पृथ्वी शॉच्या भारतीय संघाने न्यूझीलंडमध्ये सुरु असलेल्या १९ वर्षाखालील क्रिकेट विश्वचषकाचं विजेतेपद पटकावलं आणि संपूर्ण भारतभर आनंदाचं वातावरण तयार झालंय. अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियावर मात करत भारताने चौथ्यांदा १९ वर्षाखालील विश्वचषक जिंकला. मुंबईकर पृथ्वी शॉचं नेतृत्व आणि त्याला राहुल द्रविड सारख्या कणखर प्रशिक्षकाची मिळालेली साथ या जोरावर भारताने या स्पर्धेवर निर्विवाद वर्चस्व गाजवलं. ही स्पर्धा अनेक दृष्टीकोनातून भारतीय क्रिकेटसाठी फायदेशीर ठरलेली आहे. ज्या क्रीडा रसिकांनी १९ वर्षाखालील विश्वचषकाचे सामने पाहिले असतील त्यांना एक गोष्ट नक्की जाणवली असेल ती म्हणजे सर्व सामन्यांमध्ये भारतीय संघ उजवा ठरला. एकाही सामन्यात भारताला कडवा प्रतिकार सहन करावा लागला नाही. पृथ्वी शॉ, मनजोत कालरा, शुभमन गिल सारखे फलंदाज; इशान पोरेल, शिवम मवी, कमलेश नागरकोटीसारखे गोलंदाज हे आगामी काळात भारतीय क्रिकेटचा चेहरा ठरु शकतात.
भारतीय संघाने स्पर्धेत राखलेलं निर्विवाद वर्चस्व आणि त्यांना राहुल द्रविडची मिळालेली खंबीर साथ या सर्व गोष्टी आता तुम्हाला माहिती झालेल्या असतील. या विजयानंतर जवळपास सर्व क्षेत्रातून भारतीय संघावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून ते मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरपर्यंत सर्वांनी भारतीय संघाचं कोडकौतुक केलंय. बीसीसीआयने तर सर्व खेळाडू, प्रशिक्षक आणि सपोर्ट स्टाफसाठी भरघोस रकमेचं इनामही जाहीर केलंय. मात्र या विजयासह भारतीय क्रिकेटमधलं आशा-निराशेचे चार चौकोन समोर आलेले आहेत. या आशा निराशेच्या खेळात राहुल द्रविडचं U-19 संघाच्या पाठीमागे एका व्रतस्थ योग्यासारखं उभं राहणं, आशादायी चित्र तयार करुन जातंय.
भारतीय प्रेक्षकांना राहुल द्रविड का भावतो?
खरंतरं या प्रश्नाचं उत्तर प्रत्येक जणं आपापल्यापरीने देऊ शकतो. मात्र माझ्यामते मैदानात कोणताही आक्रस्ताळेपणा न करता शांत आणि संयमी डोक्याने जो भारतीय संघाचा पराभवाच्या गर्तेतून बाहेर काढतो, त्यावर भारतीय प्रेक्षक मनापासून प्रेम करतात. मग अनिल कुंबळे, व्ही. व्ही. एस. लक्ष्मण यासारखे खेळाडूही भारतीयांच्या गळ्यातले ताईत बनले ते याच शांत आणि संयमी स्वभावामुळे. यापैकी एकाही खेळाडूला मैदानात तुम्ही विनाकारण आक्रमक होताना पाहिलेलं नसेल. राहुल द्रविड ने आयुष्यभर ‘द वॉल’ हे बिरुद मिरवलं. जगात आक्रमक गोलंदाजीसाठी प्रसिद्ध असणारे जलदगती गोलंदाज द्रविडच्या बचावात्मक फलंदाजीपुढे अक्षरशः गुडघे टेकायचे. त्यामुळे राहुल द्रविड हा खेळाडू कधीच वाईट वागू शकत नाही किंवा चुकीचे निर्णय घेऊ शकत नाही असा भारतीयांना आत्मविश्वास आहे.
