Mohammad Amir’s reaction on Rohit Sharma : टी-२० विश्वचषक २०२४ मध्ये रविवारी ९ जून रोजी भारत आणि पाकिस्तान आमनेसामने येणार आहेत. न्यूयॉर्कमधील नासाऊ काउंटी क्रिकेट स्टेडियमवर होणाऱ्या या सामन्याची जगभरातील क्रिकेट चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. या ‘हाय-व्होल्टेज’ सामन्यापूर्वी पाकिस्तान क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद आमिरने सांगितले की, या सामन्यात त्यांचे लक्ष्य भारतीय कर्णधार रोहित शर्मा असेल. त्याचबरोबर त्याने रोहितला कसे आऊट करायचे याची योजनाही तयार केली आहे.
यंदाच्या टी-२० विश्वचषकात पाकिस्तान संघाला पहिल्याच सामन्यात यजमान अमेरिकेकडून पराभव पत्करावा लागला, जो या संघासाठी मोठा धक्का होता. अशा परिस्थितीत या संघाला भारताविरुद्ध पुनरागमनाची आशा असेल. कारण टीम इंडियाच्या हातून पराभूत झाल्यानंतर पाकिस्तान संघाला स्पर्धेत पुढे सरकने अवघड होईल. कारण सुपर ८ फेरीत पोहोचण्याचे स्वप्नही भंग पावू शकते.
मी रोहितच्या पॅडला मारण्याचा प्रयत्न करेन –
स्टार स्पोर्ट्सवर बोलताना मोहम्मद आमिरने सांगितले की, “रोहित शर्मा हा जागतिक दर्जाचा खेळाडू आहे, हे सर्वांना माहीत आहे. जेव्हा तो लयीत येतो, तेव्हा तो कोणालाही सोडत नाही. परंत, गोलंदाज म्हणून आम्हालाही एक संधी आहे. तुम्ही सुरुवातीला त्याला बाद करू शकता, परंतु जर त्याने १५-२० चेंडू खेळले तर त्याला बाद करणे किंवा त्याला रोखणे कोणालाही कठीण जाईल. त्यामुळे रोहित शर्माविरुद्ध माझी रणनीती अशी आहे की जेव्हा तो फलंदाजीला येतो तेव्हा तो सेट होण्यापूर्वी मी त्याला त्याच्या पॅडवर गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करेन. जेणेकरून तो आऊट होईल आणि अशा प्रकारे मी त्याच्याविरुद्ध यशस्वी झालो आहे.”
हेही वाचा – IND vs PAK : रोहित शर्माला सराव सत्रात दुखापत! पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात खेळणार की नाही? जाणून घ्या
या मुलाखतीदरम्यान आमिरने २०१९ च्या एकदिवसीय विश्वचषकात पाकिस्तानविरुद्ध खेळलेल्या रोहित शर्माच्या खेळीचाही उल्लेख केला. त्या सामन्यात रोहितने पाकिस्तानविरुद्ध १४० धावा केल्या होत्या. तो म्हणाला की, रोहित शर्माच्या खेळीमुळे सामना आमच्या हातातून गेला. आमिरच्या मते, रोहित शर्माची ही सर्वोत्तम खेळी होती. चेंडू बॅटवर नीट येत नसल्याने सुरुवातीला विकेटवर फलंदाजी करणे सोपे नव्हते. खेळपट्टी संथ होती आणि केएल राहुल संघर्ष करत होता, पण रोहितच्या खेळीने सामन्याची दिशाच बदलली.
सध्या रोहित शर्मा शानदार फॉर्ममध्ये आहे आणि विश्वचषकातील पहिल्या सामन्यात आयर्लंडविरुद्ध अर्धशतक झळकावले. त्याने विराट कोहली बाद झाल्यानंतर ऋषभसह टीम इंडियाला विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका निभावली. आयर्लंडविरुद्ध रोहित आणि कोहली सलामीला आले होते, पण कोहली एक धाव काढून बाद झाला आणि त्यानंतर रोहित शर्माने ३७ चेंडूत ५२ धावांची शानदार खेळी केली आणि नंतर रिटायर्ड हर्ट झाला. रोहित ज्या पद्धतीने खेळत आहे, ते पाहता तो पूर्णपणे लयीत असल्याचे दिसत होते आणि चाहत्यांनाही त्याने पाकिस्तानविरुद्ध त्याच पद्धतीने फलंदाजी करावी असे वाटत असेल.
© IE Online Media Services (P) Ltd