आजपासून सुरु होत असणाऱ्या टी-२० विश्वचषक स्पर्धेमध्ये उद्या म्हणजेच २३ ऑक्टोबर रोजी मेलबर्नच्या मैदानावर भारत आणि पाकिस्तानचे संघ आमने-सामने येणार आहेत. असं असतानाच दुसरीकडे २०२३ च्या आशिया चषक स्पर्धेसाठी भारतीय संघ पाकिस्तानला पाठवायचा की नाही यावर वाद सुरु आहेत. या साऱ्या गोंधळावर हैदराबादचे खासदार आणि ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहाद उल मुस्लिमीन म्हणजेच एमआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी या सामन्याबद्दल प्रतिक्रिया दिली आहे. भारत पाकिस्तानविरुद्ध ऑस्ट्रेलियामध्ये सामना खेळू शकतो तर पाकिस्तानमध्ये संघ पाठवण्यात काय अडचण आहे असा सवाल ओवेसींनी विचारला आहे.

ओवेसींनी दोन हजार कोटींचा उल्लेख करत हे पैसे भारतापेक्षा जास्त महत्तवाचे आहेत का असा प्रश्न विचारला आहे. “तुम्ही उद्या पाकिस्तानविरुद्ध सामना का खेळत आहात? नव्हता खेळायला पाहिजे ना. आम्ही पाकिस्तानमध्ये जाणार नाही पण ऑस्ट्रेलियामध्ये त्याच्याविरोधात खेळू. हे कोणत्या प्रकारचं प्रेम आहे? पाकिस्तानविरुद्ध खेळूच ना. तुम्ही पाकिस्ताविरोधात खेळला नाहीत तर काय होणार आहे? टीव्ही प्रक्षेपणाच्या हक्कांसाठी मिळणाऱ्या दोन हजार कोटींचा तोटा ना होईल ना? पण मग हे पैसे भारतापेक्षा अधिक महत्त्वाचं आहे का? सोडून द्या ना,” असं ओवेसी म्हणाले आहेत.

“आता मला ठाऊक नाही कोण सामना जिंकेल. मलाही भारताने जिंकावं असं वाटतंय. त्यातही शमी आणि मोहम्मद सिराजसारख्या खेळाडूंनी उत्तम कामगिरी करुन पाकिस्तानला चिरडून टाकावं,” असं ओवेसींनी भाषणादरम्यान म्हटलं आहे. “मात्र भारत जिंकला तर हे लोक स्वत:ची छाती बडवून घेत फुशारक्या मारतील. या उलट पराभव झाला तर ते त्यासाठी दोष कोणाला द्यावा याचा शोध घेतली. तुमची नेमकी अडचण काय आहे? हा क्रिकेटचा खेळ आहे याच विजय आणि पराभव होत असतो,” असं ओवेसींनी मुस्लीम खेळाडूंना लक्ष्य करण्याच्या मुद्द्यावरुन टीका करताना म्हटलं आहे. तेलंगणमधील विक्राबाद येथे ते बोलत होते.

“तुम्हाला आमच्या हिजाब, दाढी आणि आता क्रिकेटशीही अडचण आहे,” असा टोला ओवेसींनी लगावला. भारतीय क्रिकेट नियमक मंडळाचे अध्यक्ष तसेच आशियाई क्रिकेट समितीचेही प्रमुख जय शाह यांनी भारतीय संघ पाकिस्तानला जाणार नाही अशी घोषणा केल्याने पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने आक्षेप घेतला आहे. आपण ही स्पर्धाच खेळणार नाही असं पाकिस्तानने म्हटलं आहे. क्रिडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी जय शाह यांचे वडील आणि केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या केंद्रीय गृहमंत्रालयाकडून भारतीय संघाला पाकिस्तानमध्ये पाठवायचं की नाही यासंदर्भातील निर्णय घेईल असं म्हटलं आहे.

Story img Loader