अशा निष्कलंक राहुल द्रविडवर पहिल्यांदा आक्षेप घेतला गेला तो रामचंद्र गुहा या व्यक्तिकडून. रामचंद्र गुहा हे पेशाने इतिहासकार म्हणून ओळखले जात असले तरीही काही दिवसांपूर्वी त्यांना सर्वोच्च न्यायालयाने बीसीसीआयवर स्थापन केलेल्या क्रिकेट प्रशासकिय समितीत स्थान देण्यात आलं होतं. अवघ्या काही कालावधीत आपल्या सदस्यत्वाचा राजीनामा देणाऱ्या गुहांनी एका पत्राद्वारे बीसीसीआयमधल्या व्हीआयपी कल्चरवर आक्षेप घेतला होता. यात काही खेळाडूंवर टीका करताना गुहांनी राहुल द्रविडवरही आक्षेप घेतला होता. भारतीय क्रिकेटमध्ये प्रशिक्षणाशी संबंधित असलेल्या कोणत्याही माजी खेळाडूला आयपीएलमध्ये सहभाग दिला जाऊ नये असं म्हणत गुहांनी, राहुल द्रविडच्या U-19 संघाचा प्रशिक्षक आणि दिल्ली डेअरडेविल्स या संघाचा मार्गदर्शक होण्यावर बोट ठेवलं होतं. साहजिकच गुहांच्या या लेटरबॉम्बनंतर भारतीय क्रिकेटमध्ये मोठं वादळ उठलं होतं. द्रविडसारख्या खेळाडूच्या प्रामाणिकपणावर प्रश्न निर्माण झाल्याने चाहत्यांनी गुहांना चांगलंच टीकेचं धनी बनवलं.
या घटनेवर द्रविडने स्पष्टीकरण देताना तितक्याच संयमीपणाने आपली बाजू मांडली. “आयपीएल संबंधी करार करताना मी बीसीसीआयला याची पूर्वकल्पना दिलेली होती. U-19 संघाचा प्रशिक्षक म्हणून १० महिने मी काम पाहणं अपेक्षित होतं. त्यानूसार मी काम केलेलं आहे, त्यामुळे माझा करार झाल्यानंतर नियमांमध्ये बदल झाले असल्यास या गोष्टीसाठी मला दोषी ठरवलं जाणं योग्य ठरणार नाही.” या प्रकरणावर द्रविडने बीसीसीआयलाही आपली बाजू स्पष्ट करायला सांगितली होती. ज्यावर बीसीसीआयने द्रविडच्या बाजूने आपला कौल देत, द्रविडकडून कोणत्याही नियमांचं उल्लंघन झालं नसल्याचा निर्वाळा दिला होता. Conflict of interest चा मुद्दा करुन गुहांनी राहुल द्रविडवर टीका केली असल्याने यावरुन मोठा वाद निर्माण होऊ शकला असता. मात्र द्रविडने हा मुद्दा अतिशय शांतपणे हाताळत प्रकरण चिघळलं जाणार नाही याची काळजी घेतली.
U-19 विश्वचषकासाठी द्रविडने एक प्रशिक्षक म्हणून घेतलेली मेहनतही तितकीच वाखणण्याजोगी आहे. गेल्या १४ महिन्यांपासून राहुल द्रविड U-19 भारतीय संघातील खेळाडूंवर आपली मेहनत घेतो आहे. कोणत्या खेळाडूला संघात स्थान द्यायचं आहे, त्यासाठी त्याच्याकडून तयारी करुन घ्यायचं. तरुण खेळाडूंना फलंदाजीच्या टिप्स देणं, संघाची एकत्र मोट बांधून ठेवणं या सर्व गोष्टींमध्ये राहुल द्रविड एखाद्या निष्णात प्रशिक्षकासारखा वागला आहे. कदाचीत ही गोष्ट कोणात्या लक्षात येणार नाही, पण काही महिन्यांपूर्वी झालेल्या U-19 आशिया चषकातही भारताचा संघ विजयी ठरला होता. मात्र या संघात पृथ्वी शॉला जागा देण्यात आलेली नव्हती. राहुल द्रविडने पृथ्वी शॉला आशिया चषकाऐवजी रणजी क्रिकेट खेळण्याचा सल्ला दिला होता. रणजीतला अनुभव तुझी फलंदाजी आणखी समृद्ध करेल असं विधान राहुल द्रविडने केलं होतं. त्यानंतर पृथ्वी शॉने रणजीत मुंबईकडून खेळताना केलेली कामगिरी आणि त्यानंतर विश्वचषकात भारतीय संघाचं केलेलं खंबीर नेतृत्व हे आपण सर्वांनी पाहिलं होतं.
