Where to watch live streaming of India vs Bangladesh match : टीम इंडिया ५ जून रोजी रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टी-२० विश्वचषक मोहिमेला सुरुवात करणार आहे, मात्र त्याआधी संघ शनिवारी बांगलादेशविरुद्ध सराव सामना खेळणार आहे. मुख्य स्पर्धेत प्रवेश करण्यापूर्वी भारत एकच सराव सामना खेळणार आहे आणि लवकरात लवकर न्यूयॉर्कमधील परिस्थितीशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करेल. यावेळी अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये टी-२० विश्वचषकाचे आयोजन करण्यात आले आहे. तत्पूर्वी हा सराव सामना कधी आणि कुठे पाहता येणार? याबद्धल जाणून घेऊया.
कोहलीच्या खेळण्यावर साशंकता कायम –
भारतीय संघ २६ मे रोजी अमेरिकेत पोहोचला आणि बुधवारपासून संघाने सराव सत्राला सुरुवात केली. विराट कोहली वगळता टीमचे सर्व सदस्य न्यूयॉर्कला पोहोचले आहेत. कोहलीही गुरुवारी रात्री न्यूयॉर्कला रवाना झाला आणि लवकरच संघात सामील होईल, परंतु सराव सामन्यातील त्याच्या सहभागावर शंका कायम आहे. बांगलादेशचा पहिला सराव सामना अमेरिकेविरुद्ध होता, जो पावसामुळे रद्द झाला होता. या स्पर्धेपूर्वी बांगलादेशचा अमेरिकेकडून तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेत २-१ असा पराभव झाला होता.
दोन्ही संघांमध्ये रोमांचक सामना पाहायला मिळण्याची शक्यता –
सराव सामन्यात भारत आणि बांगलादेशचे संघ आमनेसामने येणार असले, तरी दोन्ही संघांमधील इतिहास लक्षात घेता चाहत्यांना एक रोमांचक सामना पाहायला मिळेल. भारतीय संघाचा बांगलादेशवर वरचष्मा असून आतापर्यंत दोन्ही संघांमधील १३ पैकी १२ सामने भारताने जिंकले आहेत. टी-२० विश्वचषकाच्या मागील हंगामात दोन्ही संघांमध्ये चुरशीचे सामने झाले आहेत.
हेही वाचा – Norway Chess 2024 : भारतीय ग्रँडमास्टर आर प्रज्ञानंदने गमावली आघाडी, हिकारू नाकामुराविरुद्ध पराभूत
भारत-बांगलादेश यांच्यातील सराव सामना कधी आहे?
भारत आणि बांगलादेश यांच्यात टी-२० विश्वचषक २०२४ चा सराव सामना शनिवार, १ जून रोजी होणार आहे.
भारत-बांगलादेश यांच्यातील सराव सामना कुठे होणार?
भारत आणि बांगलादेश यांच्यातील सराव सामना न्यूयॉर्कमधील नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे.
भारत विरुद्ध बांगलादेश सराव सामना कधी सुरू होणार?
भारत आणि बांगलादेश यांच्यातील सराव सामना भारतीय वेळेनुसार रात्री ८ वाजता खेळवला जाईल. नाणेफेक संध्याकाळी ७.३० वाजता होईल.
हेही वाचा – ENG vs PAK 4th T20 : बाबर आझमने मोडला विराट कोहलीचा विक्रम, इंग्लंडविरुद्ध केला ‘हा’ खास पराक्रम
सामना कोणत्या टीव्ही चॅनलवर प्रसारित होणार?
२०२४ च्या टी-२० विश्वचषकाच्या प्रसारणाचे अधिकार स्टार स्पोर्ट्सकडे आहेत. इंग्लिशमध्ये लाइव्ह कॉमेंट्री स्टार स्पोर्ट्स 1 एचडी/एसडीवर उपलब्ध असेल आणि हिंदी कॉमेंट्री स्टार स्पोर्ट्स हिंदी एचडी/एसडीवर उपलब्ध असेल. हिंदी आणि इंग्रजी व्यतिरिक्त, स्टार स्पोर्ट्स चॅनल बंगाली, कन्नड, तेलगू आणि तामिळसह इतर भाषांमध्ये लाइव्ह कॉमेंट्री प्रदान करेल.
फोन किंवा लॅपटॉपवर लाइव्ह सामना कुठे बघता येणार?
डिस्ने प्लस हॉटस्टार ॲपवर या सामन्याचे लाइव्ह-स्ट्रीमिंग पाहता येईल.