भारतीय क्रिकेट संघाचा माजी खेळाडू युवराज सिंगचे वडील योगराज सिंग हे अनेकदा महेंद्रसिंह धोनीवर टीका करतात. योगराज सिंग हे स्वतः माजी क्रिकेटर असून त्यांनी भारतीय संघातून क्रिकेट खेळलेले आहे. आयसीसी टी-२० विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत भारताने धडक दिलेली आहे. आज (२७ जून) सायंकाळी भारताचा उपांत्य फेरीचा सामना होईल. भारतासमोर गतवर्षीचे विजेते इंग्लंडला नमवण्याचे आव्हान आहे. भारत यावर्षी विश्वसचषक नक्कीच जिंकणार असे सांगत असताना योगराज सिंग यांनी धोनीचे नाव घेऊन त्याला टोला लगावला.

SA vs AFG Semi Final 1 Live: पहिल्यांदाच दक्षिण आफ्रिका टी-२० वर्ल्डकपच्या अंतिम फेरीत, अफगाणिस्तानवर दणदणीत विजय

इंग्लंडबरोबर सामना होत असल्याकारणाने भारताच्या २०२२ च्या विश्वचषकातील कटू आठवणी ताज्या झाल्या. २०२२ साली झालेल्या टी-२० विश्वचषकात भारतीय संघाला उपांत्य फेरीत इंग्लंडकडून पराभव स्वीकारावा लागला होता. ज्यामुळे विश्वचषक जिंकण्याचे भारताचे स्वप्न भंगले होते. भारताने आतापर्यंत फक्त २००७ साली पहिल्याच टी-२० विश्वचषकावर नाव कोरले होते. महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखाली हा चषक आपल्या नावावर केल्यानंतर भारताला पुन्हा अंतिम सामन्यात विजय मिळविता आलेला नाही. धोनीने कर्णधार म्हणून जबाबदारी सांभाळल्यानंतर पहिल्याच मालिकेत भारताला यश मिळवून दिले होते.

युवराज सिंगचे वडील योगराज सिंग यांनी याआधीही धोनीवर अनेकदा टीका केली आहे. नुकताच त्यांचा एक मुलाखतीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ते विश्वचषक भारतच जिंकणार असे सांगत आहेत. “यावेळी धोनी संघात नाही, त्यामुळे आपण जिंकणारच”, असे ते मुलाखतकाराला सांगतात. तसेच गौतम गंभीर आणि रोहित शर्मा यांनीही धोनीच्या विरोधात बोलल्याचा दावा ते करतात.

“भारतीय म्हणून मला वाटतं, भारतीय संघाला यश मिळायला हवं. धोनी यावेळी नाही, त्यामुळे जिंकूच”, असे सांगताना ते म्हणाले गौतम गंभीर आणि रोहित शर्मादेखील हेच सांगतात. धोनीमुळेच यंदा चेन्नई सुपर किंग्जला आयपीएलमध्ये पराभवाचा सामना करावा लागला, असेही ते सांगतात. युवराजबद्दल धोनीच्या मनात असूया असल्याचा आरोप योगराज सिंग यांनी याआधी अनेकदा केला आहे.