कित्येकदा तरुण वयात खेळाडूना आपण आक्रमक फलंदाज व्हावं अशी इच्छा असते. U-19 विश्वचषकात मालिकावीराचा किताब पटकावणारा शुभमन गिल हा देखील असाच एक खेळाडू…मात्र काही महिन्यांपूर्वी इंग्लंडचा U-19 संघ भारत दौऱ्यावर आलेला असताना शुभमन पहिल्या दोन वन-डे सामन्यांत चांगली कामगिरी करु शकला नव्हता. यावेळी राहुल द्रविडने त्याच्या फलंदाजीतले गुण हेरुन त्याला एक मोलाचा सल्ला दिला आणि त्यानंतर त्याच्या फलंदाजीत झालेला बदल हा खरचं थक्क करण्यासारखा आहे. नेमकं काय घडलं होतं त्यावेळी आणि शुभमन गिलने राहुल सरांचं कौतुक करताना काय म्हणलं होतं जरुर वाचा.
अवश्य वाचा – मैदानावर धावा निघतायत मग हवेत का खेळतोस? द्रविड सरांचा सल्ला आणि शुभम गिलचं शतक
एखाद्या खेळाडू चांगली कामगिरी करत नसेल तर त्याला योग्य सल्ला देत त्याच्याकडून हवीतशी कामगिरी करुन घेणं हे काम द्रविडसारखाच प्रशिक्षक करु शकतो. विश्वचषकासारख्या महत्वाच्या स्पर्धेसाठी उतरायचं म्हणजे केवळ १५ – २० जणांचा संघ घेऊन क्रिकेट खेळणं आणि परत येणं इतकचं नसतं. आपण ज्या देशात खेळायला जाणार आहोत, तिकडचं वातावरण आणि खेळपट्ट्यांशी जुळवून घेणं ही देखील महत्वाची गोष्ट मानली जाते. हीच बाब हेरुन राहुल द्रविड विश्वचषक सुरु होण्यासाठी U-19 संघाला घेऊन न्यूझीलंडमध्ये स्पर्धेच्या आधी २० दिवस आधी तळ ठोकून बसला होता. या सर्व गोष्टींचं आपल्या देशाला मिळालेलं फलित आपण पाहतच आहोत. भारतीय सिनीअर संघाच्या प्रशिक्षकपदाची ऑफर असतानाही राहुल द्रविडने आग्रहाने U-19 संघाचं प्रशिक्षकपद मागून घेतलं होतं. प्रशिक्षीत खेळाडूंना प्रशिक्षण देण्याऐवजी देशाची नवीन पिढी क्रिकेट परिपक्व करावी यासाठी एखाद्या व्रतस्थ योग्याप्रमाणे राहुल द्रविडने उचलेलं हे पाऊल खरंच कौतुक करण्यासारखं आहे.
तरुण वयात खेळाडूंचं आपल्या ध्येयावरचं लक्ष्य कमी होण्याची शक्यता असते. आयपीएलचा लिलाव ही सध्या भारतात क्रिकेटर बनू पाहणाऱ्या सर्व खेळाडूंसाठी एक सुवर्णसंधी म्हणावी लागेल. साहजिकच न्यूझीलंडमध्ये असणाऱ्या भारतीय संघातील खेळाडूंच्या मनात आयपीएल लिलावाच्या अकराव्या हंगामाबद्दल उत्सुकता होती. मात्र अशावेळी राहुल द्रविडने एखाद्या मोठ्या भावाप्रमाणे आपली समजूत काढत खेळाडूंना आपुलकीचा सल्ला दिला, आयपीएलचा लिलाव दरवर्षी होणार आहे पण विश्वचषक खेळण्याची संधी ४ वर्षांतून एकदाच येईल असं म्हणत राहुलने आपल्या खेळाडूंचे कान बरोबर टोचले.
अवश्य वाचा – आयपीएलचा लिलाव दरवर्षी होईल, विश्वचषकाची संधी एकदाच येते ! – राहुल द्रविड
ऑस्ट्रेलियाला पहिल्याच साखळी सामन्यात भारताने पराभवाचं पाणी पाजलं होतं. मात्र अंतिम फेरीत पुन्हा ऑस्ट्रेलियाशी भारताचा सामना होणार होता. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत ऑस्ट्रेलियाला कमी लेखून चालणार नव्हतं. यासाठी सामन्याच्या एक दिवस आधी राहुल द्रविडने नामी शक्कल लढवली.
