PM Narendra Modis Sportsman Spirit Gets Attention Photo Viral : टी-२० विश्वचषक २०२४ चे जेतेपद पटकावल्यानंतर वादळात अडकलेला भारतीय क्रिकेट संघ अखेर चार दिवसांनंतर बार्बाडोस या कॅरेबियन बेटावरून ४ जुलै रोजी मायदेशी परतला. देशाची राजधानी दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर संघाचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. यानंतर खेळाडूंनी पंतप्रधानांच्या निवासस्थानी जाऊन नरेंद्र मोदींची भेट घेतली. पंतप्रधान मोदींनी स्पेशल ‘चॅम्पियन’ जर्सी घातलेल्या खेळाडूंबरोबर फोटोही क्लिक केले. यावेळी कॅमेऱ्यात असे काही कैद झाले, ज्यानंतर सर्वजण मोदींचे कौतुक करत आहेत.

वास्तविक, फोटो सेशन दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी टी-२० वर्ल्ड कपची ट्रॉफी स्वतः हातात घेतली नाही, तर संघाचा कर्णधार रोहित शर्मा आणि मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडचा हात धरला. ही खूप छोटी गोष्ट आहे, पण पंतप्रधान मोदींच्या या कृतीत जगविजेत्या भारतीय संघाच्या मेहनतीचा आणि आयसीसी ट्रॉफीच्या सन्मानाचा आदर दिसून येतो. मोदींची ही कृती सोशल मीडियावर खूप पसंत केली जात आहे. भारतीय पंतप्रधानांच्या ‘स्पोर्ट्समन स्पिरीट’चे लोक कौतुक करत आहेत.

पंतप्रधान मोदींनी ट्रॉफी का पकडली नाही?

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेची प्रतिष्ठित विश्वचषक ट्रॉफी ही खेळातील कर्तृत्वाची शिखरे दर्शवते. ट्रॉफीला समृद्ध इतिहास आहे. ही ट्रॉफी मिळवण्यासाठी खेळाडू वर्षानुवर्षे घाम गाळतात. रात्रंदिवस सराव करतात. हाय-व्होल्टेज दबावाच्या वातावरणाचा सामना करून ट्रॉफी जिंकली जाते, अशा परिस्थितीत ज्यांनी ट्रॉफी जिंकली आहे त्यांचाच त्यावर अधिकार आहे. कोणत्याही बाहेरच्या व्यक्तीने पकडणे किंवा स्पर्श करणे, हे त्या खेळाडूंच्या मेहनतीची छेडछाड करण्यासारखे आहे.

हेही वाचा – Jasprit Bumrah : पंतप्रधान मोदींनी ‘ज्युनियर’ बुमराहवर केला प्रेमाचा वर्षाव, जसप्रीतच्या मुलाला कडेवर घेतलेला फोटो व्हायरल

भारतात परतताच टीम इंडियाचे भव्य स्वागत –

टी-२० विश्वचषक जिंकणारा भारतीय क्रिकेट संघ गुरुवारी सकाळी विशेष विमानाने मायदेशी परतला, तेव्हा दिल्लीत रिमझिम पाऊस पडत होता. कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत विमानतळावर खेळाडूंचे चाहत्यांनी जोरदार स्वागत केले. त्यानंतर संघातील सदस्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. हवामानाची पर्वा न करता शेकडो चाहते इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर विविध घोषणांचे बॅनर घेऊन आणि राष्ट्रध्वज फडकावत खेळाडूंची एक झलक पाहण्यासाठी पोहोचले होते. त्यांनी खेळाडूंचे अभिनंदन केले. गेल्या शनिवारी टी-२० विश्वचषकाच्या अंतिम फेरीत भारताने दक्षिण आफ्रिकेचा सात धावांनी पराभव करत १७ वर्षानी दुसऱ्यांदा ट्रॉफीवर नाव कोरले.