India vs Australia, St Lucia weather report: २०२३ च्या विश्वचषकात घरच्या मैदानावर भारताला ऑस्ट्रेलियाच्या वादळी खेळीमुळे पराभवाचा सामना करावा लागला होता. कोट्यवधी भारतीयांच्या जिव्हारी लागलेल्या या पराजयाचा बदला घेण्यासाठी आता आठ महिन्यांनी पुन्हा संधी चालून आली आहे. २०२४ च्या टी २० विश्वचषकाच्या गट २ मधील दुसऱ्या सुपर आठ सामन्यात रविवारी किंग्सटाउन येथे ऑस्ट्रेलियाला अफगाणिस्तानने हरवल्यामुळे अगोदरच स्पर्धेला रंजक वळण आलं आहे. मिचेल मार्श व टीमला भारतासह उपांत्य फेरी गाठणे सहज वाटत असताना अचानक रशीद खानच्या नेतृत्वाखालील संघाने विजय नावावर करून भारत व ऑस्ट्रेलिया दोघांसाठीही पुढील समीकरणे कठीण केली आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एकीकडे आज, सोमवारी २४ जूनला ऑस्ट्रेलियाला पराभूत केल्यास भारताला सलग तिसऱ्यांदा उपांत्य फेरी गाठून आपला बदला पूर्ण करता येईल, पण समजा हा सामना चुकून भारताच्या हातून निसटला तर भारतच कदाचित स्पर्धेतून बाहेर पडेल. तसेच ऑस्ट्रेलिया व अफगाणिस्तानचे संघ उपांत्य फेरी गाठू शकतील. आजच्या सामन्यात भारतीय खेळाडूंचं कसब व ऑस्ट्रेलियाची ताकद या सगळ्यासह सेंट लुसियामध्ये पावसाची स्थिती कशी आहे हा मुद्दा सुद्धा मोठी भूमिका पार पाडू शकतो.

Accuweather नुसार, सोमवार सकाळचा अंदाज असा आहे की, आज अधूनमधून पाऊस आणि गडगडाटासह ढगाळ वातावरण असणार आहे. स्थानिक वेळेनुसार सकाळी ७ ते ९ च्या दरम्यान मुसळधार पावसाची शक्यता आहे आणि पर्जन्यवृष्टीची शक्यता ६५ टक्क्यांपेक्षा जास्त आहे. तर स्थानिक वेळेनुसार सकाळी १०.३० वाजता सुरू होणाऱ्या सामन्याच्या वेळेत वातावरण ढगाळ राहण्याची अपेक्षा आहे. जरी सेंट लुसियाला सामना सुरू होण्यापूर्वी मुसळधार पाऊस पडला तरी सामना सुरु होण्यास उशीर होण्याची शक्यता आहे. असे झाल्यासही सुपर आठ सामन्यात अडथळा येऊ शकतो. कारण हवामानाच्या अंदाजानुसार दुपारच्या वेळी गडगडाटासह पुन्हा वादळाची शक्यता देखील आहे.

हे ही वाचा<< IPL मध्ये भयंकर ट्रोल झालेल्या हार्दिक पांड्याला विश्वचषकात यश; आता रवी शास्त्रींना रोखठोक उत्तर देत म्हणाला, “फक्त एक वर्ष..”

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामना वाहून गेला तर काय होईल?

इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिल (ICC) ने सुपर आठ सामन्यांसाठी राखीव दिवसाची कोणतीही तरतूद केलेली नाही आणि त्यामुळे सेंट लुसिया येथील ग्रोस आयलेट येथील डॅरेन सॅमी नॅशनल क्रिकेट स्टेडियमवरील सामना वाहून गेल्यास भारत आणि ऑस्ट्रेलियाला प्रत्येकी एक गुण मिळेल. निकाल न लागल्यास भारताचे विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत स्थान पक्के होईल. व ऑस्ट्रेलियाची गुणसंख्या तीन होईल. भारताच्या विरुद्ध स्पॉटसाठी जर बांगलादेशने अफगाणिस्तानला हरवलं किंवा किंग्सटाउनमधील सुपर आठ सामनाही वाहून गेला तरच ऑस्ट्रेलियाच्या आशा कायम राहतील. कारण बांगलादेश-अफगाणिस्तान सामन्याचा निकाल न लागल्यास, तीन सामन्यांत समान गुण असूनही ऑस्ट्रेलिया उत्कृष्ट निव्वळ धावगतीने पात्र ठरेल.

मराठीतील सर्व T20 World Cup बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Weather forecast 24th june in marathi ind vs aus match if washed out due to rain who will reach t20 world cup semis team india playing xi svs
Show comments