सिडनी : कसोटी क्रिकेटचे भविष्य टिकवण्यासाठी किमान १.५ कोटी अमेरिकन डॉलरचा निधी राखीव ठेवण्याचा आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा (आयसीसी) विचार आहे. यामुळे खेळाडूंच्या सामन्याचे मानधन वाढविण्यास मदत मिळेल आणि खेळाडूंना ट्वेन्टी-२० लीगवर लक्ष केंद्रित करण्यापासून रोखले जाऊ शकेल, असा अंदाज आहे.
क्रिकेट ऑस्ट्रेलियाने अशा पद्धतीचा प्रस्ताव ठेवला असून त्यांना भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) सचिव जय शहा, तसेच इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट मंडळाचा (ईसीबी) पाठिंबा मिळाला आहे. या निधीच्या माध्यमातून क्रिकेटपटूंच्या मानधनात वाढ होईल आणि संघाला परदेश दौऱ्यांवर पाठवण्याचा खर्चही यामधून निघू शकेल. अशा निधीमुळे वेस्ट इंडिजसारख्या क्रिकेट मंडळांना मदत मिळू शकेल. आर्थिकदृष्ट्या अडचणीत असलेल्या मंडळातील खेळाडू कसोटी क्रिकेटकडे पाठ फिरवून जगभरातील ट्वेन्टी-२० लीग खेळण्यास प्राधान्य देतात.
‘‘हा निधी जमा झाल्यानंतर सर्व खेळाडूंना कमीत कमी मानधन सुनिश्चित होईल, जे जवळपास दहा हजार डॉलर असेल. त्यांच्या परदेश दौऱ्याचा खर्चही भागेल,’’ असे एका अहवालात नमूद करण्यात आले आहे.
© The Indian Express (P) Ltd