ICCच्या कसोटी क्रिकेटमधील जागतिक क्रमवारीत भारतीय संघाने आपले अव्वल स्थान कायम राखले आहे. ICCने गुरुवारी कसोटी क्रमवारीची ताजी यादी जाहीर केली. या क्रमवारीत भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली यानेही आपले अव्वल स्थान कायम राखले आहे. भारताने कसोटी मालिकेत आठव्या स्थानावरील विंडीजला २-० असे सहज पराभूत केले. त्यामुळे भारताचे गुण ११६ झाले. आता भारत दुसऱ्या स्थानावर असलेल्या द.आफ्रिकेपेक्षा (१०६) १० गुणांनी पुढे आहे.
फलंदाजांच्या यादीत विराट कोहली ९३५ गुणांसह अव्वल आहे. विराटने या मालिकेत एका सामन्यात १३६ तर दुसऱ्या सामन्यात ४५ धावा केल्या होत्या. त्यामुळे आता तो दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या आॅस्ट्रेलियाचा निलंबित खेळाडू स्टीव्ह स्मिथपेक्षा (९१०) २५ गुणांनी पुढे आहे. याशिवाय, चेतेश्वर पुजारा ७६५ गुणांसह सहाव्या स्थानावर आहे. यादीत तिसऱ्या स्थानी न्यूझीलंडचा केन विल्यम्सन (८४७), चौथ्या स्थानी इंग्लंडचा जो रूट (८३५) आणि पाचव्या स्थानी ऑस्ट्रेलियाचा निलंबित खेळाडू डेव्हिड वॉर्नर (८०३) आहे.
गोलंदाजीत भारताच्या रवींद्र जाडेजाची एका स्थानाने घसरण झाली आहे. तो ८१२ गुणांसह ५ व्य स्थानी आहे. तर आफ्रिकेचा वर्नन फिलँडरदेखील १ स्थान घसरून चौथ्या स्थानी आला आहे. या यादीत पाकिस्तानच्या मोहम्मद अब्बासने १८ स्थानांची झेप घेत तिसऱ्या स्थानी बाजी मारली आहे. यादीत जाडेजा वगळता टॉप १० मध्ये अश्विन ७७७ गुणांसह नवव्या स्थानी आहे. तर विंडीजचा कर्णधार जेसन होल्डर ३ स्थानाची बढती घेत १०व्या स्थानी विराजमान झाला आहे.