पृथ्वी शॉच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने १९ वर्षाखालील विश्वचषकाच्या अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियावर ८ गडी राखून मात केली. या फेरीत भारताकडून विजयाचा हिरो ठरला. अंतिम फेरीत मनजोत कालराने १०१ धावांची नाबाद शतकी खेळी केली. या खेळीसह मनजोत १९ वर्षाखालील विश्वचषकाच्या अंतिम फेरीत शतक झळकावणारा दुसरा भारतीय फलंदाज ठरला आहे. याआधी दिल्लीच्या उन्मुक्त चंदने हा पराक्रम केला होता. या शतकासह मनजोत कालराला उन्मुक्त चंद, ब्रेट विल्यम्स, स्टिफन पिटर्स आणि जेराड ब्युर्क या खेळाडूंच्या पंक्तीत स्थान मिळालं आहे.

कर्णधार पृथ्वी शॉ सोबत भारतीय डावाची सुरुवात करताना कालराने आक्रमक सुरुवात केली. चौथ्या षटकात ऑस्ट्रेलियाच्या झॅक इव्हान्सच्या गोलंदाजीवर उत्तुंग षटकार ठोकत कालराने आपले मनसुबे स्पष्ट केले. यानंतर मनजोतने सामन्यात मागे वळून पाहिलंच नाही. पृथ्वी शॉ सोबत कालराने पहिल्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली. याचसोबत पृथ्वी शॉ माघारी परतल्यानंतर मनजोतने संयमी खेळी करत भारतीय संघाची पडझड होऊ दिली नाही. त्याच्या या खेळीचं भारतीय संघातील खेळाडूंनीही तोंडभरुन कौतुक केलं आहे.

सामना जिंकल्यानंतर मनजोतने प्रशिक्षक राहुल द्रविडसह सर्व सहकाऱ्यांचे आभार मानले. फलंदाजीसाठी ही खेळपट्टी चांगली होती त्यामुळे लक्ष्याचा पाठलाग करत असताना फारसा त्रास जाणवला नाही, असंही मनजोत म्हणाला.

Story img Loader