भारत टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेमधील ‘सुपर १२’ फेरीतील आपला शेवटचा सामना आज झिम्बाब्वेच्या संघाविरुद्ध खेळणार आहे. उपांत्य फेरीतील स्थान निश्चित करण्यासाठी झिम्बाब्वेविरुद्ध आज होणाऱ्या सामन्यात विजय मिळवणे गरजेचे आहे. या सामन्यामध्ये विजय मिळवल्यास भारताचा संघ उपांत्यफेरीमध्ये पात्र ठरु शकतो. मात्र झिम्बाब्वेसारख्या संघाविरुद्ध बेसावध राहणं रोहित शर्माच्या संघाला महागात पडू शकतं. भारत आणि झिम्बाब्वेदरम्यान आतापर्यंत झालेल्या सामन्यांची आकडेवारी पाहिली तर भारताला यापूर्वी झिम्बाब्वेने अनपेक्षितपणे पराभवाचे धक्के दिले आहेत.
नक्की वाचा >> World Cup: …तर उपांत्यफेरीत भारताऐवजी पाकिस्तान ठरणार पात्र! आजचे तिन्ही सामने भारतासाठी महत्त्वाचे; पाहा Points Table
रेजिस चकाब्वाच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या झिम्बाब्वेच्या संघाला कमी लेखून चालणार नाही. झिम्बाब्वेने स्पर्धेची चांगली सुरुवात केली होती, मात्र ती लय त्यांना कायम राखता आली नाही. झिम्बाब्वेच्या फलंदाजांना अजूनही चमकदार कामगिरी करता आलेली नाही. झिम्बाब्वे संघात क्रेग एर्विन, सीन एर्विन, रायब बर्ल आणि सीन विल्यम्ससारखे फलंदाज आहेत. भारतासमोर सिकंदर रझा आव्हान उपस्थित करू शकतो. भारत-झिम्बाब्वे यापूर्वी टी-२० विश्वचषक स्पर्धेत एकमेकांविरुद्ध खेळलेले नाहीत. तरीही, त्यांना स्पर्धेत पाकिस्तानसारख्या संघाला पराभूत केल्याने भारतीय संघ त्यांना हलक्याने घेणार नाही.
टी-२० मधील आकडेवारी काय सांगते?
भारत आणि झिम्बाब्वेदरम्यान आतापर्यंत एकूण सात टी-२० सामने झाले आहेत. यापैकी भारताने पाच सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. तर दोन सामने झिम्बाब्वेने जिंकले आहेत. म्हणजेच झिम्बाब्वेविरुद्ध भारताचा विजयाचा रेकॉर्ड १०० टक्के विजयाचा नाही. त्यामुळेच हा संघ भारताला पराभूत करुच शकत नाही असं समजणं चुकीचं ठरेल.
नक्की वाचा >> विश्लेषण: नेट रन रेटवर पाकिस्तान In की Out ठरणार? पण NRR कॉलमखाली दिसणारा ‘नेट रन रेट’ म्हणजे काय? तो कसा मोजतात?
एकदिवसीय सामन्यांमध्येरही केलंय पराभूत
एकदिवसीय सामन्यांमध्येही झिम्बाब्वेने भारताला एकदा, दोनदा नाही तर तब्बल १० वेळा पराभूत केलं आहे. अर्थात भारताने त्यापेक्षा अधिक सामने जिंकले आहेत तरी झिम्बाब्वेसारख्या संघाकडून भारत ५० षटकांच्या सामन्यांमध्येही १० वेळा पराभूत झाला आहे याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. भारत आणि झिम्बाब्वेदरम्यान एकूण ६६ एकदिवसीय सामने झाले असून यापैकी ५४ सामन्यांमध्ये भारताने विजय मिळवला आहे. तर दोन सामने बरोबरीत सुटले आहेत.