न्यूझीलंडमध्ये सुरु असलेल्या १९ वर्षाखालील विश्वचषक स्पर्धेत भारताने ऑस्ट्रेलियावर ८ गडी राखून मात केली. या विजयासह U-19 विश्वचषक चौथ्यांदा जिंकणारा भारत हा एकमेव देश ठरला आहे. अंतिम फेरीत भारताचा डावखुरा सलामीवीर मनजोत कालराने शतकी खेळी करत संघाच्या विजयात मोलाचं योगदान दिलं. भारतीय संघाने केलेल्या अष्टपैलू खेळासमोर ऑस्ट्रेलियाचा संघ तग धरुच शकला नाही.

या खेळाच्या जोरावर भारतीय संघाने अंतिम सामन्यात तब्बल १० विक्रमांची नोंद केली आहे.

१ – अंतिम सामन्यात २ बळी घेत अनुकूल रॉय विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक बळी घेणाऱ्यांच्या यादीत संयुक्तरित्या पहिल्या क्रमांकावर आलेला आहे. सर्वाधिक बळी घेणाऱ्यांच्या यादीत अनुकूल रॉय हा एकटा भारतीय खेळाडू आहे. अनुकूलने या स्पर्धेत १४ बळी मिळवले आहेत.

१ – अर्धशतक व्हायच्या आत बाद होण्याची या स्पर्धेतली शुभमन गिलची ही पहिलीच वेळ ठरली.

४ – आजच्या विजयासह भारत U-19 विश्वचषक सर्वाधिक वेळा जिंकणाऱ्यांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर पोहचला आहे. भारताने आतापर्यंत ४ वेळा १९ वर्षाखालील विश्वचषत स्पर्धा जिंकली आहे. तर ऑस्ट्रेलियाने आतापर्यंत ३ वेळा हा बहुमान पटकावला आहे.

५ – U-19 विश्वचषकाच्या आतापर्यंतच्या इतिहासात भारत आणि ऑस्ट्रेलिया ५ वेळा समोरासमोर आले आहेत. यापैकी भारताने पाचही सामने जिंकले आहेत.

१५ – U-19 क्रिकेटमध्ये गेल्या १७ वन-डे सामन्यांपैकी १५ सामने भारतीय संघ जिंकला आहे.

१८ – १९ वर्षाखालील विश्वचषक जिंकणारा पृथ्वी शॉ हा सर्वात तरुण कर्णधार ठरला आहे. याआधी ऑस्ट्रेलियाच्या मिचेल स्टार्कच्या नावावर हा विक्रम जमा होता.

१०० – विजयाच्या बाबतीत पृथ्वी शॉची यंदाच्या विश्वचषकात सरासरी १०० टक्के राहिलेली आहे. यासह पृथ्वीने भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे.

१२४ –
संपूर्ण स्पर्धेत शुभमन गिलने १२४ च्या सरासरीने धावा काढल्या. यात ६ सामन्यांमध्ये एक शतक आणि ३ अर्धशतकांचा समावेश आहे.

२६१ – कर्णधार या नात्याने १९ वर्षाखालील विश्वचषकात सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत पृथ्वी शॉ अव्वल स्थानी पोहचला आहे. पृथ्वीने उन्मुक्त चंद आणि विराट कोहली यांचा विक्रम मोडीत काढला आहे.

३७२ – २०१८ सालच्या १९ वर्षाखालील विश्वचषकाच्या स्पर्धेत शुभमन गिलची ३७२ धावांची खेळी ही भारतासाठी दुसरी खेळी ठरली आहे. याआधी शिखर धवनने ५०५ धावा काढून अव्वल स्थान पटकावलं होतं.