पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहीद आफ्रिदी आणि माजी भारतीय फलंदाज गौतम गंभीर पुन्हा एकदा आमने-सामने आल्याचं चित्र पहायला मिळत आहे. गंभीरने पाकिस्तानी क्रिकेट संघाचा कर्णधार बाबर आझमवर केलेल्या टीकेला उत्तर दिलं आहे. बाबर आझम हा फार स्वार्थी क्रिकेटपटू असल्याच्या गंभीरच्या टीकेवर आफ्रिदीने प्रतिक्रिया दिली आहे. बाबर आझमला टी-२० विश्वचषक स्पर्धेमध्ये नावाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. यापूर्वी झालेल्या आशिया चषक स्पर्धेमध्येही बाबरचा फारशी चांगली कामगिरी करता आली नव्हती. आतापर्यंतच्या तीन सामन्यामध्ये बाबर आझमला भारताविरुद्ध भोपळाही फोडता आला नाही. तर झिम्बाब्वे आणि नेदरलॅण्डस् विरुद्ध प्रत्येकी चार धावा केल्या होत्या. याचाच संदर्भ देत गंभीरने बाबरवर टीका केली.
नक्की वाचा >> IND vs BAN T20 World Cup: …तर भारताचा उपांत्यफेरीतील प्रवेश कठीण; पाकिस्तानला लागणार पात्रतेची लॉटरी
बाबर आझमसंदर्भात बोलताना गंभीरने कर्णधार म्हणून बाबरने आपल्या संघासाठी खेळलं पाहिजे स्वत:साठी नाही असं म्हटलं होतं. बाबरने खालच्या क्रमांकावर फलंदाजीला यावं अशा अर्थाने गंभीरने हे विधान केलं होतं. संघाचा विचार करता फखर झमानसारख्या एखाद्या फलंदाजाला सलामीला पाठावं अशी अपेक्षा गंभीरने व्यक्त केली होती. “माझं मत विचारलं तर त्याने आधी स्वत:ऐवजी संघाचा विचार केला पाहिजे. नियोजनाप्रमाणे गोष्टी घडत नसल्या तर त्याने फखर जमानसारख्या खेळाडूला फलंदाजीसाठी वरच्या क्रमांकावर पाठवलं पाहिजे. मात्र सध्या तो जे करतोय त्याला स्वार्थ म्हणतात. एक कर्धणार म्हणून अशापद्धतीने स्वार्थीपणे वागणं हे सहज शक्य आहे. पाकिस्तानसाठी बाबर आणि रिझवानने फलंदाजीसाठी आघाडीला येऊन विक्रम करणं हे फारच सोपी गोष्ट आहे. तुम्हाला जर नेतृत्व करायचं असेल तर आधी संघाचा विचार केला पाहिजे,” असं गंभीर म्हणाला होता.
गंभीरच्या या टीकेवर आफ्रिदीने प्रतिक्रिया दिली आहे. ‘समा टीव्ही’वरील कार्यक्रमामध्ये बोलताना आफ्रिदीने गंभीरच्या विधानावर मत व्यक्त केलं. एखादा खेळाडू वाईट कामगिरी करत असेल तर तो नक्कीच टीकेस पात्र ठरतो. मात्र त्याचवेळी ही टीका त्या खेळाडूला अधिक चांगल्या दिशेने घेऊन जाणारी आणि सकारात्मक बदल घडवणारी असायला हवी, असं आफ्रिदीने म्हटलं आहे. “या स्पर्धेनंतर प्रयत्न करुयात की बाबर त्याच्याबद्दल काहीतरी बोलेल. कारण मालिकेनंतर तो (गंभीरसुद्धा) थेट घरीच जाणार आहे,” असा खोचक टोला आफ्रिदीने लगावला. या टीकेमधून आफ्रिदाला गंभीरने बाबरवर केलेली टीका ही केवळ प्रसिद्धीसाठी आणि चर्चेत येण्यासाठी आहे, असं सूचित करायचं आहे.
“टीका कायमच होत असते मात्र टीका करताना कोणते शब्द वापरतो याबद्दल विचार केला पाहिजे आणि शब्दांची निवडही तशीच हवी. टीकेमधील शब्दांमधून त्या खेळाडूला सल्ला दिला पाहिजे. ती टीका लोकांनाही समजली पाहिजे. बाबरबद्दल विचार करायचा झाल्यास त्याने अनेक सामन्यांमध्ये संघाला विजय मिळवून दिला आहे. त्याच्या नावाने जे सातत्यपूर्ण विक्रम आहेत ते पाकिस्तानमधील फारच कमी फलंदाजांच्या नावर आहेत. सध्या तो नावाला जासेशी कामगिरी करत नसल्याने त्याच्यावर टीका केली जात असावी,” असं आफ्रिदी म्हणाला.