दमदार फॉर्मात असलेल्या यजमान वेस्ट इंडिजने टी२० वर्ल्डकप स्पर्धेत सहयजमान अमेरिकेवर दणदणीत विजय मिळवला. या विजयासह वेस्ट इंडिजने रनरेट मजबूत केला असून सेमी फायनलच्या दिशेने पाऊल टाकलं आहे. आमच्यासाठी हा सामना महत्त्वाचा होता असं अष्टपैलू आंद्रे रसेलने सांगितलं. त्यातूनच वेस्ट इंडिजसाठी या विजयाचं महत्त्व अधोरेखित होतं. अमेरिकेने पाकिस्तानला नमवलं होतं. भारताविरुद्ध चांगली झुंज दिली होती. वेस्ट इंडिजसमोर मात्र त्यांनी सपशेल शरणागती स्वीकारली.
वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. अकेल हुसेन, गुदकेश मोटी आणि रॉस्टन चेस या फिरकी त्रिकुटाभोवती वेस्ट इंडिजने आक्रमण केंद्रित केलं होतं. अमेरिकेच्या फलंदाजांनी पॉवरप्लेचा पुरेपूर फायदा उठवला. त्यांनी अर्धशतकही फलकावर नोंदवलं मात्र यानंतर वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांनी टिच्चून गोलंदाजी केली. अमेरिकेने नियमित अंतरात विकेट्स गमावल्या. अँड्रियस गौसने २९ तर नितीश कुमारने २० धावांची खेळी केली. कर्णधार आरोन जोन्स आणि अनुभवी कोरे अँडरसनकडून अमेरिकेला मोठ्या अपेक्षा होत्या पण ते मोठी खेळी करू शकले नाहीत. रॉस्टन चेसने १९ धावात ३ तर रसेलने ३१ धावात ३ विकेट्स पटकावल्या. अल्झारी जोसेफने त्यांना चांगली साथ दिली. अमेरिकेचा डाव १२८ धावातच आटोपला.
सुपर८च्या पहिल्या लढतीत वेस्ट इंडिजचा सलामीवीर ब्रँडन किंग दुखापतग्रस्त झाला होता. त्याच्या जागी शे होपला सलामीला येण्याची संधी मिळाली. त्याने ३९ चेंडूत ४ चौकार आणि ८ षटकारांसह नाबाद ८२ धावांची खेळी करत या संधीचं सोनं केलं. निकोलस पूरनने १२ चेंडूत २७ धावा करत त्याला चांगली साथ दिली. वेस्ट इंडिजने ८ विकेट्स आणि ५५ चेंडू राखून विजय मिळवला. वेस्ट इंडिजला इंग्लंडविरुद्ध पराभवाला सामोरं जावं लागलं होतं. पण ही लढत जिंकल्याने त्यांचा रनरेट १.८१४ असा झाला आहे. आता त्यांचा मुकाबला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणार आहे. आफ्रिकेने स्पर्धेत आतापर्यंत एकही लढत गमावलेली नाही.
दरम्यान ब्रँडन किंगला दुखापतीतून सावरायला वेळ लागणार असल्याने तो उर्वरित सामने खेळू शकणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे. इंग्लंडविरुद्ध खेळताना किंगला दुखापत झाली होती. किंगऐवजी काईल मेयर्सचा संघात समावेश करण्यात आला आहे. धडाकेबाज सलामीवीर, उपयुक्त मध्यमगती गोलंदाज आणि उत्तम क्षेत्ररक्षक अशी मेयर्सची ओळख आहे. आयपीएल स्पर्धेत मेयर्स लखनौ सुपरजायंट्स संघाकडून खेळतो.