१४ जानेवारीपासून वेस्ट इंडिजच्या मैदानावर आयसीसी अंडर-१९ वर्ल्डकपला सुरुवात होत आहे. या विश्वचषकाचे सराव सामने आता खेळले जात आहेत आणि जवळपास सर्व संघ या स्पर्धेसाठी वेस्ट इंडिजला पोहोचले आहेत. मात्र अफगाणिस्तान क्रिकेट संघाला या विश्वचषकात सहभागी होणे कठीण जात आहे, कारण तालिबानशासित देशाच्या खेळाडूंनी स्पर्धेत सहभागी होण्यासाठी अद्याप व्हिसा घेतलेला नाही. अफगाण संघ अद्याप कॅरेबियन देशात पोहोचलेला नाही, त्यामुळे आयसीसीला सोमवारी इंग्लंडविरुद्धचे आणि १२ जानेवारीला यूएईविरुद्धचे सराव सामने रद्द करावे लागले.
अफगाणिस्तानला १६ जानेवारीला झिम्बाब्वेविरुद्ध स्पर्धेतील पहिला सामना खेळायचा आहे. आयसीसीने एका निवेदनात म्हटले आहे, की व्हिसा मिळण्यास उशीर झाल्यामुळे अफगाणिस्तान संघ अद्याप वेस्ट इंडिजला पोहोचलेला नाही. या प्रकरणावर तोडगा काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
आयसीसीने मात्र व्हिसा मिळण्यात येणाऱ्या अडचणींचे कारण स्पष्ट केले नाही. आयसीसी स्पर्धेचे प्रमुख ख्रिस टेटली म्हणाले, ”बहुतेक लोकांना वेस्ट इंडिजला भेट देण्यासाठी यूएस ट्रान्झिट व्हिसाची आवश्यकता असते. अफगाणिस्तानात तालिबानची सत्ता आल्यानंतर तेथून आंतरराष्ट्रीय प्रवास कठीण झाला आहे. आम्ही सराव सामन्यांचे वेळापत्रक बदलले आहे जेणेकरून संघ तयारी करू शकतील.”
या वर्ल्डकपमध्ये अफगाणिस्तान संघाचा ग्रुप सी मध्ये समावेश आहे. त्यामध्ये अफगाणिस्तान, झिम्बाब्वे, पाकिस्तान आणि पापुआ न्यू गिनी हे संघ आहेत.
हेही वाचा – NZ vs BAN : जबरदस्त..! न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्टचे कसोटीत ‘त्रिशतक’
अफगाणिस्तानची सत्ता तालिबानकडे आल्यापासून हा देश संकटात सापडला आहे. त्याचा परिणाम देशातील क्रिकेटवरही झाला आहे. तालिबानच्या आगमनानंतर अफगाणिस्तानच्या वरिष्ठ संघाचा मुख्य खेळाडू राशिद खान याने ट्विटरवर संपूर्ण जगाला आपला देश वाचवण्याचे जाहीर आवाहन केले होते. तालिबानने अफगाणिस्तानच्या महिला क्रिकेट खेळण्यावरही बंदी घातली होती.