टी-२० विश्वचषक २०२२ चा ३६ वा सामना पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सिडनी क्रिकेट मैदानावर खेळला जात आहे. या सामन्यात पाकिस्तानचा युवा फलंदाज मोहम्मद हॅरिसने २५४.५५च्या स्ट्राईक रेटने तुफानी पद्धतीने २८ धावा केल्या. हरिसची खेळी छोटी होती, मात्र यादरम्यान युवा फलंदाजाने सर्वांची मनं जिंकली. हॅरिसने दक्षिण आफ्रिकेचा एनरिक नॉर्खियाच्या गोलंदाजीवर स्कूप शॉट मारला. जो पाहून सर्वजण थक्क झाले आणि या घटनेचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
ही घटना पाकिस्तानच्या डावाच्या पाचव्या षटकात घडली. एनरिक नोर्खियाच्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर २१ वर्षीय हॅरिसने हुशारी दाखवत स्वत:कडे वेगाने येणाऱ्या चेंडूवर स्कूप शॉट खेळताना करिष्माई षटकार ठोकला. एवढेच नाही तर याआधीही हॅरिसने वर्ल्ड क्लास बॉलर कागिसो रबाडाला दोन षटकार आणि एक चौकार लगावला होता. हॅरिसचा स्कूप शॉट पाहून एनरिक नॉर्खियाही थक्क झाला.
२१ वर्षीय मोहम्मद हॅरीस हा यष्टिरक्षक फलंदाज असून त्याला पाकिस्तानचा स्टार फलंदाज फखर जमानच्या दुखापतीमुळे १५ सदस्यीय संघात सामील करण्यात आले आहे. फखर जमानच्या गुडघ्याला दुखापत झाल्यामुळे तो स्पर्धेतून बाहेर पडला आहे.
या सामन्यात मोहम्मद हॅरीस तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला, त्यानंतर त्याने २ चौकार आणि ३ षटकारांच्या जोरावर २८ धावा केल्या. हॅरिसची खेळी छोटी, पण आकर्षक होती. त्याच्याकडे बघून त्याला पॉवरप्लेचा फायदा घ्यायचा आहे, असे वाटत होते. अलीकडेच, पाकिस्तानच्या दिग्गजाने म्हटले होते की, पाकिस्तानचे फलंदाज ३६० सोडाच, जरी ते १८० अंशात खेळले तरी ते खूप काही आहे. पण आता हॅरिसला पाहता तो ३६० अंशात सुद्धा खेळू शकतो असे दिसते.