ICC T20I Rankings : भारतीय संघाचा फिरकीपटू कुलदीप यादव हा ICC च्या जागतिक गोलंदाजांच्या टी२० क्रमवारीत मोठी उडी घेत पहिल्या पाच गोलंदाजमध्ये दाखल झाला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या टी२० मालिकेत कुलदीपने उत्तम कामगिरी करत तब्बल २० स्थानाची झेप घेतली आहे. ताज्या यादीनुसार कुलदीप तिसऱ्या स्थानी विराजमान झाला आहे. तर ऑस्ट्रेलियाचा फिरकीपटू ऍडम झॅम्पा यालाही क्रमवारीत १७ स्थानांची बढती मिळाली असून तो पाचव्या स्थानी पोहोचला आहे.
कुलदीप आणि झॅम्पामुळे भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याला पहिल्या २० गोलंदाजांच्या यादीतून बाहेर जावे लागले आहे. याशिवाय भारताचा फिरकीपटू युझवेन्द्र चहल हा देखील ७ स्थानांनी खाली घसरला असून ११व्या स्थानी विराजमान झाला आहे. तर ऑस्ट्रेलियाचा स्टॅनलेक पाच स्थाने घसरून १४व्या आणि अँड्रयू टाय ८ स्थाने घसरून १८व्या पोहोचला आहे.
फलंदाजांच्या यादीत भारताचा शिखर धवन याने ५ स्थानांची बढती घेतली असून तो ११व्या स्थानी पोहोचला आहे.
धवनने मालिकेत ७६ आणि ४१ धावांची खेळी केली. तर दुसरा सामना पावसामुळे रद्द करण्यात आला होता. तर लोकेश राहुल आणि रोहित शर्मा हे दोघेही दोन स्थानांनी घसरून अनुक्रमे सहाव्या आणि नवव्या स्थानी फेकले गेले आहेत.