भारत आणि इंग्लंड दरम्यानची कसोटी मालिका संपल्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने नवीन फलंदाजी क्रमवारी जाहीर केली आहे. या क्रमवारीमध्ये माजी भारतीय कर्णधार असलेल्या विराट कोहलीची घसरण झाली आहे. २०१६नंतर विराट कोहली प्रथमच पहिल्या १०मधून बाहेर फेकला गेला आहे. तर, एजबस्टन कसोटीमध्ये चमकदार कामगिरी करणारा ऋषभ पंत पहिल्या पाच खेळाडूंमध्ये गेला आहे.
भारताचा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत याने कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात १४६ धावांची शानदार खेळी केली होती. त्यानंतर दुसऱ्या डावातही त्याने ५७ धावा केल्या. या कामगिरीमुळे त्याला पाच स्थानांचा फायदा झाला आणि त्याने पाचव्या स्थानावर झेप घेतली. पंतकडे सध्या ८०१ गुण आहेत. पंत शिवाय रोहित शर्मा पहिल्या १० फलंदाजांमध्ये समाविष्ट आहे. तो ७४६ गुणांसह नवव्या स्थानावर आहे.
आयसीसीने कसोटी फलंदाजांची यादी जाहीर केल्यानंतर विराट कोहलीच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला. भारताचा माजी कर्णधार विराट कोहली गेल्या सात वर्षांच्या काळात पहिल्यांदाच टॉप-१० मधून बाहेर पडला आहे. गेल्या दोन वर्षांमध्ये विराट कोहली धावांसाठी अक्षरश: झगडताना दिसत आहे. एजबस्टन कसोटी सामन्याच्या दोन्ही डावांमध्ये विराट विशेष कामगिरी करू शकला नाही. त्यामुळे त्याच्या क्रमवारीवरही परिणाम झाला आहे.
यावर्षी कसोटी क्रिकेटमध्ये जबरदस्त कामगिरी करणारा इंग्लंडचा स्फोटक फलंदाज जॉनी बेअरस्टोने प्रथमच पहिल्या १० फलंदाजांमध्ये स्थान मिळवले आहे. बेअरस्टो आयसीसीच्या क्रमावारीमध्ये १०व्या स्थानावर आहे. इंग्लंडच्या कसोटी संघाचा माजी कर्णधार जो रूट ९२३ गुणांसह पहिल्या स्थानावर आहे.