वेस्ट इंडिजमध्ये खेळला जाणारा अंडर १९ वर्ल्डकप आता शेवटच्या टप्प्यात पोहोचला आहे. उपांत्य फेरी गाठणारा भारत हा चौथा संघ ठरला. उपांत्यपूर्व फेरीत भारताने बांगलादेशचा ५ गडी राखून पराभव केला. भारताने विक्रमी दहाव्यांदा उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. भारताव्यतिरिक्त इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तानचे संघही उपांत्य फेरीत पोहोचले आहेत.
भारतासाठी १९ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेतील बांगलादेशविरुद्धचा उपांत्यपूर्व फेरीचा सामनाही महत्त्वाचा होता. कारण दोन वर्षांपूर्वी बांगलादेशनेच भारताचे १९ वर्षांखालील विश्वविजेतेपदाचे स्वप्न धूळीस मिळवले होते. आता उपांत्यपूर्व फेरीत भारताने बांगलादेशचा पराभव करून त्या पराभवाचा हिशेब चुकता केला आहे.
भारताव्यतिरिक्त ऑस्ट्रेलियाने उपांत्यपूर्व फेरीत पाकिस्तानचा पराभव केला. तर इंग्लंडने दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला. सर्वात धक्कादायक कामगिरी अफगाणिस्तानची होती. त्यांनी श्रीलंकेचा पराभव करून उपांत्य फेरीचे तिकीट मिळवले.
हेही वाचा – IND vs BAN U19 WC : गतविजेत्या बांगलादेशला पराभूत करत भारत सेमीफायनलमध्ये, २०२० चा ‘तो’ बदलाही घेतला
कधी होणार सेमीफायनल?
आता २ फेब्रुवारीला अँटिग्वा येथे होणाऱ्या दुसऱ्या उपांत्य फेरीत भारताचा सामना ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. या दोन संघांपैकी जो संघ जिंकेल, तो चॅम्पियन होण्याचा प्रबळ दावेदार असेल. भारतासाठी चांगली गोष्ट म्हणजे त्यांनी स्पर्धा सुरू होण्यापूर्वी सराव सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव केला. अशा परिस्थितीत भारतीय अंडर-१९ संघाचे मनोबल उंचावलेले असेल. पहिला सेमीफायनल सामना इंग्लंड आणि अफगाणिस्तान यांच्यात १ फेब्रुवारीला होणार आहे.