ICC Test Rankings Rishabh Pant: सध्या सुरू असलेल्या कसोटी सामन्यांच्या दरम्यान आयसीसीने बुधवारी नवी कसोटी क्रमवारी जाहीर केली. ज्यामध्ये भारताचा यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंतला तगडा फायदा झाला आहे. न्यूझीलंडविरुद्ध बंगळुरू कसोटीत ९९ धावांची खेळी करणाऱ्या पंतला ताज्या क्रमवारीत तीन स्थानांचा फायदा झाला आहे. यादरम्यान त्याने विराट कोहलीला मागे टाकलं आहे.
पंतने कसोटी फलंदाजांच्या क्रमवारीत भारतीय फलंदाज विराट कोहलीला मागे टाकत सहाव्या स्थानी झेप घेतली आहे. या यादीत इंग्लंडचा जो रूट अव्वल स्थानी असून त्याने आपली आघाडी कायम राखली आहे. विराट आणि पंत यांच्याशिवाय भारताचा यशस्वी जैस्वाल टॉप-१० खेळाडूंमध्ये चौथ्या स्थानावर आहे.
हेही वाचा – VIDEO: नवा विश्वविक्रम! न्यूझीलंडच्या खेळाडूने फक्त इतक्या चेंडूत झळकावले सर्वात जलद द्विशतक
यशस्वी जैस्वाल व्यतिरिक्त, बंगळुरूमध्ये न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या डावात दुहेरी आकडा गाठणारा ऋषभ पंत हा एकमेव भारतीय फलंदाज होता. ज्यामध्ये भारत अवघ्या ४६ धावांत सर्वबाद झाला होता. पंतने या डावात केवळ २० धावा केल्या होत्या, परंतु तरीही ही भारतीय डावातील सर्वोत्तम धावसंख्या ठरली. पंतने दुसऱ्या डावात ९९ धावांची उत्कृष्ट खेळी खेळली, पण केवळ एका धावेने त्याचे शतक हुकले.
रवींद्र जडेजाच्या गोलंदाजीवर उजव्या गुडघ्याला दुखापत झाल्याने त्याला आदल्या दिवशी मैदानाबाहेर जावे लागले होते. पंत चालू सामन्यात दुखापतीमुळे मैदानाबाहेर गेल्यानंतर पुन्हा फलंदाजीला मैदानात येणार की नाही ही शंका होती. पण नंतर यष्टिरक्षक-फलंदाज पंत फलंदाजीला आला आणि पंतने चौथ्या दिवशी सर्फराझ खानच्या जोडीने १७७ धावांची भागीदारी रचली. या भागीदारीमुळे भारताने न्यूझीलंडच्या पहिल्या डावातील मोठ्या धावसंख्येला प्रत्युत्तर देताना आघाडी घेतली. पंत पुन्हा एकदा नर्व्हस नाईन्टीजचा (९० आणि त्यापेक्षा अधिक धावांवर बाद होणं) बळी ठरला. यासह पंतने कसोटीतील शतकापेक्षा जास्त नर्व्हस नाईन्टीजमध्ये बाद होण्याचा विक्रम नोंदवला आहे.
हेही वाचा – BAN vs SA: मेहदी हसन मिराजची ऐतिहासिक कामगिरी, WTC २०२३-२५ मध्ये कोणालाच जमलं नाही ते करून दाखवलं
सर्फराझ खानने केएल राहुलला कसोटी क्रमवारीत टाकलं मागे
फलंदाजी क्रमवारीत सर्फराझ खानने १५० धावांच्या खेळीच्या जोरावर ३१ स्थानांनी झेप घेतली असून, तो आता थेट ५३व्या क्रमांकावर पोहोचला आहे. सर्फराझ खानचे ५०९ रेटिंग गुण आहेत. गुणतालिकेतील या मोठ्या उडीसह सर्फराझ खानने केएल राहुलला मागे टाकले आहे. बंगळुरू कसोटी सामन्यातील खराब कामगिरीमुळे केएल राहुल १० स्थानांनी घसरला आहे, ज्यामध्ये तो आता श्रेयस अय्यरपेक्षाही खाली ५९ व्या स्थानावर पोहोचला आहे. केएल राहुलचे ४९८ रेटिंग गुण आहेत. त्याचबरोबर अक्षर पटेलही याच गुणांसह आहे. भारतीय फलंदाजांच्या ताज्या आयसीसी क्रमवारीवर नजर टाकली तर रवींद्र जडेजानेही ५ स्थान गमावले आहेत.