वेस्ट इंडिजविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यात बाजी मारल्यानंतर भारतीय खेळाडूंनी कसोटी क्रमवारीत चांगली कामगिरी केली आहे. दुसऱ्या डावात अवघ्या ७ धावांमध्ये ५ बळी घेणाऱ्या जसप्रीत बुमराहने गोलंदाजांच्या क्रमवारीत थेट सातव्या स्थानावर झेप घेतली आहे. कसोटी क्रिकेटमधली बुमराहची ही सर्वोत्तम कामगिरी मानली जात आहे. बुमराहच्या खात्यात सध्या ७७४ गुण जमा आहेत.

दुसरीकडे फलंदाजीत भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने आपलं पहिलं स्थान कायम राखलं आहे. अ‍ॅशेल मालिकेत ऑस्ट्रेलियाच्या स्टिव्ह स्मिथने धडाकेबाज कामगिरी करत विराटला चांगलं आव्हान दिलं होतं. स्मिथच्या तुलनेत विराटला विंडीजविरुद्ध पहिल्या डावात फारशी चांगली कामगिरी करता आली नाही. परंतु दुसऱ्या डावात विराट अजिंक्यसोबत शतकी भागीदारी रचत आपलं पहिलं स्थान कायम राखलं आहे. सध्या विराट आणि स्मिथ यांच्यात केवळ ६ गुणांचं अंतर आहे. याचसोबत भारताचा चेतेश्वर पुजारा चौथ्या स्थानावर कायम आहे.

दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारत सध्या १-० ने आघाडीवर आहे, दुसरा कसोटी सामना ३० ऑगस्टपासून सुरु होणार आहे. या सामन्यातही बाजी मारत दौऱ्यावर निर्विवाद वर्चस्व गाजवण्याचा भारतीय संघाचा प्रयत्न असणार आहे.

अवश्य वाचा – ऋषभ अजुनही पाळण्यातच, साहाला संधी मिळायला हवी – सय्यद किरमाणी

Story img Loader