भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसरी कसोटी सुरू होण्यापूर्वी कसोटी क्रमवारीत मोठा बदल झाला. भारतीय यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतने एक स्थान गमावले आहे. त्याला पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने मागे टाकले. भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराही टॉप-१० मधून बाहेर पडला आहे. वेस्ट इंडिज आणि पाकिस्तान यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यानंतर क्रमवारीत बदल झाला आहे. बाबर आझमने दुसऱ्या कसोटीत ७५ आणि ३३ धावा केल्या. तो ७४९ गुणांसह आठव्या स्थानावरून सातव्या स्थानावर पोहोचला आहे. ऋषभ पंत सातव्या स्थानावरून आठव्या स्थानावर घसरला आहे. हे बदल सोडले, तर टॉप-१० फलंदाजांच्या क्रमवारीत कोणताही बदल झालेले नाहीत.

डावखुरा फलंदाज फवाद आलमने पहिल्या डावात शतक झळकावले. त्याला ३४ स्थानांचा फायदा झाला आहे. तो २१व्या स्थानावर पोहोचला आहे. पाकिस्तानचा यष्टीरक्षक फलंदाज मोहम्मद रिझवानने पुन्हा एकदा टॉप-२० मध्ये स्थान मिळवले आहे. त्याने नाबाद ३१ आणि १० धावा केल्या. तो १९व्या स्थानावर आहे.

 

हेही वाचा – VIDEO : राशिद खान की महेंद्रसिंह धोनी?..अफगाणी क्रिकेटपटूचा ‘हेलिकॉप्टर शॉट’ होतोय व्हायरल

बुमराहला नुकसान

पाकिस्तानचा डावखुरा वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदीने वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत १० विकेट्स घेतल्या. त्याला प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कारही मिळाला. तो कारकीर्दीतील सर्वोत्तम आठव्या क्रमांकावर पोहोचला आहे. त्यामुळे भारतीय गोलंदाज जसप्रीत बुमराहला एक स्थान गमवावे लागले. तो १०व्या स्थानावरून ११व्या स्थानावर पाहोचला आहे.

 

न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन ९०१ गुणांसह फलंदाजी क्रमवारीत अव्वल स्थानी आहे. इंग्लंडचा कर्णधार जो रूट (८९३) दुसऱ्या, ऑस्ट्रेलियाचा स्टीव्ह स्मिथ (८९१) तिसरा, ऑस्ट्रेलियाचा मार्नस लाबुशेन (८७८) चौथ्या, भारतीय कर्णधार विराट कोहली (७७६) पाचव्या आणि रोहित शर्मा (७७३) सहाव्या स्थानी आहे. गोलंदाजी क्रमवारीबद्दल बोलायचे झाले तर भारताकडून फक्त आर. अश्विन टॉप-१० मध्ये आहे. तो दुसऱ्या स्थानावर आहेत. ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स ९०८ गुणांसह पहिल्या स्थानावर कायम आहे.