ICC Latest Test Ranking: आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) कसोटी संघाची ताजी क्रमवारी जाहीर केली आहे. या कसोटी क्रमवारीत टीम इंडियाला मोठा फायदा झाला आहे. भारताने बांगलादेशविरुद्ध २ कसोटी सामन्यांची मालिका जिंकली होती, ज्यामुळे टीम इंडिया ताज्या ICC कसोटी क्रमवारीत नंबर १ संघ बनला आहे. टीम इंडियापूर्वी ऑस्ट्रेलिया पहिल्या क्रमांकावर होता. ताज्या क्रमवारीत भारत ३६९० गुणांसह पहिल्या क्रमांकावर आला आहे. उद्यापासून सुरु होणाऱ्या न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत भारत निर्भेळ यश मिळवून त्यातही नंबर वन पटकावण्याच्या प्रयत्नात आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) मंगळवारी जाहीर झालेल्या कसोटी संघांच्या क्रमवारीत भारत पहिल्या स्थानावर पोहोचला आहे. ऑस्ट्रेलियाला मागे टाकत टीम इंडियाने ही कामगिरी केली. आता भारत ११५ गुणांसह पहिल्या स्थानावर आहे. त्याच वेळी, ऑस्ट्रेलिया १११ रेटिंग गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर घसरला आहे. गेल्या महिन्यात बांगलादेश दौऱ्यावर भारताने पाहुण्या संघाचा २-० सामन्यांच्या मालिकेत पराभव केला होता. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियाने त्यांच्या घरच्या मैदानावर दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत २-० असा विजय मिळवला. या मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना अनिर्णित राहिला. माहितीसाठी, आम्ही तुम्हाला सांगतो की, टी२० आंतरराष्ट्रीय क्रमवारीत भारत आधीच पहिल्या क्रमांकावर आहे.
भारतीय संघ अव्वल स्थानी पोहोचला
आयसीसीने जारी केलेल्या कसोटी क्रमवारीत भारत अव्वल स्थानी पोहोचला आहे. टीम इंडियाचे ११५ रेटिंग गुण आहेत. तर ऑस्ट्रेलिया १११ गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. इंग्लंड १०६ गुणांसह तिसऱ्या, न्यूझीलंड १०० गुणांसह चौथ्या, दक्षिण आफ्रिका ८५ गुणांसह पाचव्या स्थानावर आहे. वेस्ट इंडिज ७९ गुणांसह सहाव्या, पाकिस्तान ७७ गुणांसह सातव्या, श्रीलंका ७१ गुणांसह आठव्या, बांगलादेश ४६ गुणांसह नवव्या आणि झिम्बाब्वे २५ गुणांसह १०व्या स्थानावर आहे.
एकदिवसीय क्रमवारी मध्येही नंबर-१ होण्याची संधी
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील एकदिवसीय मालिकेची सुरुवात १८ जानेवारी रोजी हैदराबाद येथे होणार्या सामन्याने होणार आहे. या मालिकेत टीम इंडियाने न्यूझीलंडला ३-० ने पराभूत केले तर आयसीसी वनडे क्रमवारीत नंबर वन होण्याची सुवर्णसंधी असेल. सध्या वनडे क्रमवारीत न्यूझीलंडचा संघ ११७ गुणांसह पहिल्या क्रमांकावर आहे, तर टीम इंडिया ११० गुणांसह चौथ्या क्रमांकावर आहे. टीम इंडियाने या मालिकेत क्लीन स्वीप केल्यास त्याचे ११४ गुण होतील आणि न्यूझीलंडचा संघ १११ गुणांवर घसरेल.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप
भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध ३-१ किंवा त्याहून अधिक विजय मिळवला तर अन्य मालिकांचा निकाल काहीही लागला तरी टीम इंडिया फायनलसाठी पात्र ठरेल. बांगलादेशविरुद्ध २-० अशी मालिका जिंकल्यानंतर भारतीय संघ सध्या ५८.९३ % सह दुसऱ्या क्रमांकावर आहे. भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४-० असे जिंकल्यास ६८.०६%, ३-१ असे जिंकल्यास ६२.५% आणि २-२ अशी बरोबरी राहिल्यास ५६.९४% होतील. मालिका २-२ अशी बरोबरीत राहिल्यास आणि श्रीलंकेने न्यूझीलंडमध्ये २-० ने विजय मिळवला तर भारत पहिल्या दोनमधून बाहेर पडेल. ऑस्ट्रेलियाविरुद्ध २१ पेक्षा कमी गुण मिळवल्यास आणि दक्षिण आफ्रिकेने घरच्या मैदानावर वेस्ट इंडिजविरुद्ध २-० असा विजय मिळवल्यास टीम इंडिया आफ्रिकेच्या मागेही घसरू शकतो. भारतीय संघाने २१ गुण कमावण्यात यश मिळवले, तर दक्षिण आफ्रिकेने मालिका १-० ने जिंकली किंवा २-२ (२४ गुण) बरोबरी केली तर ते पुढे राहतील, परंतु १-१ बरोबरी (२० गुण) मिळवली तरीही ते पुढे जाऊ शकणार नाहीत.