अवश्य वाचा – ICC U19 World Cup: अंतिम सामना होईपर्यंत खेळाडूंवर द्रविडने घातली ‘मोबाईल बंदी’
तर अशीच बरीच उदाहरणं देता येतील ज्यावरुन राहुल द्रविड हा एक परिपक्व क्रिकेट प्रशिक्षक असल्याचं आपल्याला म्हणता येईल. हे झालं भारतीय क्रिकेटचं आशादायी चित्र. मात्र जेव्हा एक क्रिकेट रसिक म्हणून आपण भारताच्या सिनीअर संघाच्या कामगिरीकडे पाहतो तिकडे सांघिक कामगिरी कमी आणि वाद-विवादांची मालिका जास्त दिसून येते. एकीकडे राहुल द्रविड भारताची क्रिकेटमधली पुढची पिढी घडवत असताना, सध्याच्या पिढीने क्रीडा रसिकांसमोर आपला आदर्श घ्यावा असं एकही उदाहरण घालून दिलेलं नाही. यासाठी भारतीयांचं अतिक्रिकेट प्रेम, किंवा एखाद्या खेळाडूला संघाबाहेर बसवलेलं सहन न होणं, पराभव पचवण्याची वृत्ती नसणं अशा अनेक गोष्टी तितक्याच कारणीभूत आहेत. मात्र ही बाब इथे दुय्यम ठरते.
भारतीय सिनीअर क्रिकेट संघासाठी २०१७ चं वर्ष स्वप्नवत ठरलं. अर्थात बहुतांश सामने हे घरच्या मैदानावर खेळलेल्या भारतीय संघाने आपल्या देशात आलेल्या ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, न्यूझीलंड, श्रीलंका यांसारख्या सर्व संघाना चारीमुंड्या चित केलं. (अपवाद इंग्लंडमध्ये घडलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीचा) मात्र २०१८ साली भारताला दक्षिण आफ्रिका दौऱ्यानिमीत्त पहिली अग्निपरीक्षा द्यावी लागली, आणि या पहिल्याच परीक्षेत भारत तोंडावर आपटला. आफ्रिकेविरुद्धची ३ कसोटी सामन्यांची मालिका २-१ ने भारताने गमावली. आफ्रिकेत भारताला पत्कराव्या लागलेल्या पराभवापेक्षा भारतीय चाहत्यांना खुपलेली गोष्ट म्हणजे, कसोटी संघाचा उप-कर्णधार अजिंक्य रहाणेला पहिल्या दोन कसोटींसाठी संघात स्थान न मिळणं. अर्थात या गोष्टीचे संकेत आफ्रिका दौरा सुरु होण्याआधीच मिळालेले होते, जेव्हा भारताचे सहायक प्रशिक्षक संजय बांगर यांनी कामगिरीच्या जोरावर आफ्रिकेविरुद्ध खेळाडूंना संघात जागा मिळेल असं वक्तव्य केलं होतं. आता अजिंक्य रहाणेच्या चाहत्यांना ही बाब पटत नसली तरीही आकडे खोटं बोलत नाहीत असं म्हणतात. म्हणून अजिंक्य रहाणेच्या २०१७ सालच्या कसोटी कामगिरीवर एक नजर टाकूयात…
२०१७ या वर्षात अजिंक्य बांगलादेश, ऑस्ट्रेलिया, श्रीलंकेविरुद्ध घरच्या मैदानात आणि श्रीलंकेमध्ये खेळला. यात महत्वाची गोष्ट म्हणजे संपूर्ण वर्षात अजिंक्य रहाणेला कसोटी क्रिकेटमध्ये केवळ १ शतक झळकावता आलेलं आहे. सिंहली स्पोर्ट्स क्लबच्या मैदानात अजिंक्यने १३२ धावांची खेळी केली. याव्यतिरीक्त श्रीलंकेविरुद्ध गॅले कसोटीतलं पहिल्या डावातलं अर्धशतकं, ऑस्ट्रेलियावरिुद्ध बंगळुरुत दुसऱ्या डावातलं अर्धशतकं आणि बांगलादेशविरुद्ध एकमेव हैदराबाद कसोटीती पहिल्या डावात झळकावलेलं अर्धशतक अशी इनमिन ३ अर्धशतकांचा समावेश आहे. बाकीच्या सर्व सामन्यांमध्ये अजिंक्य रहाणे फलंदाजीत अपयशी ठरला आहे. अंदाजे ३० च्या सरासरीने अजिंक्यने कसोटीत धावा काढल्या आहेत.
