ऑस्ट्रेलियाचा कर्णधार आणि वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सने टी२० वर्ल्डकप स्पर्धेत बांगलादेशविरुद्ध हॅट्ट्र्रिक घेतली. कोणत्याही गोलंदाजासाठी तीन चेंडूत तीन विकेट मिळवणं हा सर्वोत्तम आनंदाचा क्षण. वर्ल्डकपसारख्या मोठ्या स्पर्धेत हॅट्ट्रिक मिळवणं आणखी विशेष असतं. पण गंमत म्हणजे पॅट कमिन्स हॅट्ट्र्रिक झालेय हे विसरूनच गेला. का? त्याचं कारणही संयुक्तिक आहे. कमिन्सने ब्रोकन हॅट्ट्र्रिक घेतली. काय असते ब्रोकन हॅट्ट्र्रिक ते समजून घेऊया.

तीन चेंडूत तीन विकेट्स पटकावल्या की हॅट्ट्र्रिक होते. पण एका षटकात दोन विकेट पटकावल्या आणि पुढच्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर विकेट मिळवली तरीही हॅट्ट्र्रिकचा विक्रम होतो. याला ब्रोकन हॅट्ट्र्रिक म्हटलं जातं. एकाच षटकात सलग तीन चेंडूत तीन विकेट्सऐवजी दोन षटकात मिळून घेतलेल्या हॅटट्रिकला ब्रोकन हॅट्ट्र्रिक म्हटलं जातं. कमिन्सच्या बाबतीत असंच काहीसं झालं.

कमिन्सने बांगलादेशच्या डावात १८व्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर महमदुल्लाला त्रिफळाचीत केलं. महमदुल्लाचा पूल करण्याचा प्रयत्न फसला आणि चेंडू स्टंप्सवर जाऊन आदळला. पुढच्याच चेंडूवर मेहदी हसनने कमिन्सच्या उसळत्या चेंडूवर अपर कट मारला. चेंडू थर्डमॅनच्या दिशेने गेला आणि अॅडम झंपाने सुरेख झेल टिपला. मेहदीला भोपळाही फोडता आला नाही. या विकेटसह १८वं षटक संपलं.

यानंतर जोश हेझलवूडने १९वं षटक टाकलं. बांगलादेशच्या फलंदाजांनी या षटकात ११ धावा काढल्या. हेझलवूडने या षटकात विकेट मिळाली नाही. त्याने ४ षटकात २५ धावा दिल्या. शेवटचं षटक टाकण्यासाठी कमिन्स आला. कमिन्स पहिल्या चेंडूआधी हॅट्ट्र्रिकवर होता. पण १० मिनिटात कमिन्स विक्रमाचं विसरुनही गेला. तौहिद हृदॉयने कमिन्सच्या स्लोअरवन चेंडूवर स्कूप करण्याचा प्रयत्न केला कारण फाईनलेगचा क्षेत्ररक्षक ३० गज वर्तुळात होता. तौहिदचा प्रयत्न फसला आणि जोश हेझलवूडने शॉर्ट फाईनलेगला झेल टिपला. सहकाऱ्यांनी कमिन्सच्या दिशेने धाव घेत त्याचं कौतुक केलं. मैदानात हॅट्ट्र्रिकची घोषणा आणि फलक झळकताच कमिन्सने चाहत्यांना अभिवादन केलं.

सामना संपल्यानंतर बोलताना कमिन्सने सांगितलं की, ‘दोन षटकांमध्ये मिळून हॅट्ट्र्रिक झाल्याने मी एकदमच विसरून गेलो. स्टॉइनस माझं अभिनंदन करण्यासाठी धावत आला, त्यानंतर माझ्या लक्षात आलं. हॅट्ट्र्रिक मिळाल्याने आनंदी आहे’.

टी२० वर्ल्डकपमध्ये हॅट्ट्र्रिक पटकावणारा कमिन्स ऑस्ट्रेलियाचा दुसरा गोलंदाज ठरला आहे. २००७ मध्ये झालेल्या पहिल्यावहिल्या टी२० वर्ल्डकपमध्ये ब्रेट ली याने बांगलादेशविरुद्धच हॅट्ट्र्रिक घेतली होती.

कमिन्सला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आलं. ऑस्ट्रेलियाने गटवार लढतीत चारपैकी चारही सामन्यात विजय मिळवला होता. सुपर८च्या पहिल्या लढतीत ऑस्ट्रेलियाने बांगलादेशला नमवत दमदार सलामी दिली.