भारत आणि झिम्बाब्वे संघात रविवारी टी-२० विश्वचषक २०२२ मधील ४२ वा सामना खेळवला जाणार आहे. हा सामना मेलबर्न क्रिकेट मैदानावर पार पडणार आहे. भारतीय संघाच्या दृष्टीने हा सामना खूप महत्वाचा आहे. या सामन्यापूर्वी झिम्बाब्वे संघाचा कर्णधार क्रेग एर्विनने विराट कोहलीबाबत एक महत्वाचे वक्तव्य केले आहे.
भारताविरुद्धच्या सामन्यापूर्वी झिम्बाब्वेचा कर्णधार क्रेग एर्विनने पत्रकार परिषदेत विराट कोहलीबाबत मोठे वक्तव्य केले आहे. एर्विनने टीम इंडियाबद्दल सांगितले की, नक्कीच ते तयार आहेत. विराट आणि टीम इंडियाबद्दल म्हणाला की, ”आम्हाला जगातील काही सर्वोत्तम खेळाडूंविरुद्ध गोलंदाजी करण्याची उत्तम संधी आहे.”
याशिवाय क्रेग एर्विनने पुढे सांगितले की, ”त्यामुळे आम्ही तेथे चांगली कामगिरी न करण्याचे कारण नाही. तसेच विराट कोहलीची विकेट घेण्याची संधी सारखी-सारखी मिळत नाही. त्यामुळे उद्याच्या सामन्यासाठी आमचे वेगवान गोलंदाज उत्सुक असतील याची मला खात्री आहे.”
विराटसाठी आमची कोणतीही खास योजना नाही – क्रेग एर्विन
झिम्बाब्वेचा कर्णधार क्रेग एर्विन पुढे म्हणाला की, ”विराटसाठी आमची काही खास योजना आहे, असे मला वाटत नाही. मला वाटते की तो एक खेळाडू म्हणून खूप चांगला आहे. मला वाटत नाही की, अशा खेळाडूंच्या विरोधात कोणतीही योजना कार्य करते. कारण ते वेगवेगळ्या परिस्थितींशी जुळवून घेतात.”