ही झाली कामगिरी कसोटी क्रिकेटमधली, आता एक नजर टाकूयात वन-डे क्रिकेटमधल्या कामगिरीवर…
चॅम्पियन्स ट्रॉफीत संधी न मिळालेल्या अजिंक्य रहाणेने त्यानंतरच्या वेस्ट इंडिज दौऱ्यावर मात्र आपली छाप सोडली. ५ वन-डे सामन्यांमध्ये अजिंक्यने धावांचा रतिब घालत मालिकेत सर्वाधीक धावा पटकावत मालिकावीराचा किताब मिळवला. यानंतर श्रीलंकेविरुद्ध वन-डे सामन्यांमध्ये अजिंक्य पुन्हा अपयशी ठरला. मात्र ऑस्ट्रेलियाविरुद्ध घरच्या मैदानात खेळताना अजिंक्यने सलग ४ सामन्यांमध्ये अर्धशतकी खेळी करुन आपली छाप पाडली. महत्वाने नमूद करायची गोष्ट म्हणजे २०१७ साली वन-डे क्रिकेटमध्ये अजिंक्यने चांगली फलंदाजी केली असली तरीही त्याच्या कामगिरीत सातत्य नव्हतं. वेस्ट इंडिजविरुद्ध झळकावलेल्या शतकाचा अपवाद वगळता, एकाही सामन्यात त्याला आपल्या खेळीचं शतकात रुपांतर करता आलं नव्हतं.
मात्र अजिंक्यचा मुंबईकर साथीदार रोहित शर्मा यामध्ये भाव खाऊन गेला. श्रीलंकेविरुद्ध वन-डे, कसोटी आणि टी-२० सामन्यांच्या मालिकेत त्याने केलेली कामगिरी आणि विराटच्या अनुपस्थितीत सांभाळलेलं कर्णधारपद या जोरावर आफ्रिकेविरुद्ध पहिल्या दोन कसोटीत त्याची संघात निवड करण्यात आली. मात्र अजिंक्य रहाणेच्या चाहत्यांना आणि काही माजी खेळाडूंना ही बाब रुचली नाही. या घटनेनंतर अनेक माजी खेळाडूंनी आपापलं मतप्रदर्शन करत वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न केला. अजिंक्यच्या चाहत्यांनी तर सोशल मीडियावर रवी शास्त्री आणि विराट कोहली यांना टिकेचं धनी बनवलं.
अवश्य वाचा – इंग्लंडमध्ये धावा काढल्या तरच विराट कोहलीला सर्वोत्तम मानता येईल – मायकल होल्डींग
अवश्य वाचा – संधी द्यायची नव्हती मग अजिंक्य रहाणेला उप-कर्णधार का बनवलंत? – बिशनसिंह बेदी
आपल्यावर होत असलेली टीका पाहून मग विराट कोहली आणि रवी शास्त्री यांनीही अजिंक्यला संघात न घेण्याचा आपला निर्णय कसा योग्य होता याचं स्पष्टीकरण देत, आगीत तेल ओतलं. वास्तविक पाहता कोणत्या खेळाडूला संघात जागा द्यायची हा निर्णय कर्णधार आणि प्रशिक्षक-संघव्यवस्थापनाचा असतो. त्यामुळे निराशाजनक कामगिरीच्या जोरावर जर विराट कोहलीला पहिल्या दोन कसोटीत अजिंक्य रहाणेला संघाबाहेर बसवासं वाटलं तर त्यात गहजब होण्याचं काहीच कारण नव्हतं. मात्र दुर्दैवाने भारतीय क्रिकेटमधल्या एकाही धुरंधर माणसाला ही बाब निट हाताळता आली नाही. त्यामुळे संघनिवडीच्या मुद्द्यावरुन गरज नसताना क्रिकेट चाहत्यांमध्ये दोन गट पडलेले पहायला मिळाले.
