Ravichandran Ashwin Blunt As Ever On Gulbadin Naib Fake Injury : भारताचा दिग्गज ऑफ-स्पिनर रविचंद्रन अश्विनला वाटते की सध्याच्या टी-२० विश्वचषकात अफगाणिस्तानच्या गुलबदिन नईबचा मैदानावरील दुखापतीचे नाटक त्याच्या संघासाठी योग्य होते. कारण त्याच्या संघासाठी सुपर-८ मधील महत्त्वाच्या ‘करा किंवा मरो’ सामन्यात हे घडले. नईब स्लिप कॉर्डनमध्ये क्षेत्ररक्षण करत होता आणि १२ व्या षटकात मांडी धरून त्याच्या पाठीवर पडला. त्याचवेळी प्रशिक्षक जोनाथन ट्रॉट यांनी पावसामुळे खेळ संथ करण्याचे संकेत दिले होते. यावरुन आता बरीच चर्चा होत आहे.
रविचंद्रन अश्विनची प्रतिक्रिया –
रविचंद्रन अश्विनने त्याच्या यूट्यूब चॅनलवर सांगितले की, “जोनाथन ट्रॉट ड्रेसिंग रूममधून खेळाचा वेग कमी करण्याचे संकेत देत होता आणि त्यानंतर नईब तुटलेल्या झाडाच्या फांदीप्रमाणे मैदानावर कोसळला. प्रत्येकजण त्याला यासाठी शिक्षा झाली पाहिजे असे म्हणत आहे. पण तो आपल्या देशासाठी खेळतोय आणि वर्ल्ड कप क्वालिफायर जिंकण्याचा प्रयत्न करत होता.” याआधी अश्विनने त्याच्या ‘एक्स’ अकाऊंटवर ‘गुलबदीन नईबसाठी रेड कार्ड’ असे गमतीने म्हटले होते. यावर गुलबदीन नईबने अश्विनला प्रत्युत्तर देताना म्हटले की,”कभी खुशी कभी गम में होता है. हॅमस्ट्रिंग.”
आयसीसीचा नियम काय आहे?
आयसीसीच्या नियमांनुसार, “एखाद्या खेळाडूला जाणीवपूर्वक किंवा वारंवार सामन्याचा वेळ वाया घालवल्याबद्दल दोन सामन्यांची बंदी लागू शकते. तथापि, अशा प्रकरणांमध्ये, सामना रेफरीच्या पहिल्या आणि अंतिम इशाऱ्यामुळे नईबला होणार दंड टळला जाऊ शकतो.” गुलबदीनच्या या घटनेचा सामन्यावर फारसा परिणाम झाला नाही कारण सामन्यातून केवळ एक षटक कमी करण्यात आले आणि सुधारित लक्ष्य ११४ दिले गेले. सामना पुन्हा सुरू झाल्यानंतर पुढच्याच षटकात गुलबदिन पुन्हा मैदानात आला आणि त्याने तंजीम हसनची विकेट घेतली.
हेही वाचा – IND vs ENG Semi Final 2 Live : पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोणत्या संघाला होणार फायदा?
इयान स्मिथ काय म्हणाले?
या सामन्यात समालोचन करत असलेले इयान स्मिथ म्हणाले, “माझे गुडघे गेल्या सहा महिन्यांपासून दुखत आहेत. मी सामन्यानंतर लगेच गुलबदिनच्या डॉक्टरांना भेटेन. सध्या हे डॉक्टर जगातील ८वे आश्चर्य आहेत.”माजी इंग्लिश क्रिकेटपटू मायकेल वॉनने या घटनेवर विनोदी पद्धतीने प्रतिक्रिया देत एक्सवर पोस्ट शेअर केली आणि म्हणाले, क्रिकेटचा आत्मा अजूनही जिवंत आहे आणि पुढे जात आहे. तर पुढच्या पोस्टमध्ये म्हणाले, दुखापत झाल्यानंतर अवघ्या २५ मिनिटांत विकेट घेणारा गुलबदिन इतिहासातील पहिला खेळाडू ठरला आहे, हे पाहून आनंद झाला.” तर ऑस्ट्रेलियाचा स्टार फिरकीपटू ॲडम झाम्पाने इंस्टाग्रामवर एक स्टोरी पोस्ट केली आणि लिहिले, ओल्ड रेनन्स्ट्रिंग, म्हणजे पावसामुळे हॅमस्ट्रिंगची समस्या आली.
हेही वाचा – IND vs ENG सामन्यावर पावसाचे सावट? जाणून घ्या सेमीफायनल सामन्याठीचा ‘वेदर रिपोर्ट’
यानंतर पहिल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने अफगाणिस्तानचा पराभव करत टी-२० विश्वचषकाच्या इतिहासात प्रथमच अंतिम फेरी गाठली आहे. यंदाच्या विश्वचषकातील पहिला उपांत्य सामना दक्षिण आफ्रिका आणि अफगाणिस्तान यांच्यात त्रिनिदाद येथील ब्रायन लारा क्रिकेट स्टेडियमवर खेळवला गेला. यासह अफगाणिस्तान संघाचे प्रथमच विश्वचषक फायनल खेळण्याचे स्वप्न अधुरेच राहिले. दक्षिण आफ्रिकेने हा सामना ९ विकेट्सने जिंकला, अफगाणिस्तानचा संघ प्रथम फलंदाजी करताना ५६ धावा करून सर्वबाद झाला. तर दक्षिण आफ्रिकेने ८.५ षटकांत ५७ धावांचे लक्ष्य गाठले. दक्षिण आफ्रिकेसाठी रीझा हेंड्रिक्स २९ धावा करून नाबाद परतला आणि कर्णधार एडन मारक्रम २३ धावा करून नाबाद परतला. अफगाणिस्तानकडून फजलहक फारुकीने एकमेव विकेट घेतली.