायरा त्याच्या खांद्यावर होती. पण व्हिक्टरी लॅपच्या वेळेस मला तो संपूर्ण वेळ सर्वांच्या मागे दिसत होता. मी त्याला म्हणालो, तू पण ट्रॉफी थोडावेळ धर, दोन मिनिटं तरी. आपणही एकत्र फोटो काढला पाहिजे कारण हा प्रवास खरंच खूप मोठा होता.”
विराट कोहलीने भारतासाठी क्रिकेट खेळताना रोहितसोबतच्या त्याच्या प्रवासाबद्दलही सांगितले. विराटने सांगितले की, कर्णधारपदाची भूमिका दोघांमध्ये बदलूनही, त्यांचे ध्येय हे कायम भारतीय क्रिकेटला पुढे नेण्यावर केंद्रित होते. “मी आणि तो इतकी वर्षे एकत्र खेळत आहोत आणि भारताने वर्ल्डकप जिंकावा यासाठी कायमचं सर्वाेत्परी प्रयत्न केले. कर्णधार नेता, नेता कर्णधार पण आम्ही फक्त एकाच गोष्टीसाठी काम केले आहे, ते म्हणजे भारतीय क्रिकेट. तो फोटो भारतीय क्रिकेटला समर्पित करण्यासाठी होता.,”