अवश्य वाचा – कसोटी संघात अजिंक्यला वगळण्याचा निर्णय योग्यच – रवी शास्त्री
अवश्य वाचा – रहाणेच्या गच्छंतीसाठी आग्रही असणारी माणसं आता त्याचं समर्थन करतायत, विराटचं टीकाकारांना चोख प्रत्युत्तर
डोकं शांत ठेऊन विचार करायला गेलं तर एक बाब नक्की आपल्या लक्षात येईल की अजिंक्य रहाणेच्या २०१७ च्या कामगिरीत सातत्य नव्हतं. अजिंक्यच्या गुणवत्तेबद्दल कोणाच्याही मनात शंका नाही, पुढचे काही वर्ष अजिंक्यचं संघातलं स्थान अबाधित आहे. मात्र कोणत्याही चांगल्या खेळाडूच्या आयुष्यात बॅडपॅच हा येतोच. सचिनही या बॅडपॅचमधून सुटला नाही. अशावेळी अजिंक्यला त्याच्या प्रशिक्षकांनी जवळ घेऊन, त्याची शैली कुठे चुकते आहे का किंवा गरज पडल्यास त्याला काहीकाळासाठी रणजी क्रिकेट खेळून आपलं तंत्र पुन्हा एकदा घोटवून घेण्याचा सल्ला का बरं दिला नसेल?? एक गोष्ट इथे लक्षात आणून द्यावीशी वाटेल की २०१७ च्या हंगामात अजिंक्य मुंबईकडून ठराविक सामन्यांचा अपवाद वगळता रणजी सामने खेळला नव्हता. सुरुवातीच्या काही सामन्यांमध्ये अजिंक्यने आपण रणजी खेळण्यासाठी उपलब्ध नसल्याचं कळवत मुंबई क्रिकेट असोसिएशनमध्ये अनेकांचा रोष पत्करुन घेतला होता.
अवश्य वाचा – अजिंक्य रहाणेच्या ‘या’ निर्णयामुळे निवड समिती नाराज
जसं मी याआधी म्हणालो की अजिंक्यचं भारतीय क्रिकेट संघातलं स्थान हे अबाधित आहे. पुढची काही वर्ष तरी त्याच्या स्थानाला धक्का नाही. एक तंत्रशुद्ध फलंदाज, स्लिपमध्ये भारताचा सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून अजिंक्यने नावारुपाला आलेला आहे. कित्येकांना अजिंक्यमध्ये राहुल द्रविडच्या शैलीचा भास होतो. त्यामुळे अजिंक्यसाठी भारतीय संघाची दारं बंद झालेली नाहीत ही बाब त्याच्या चाहत्यांनी समजावून घ्यायला हवी. पहिल्या दोन कसोटी सामन्यांमध्ये अजिंक्यला स्थान मिळालं नसलं तरीही तिसऱ्या कसोटीत विराटने जनमताच्या रेट्यापुढे म्हणाल किंवा मालिकेत आपली इज्जत वाचवायची आहे म्हणून म्हणा, अजिंक्यला संघात परत घेतलं. यानंतर वन-डे मालिकेसाठी अजिंक्यला चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करण्याची संधी मिळेल असं म्हणतं, त्याचं संघातलं स्थान अजुनही अबाधित आहे याची खात्री दिली. आणि अजिंक्यनेही पहिल्या वन-डे सामन्यात कर्णधार विराट कोहलीसोबत शतकी भागीदारी रचत आपली उपयुक्तता सिद्ध केली आहे.
मात्र या सर्व कालावधीत भारतीय क्रिकेटमधला एक निराशाजनक चेहरा समोर आला. माजी प्रशिक्षक अनिल कुंबळे यांच्या अपमानास्पद राजीनाम्यानंतर अजुनही भारतीय चाहते विराट कोहली आणि रवी शास्त्री या जोडगोळीवर नाराज आहेत. त्यांचा कोणताही निर्णय ते खुल्यादिलाने स्विकारत नाहीत. एखादा सामना हरल्यानंतर सोशल मीडियावर त्यांच्यावर होणारी टीका, अर्वाच्य शब्दांत होणारी शिवीगाळ या सर्व गोष्टी भारतीय क्रिकेट चाहत्यांचा एक वर्ग क्रिकेटपासून दुरावत जात असल्याचं पहायला मिळतंय. ज्या देशात क्रिकेटला धर्माचं रुप दिलं जातं, त्यासाठी हे चित्र नक्कीचं चांगलं नाही. प्रत्येकाला आपला आवडता खेळाडू संघात खेळावा असं वाटतं असतं, यात काहीच चूक नाही. मात्र असं झालं नाही म्हणून इतरांच्या नेतृत्वावर प्रश्न निर्माण करणं कितपत योग्य आहे. क्रिकेटसाठी भारतीय क्रीडारसिक अजुनही आपलं देहभान विसरतात. मात्र अशा पराकोटीच्या प्रेमातून एक वर्ग या खेळापासून दूर झाला तर ती गोष्ट नक्कीच चांगली वाटणार नाही.
- प्रथमेश दीक्षित. – prathmesh.dixit@indianexpress.com