अंडर १९ वर्ल्डकपमध्ये अफगाणिस्तानने चमकदार कामगिरी करत सेमी फायनलमध्ये धडक दिली. अफगाणिस्तानने यजमान न्यूझीलंडवर २०२ धावांनी दणदणीत विजय मिळवत दिमाखात सेमी फायनलमध्ये प्रवेश केला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अंडर १९ वर्ल्डकपमध्ये गुरुवारी यजमान न्यूझीलंड विरुद्ध अफगाणिस्तान असा सामना रंगला. या सामन्यात घरच्या मैदानात खेळणाऱ्या न्यूझीलंडचे पारडे जड मानले जात होते. मात्र, अफगाणिस्तानने मैदानात आपल्या कामगिरीने यजमानांसह सर्वांनाच धक्का दिला.अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. अफगाणिस्तानच्या फलंदाजांनी न्यूझीलंडच्या गोलंदाजांची अक्षरश: धुलाईच केली. सलामीवीर रहमानुल्लाह गुरबाज आणि इब्राहिम झरदान या दोघांनी २० षटकांत ११७ धावांची सलामी देत संघाला दमदार सुरुवात करुन दिली. रहमानुल्लाहने ६७ चेंडूंमध्ये ६९ धावा केल्या. तर झरदानने ९८ चेंडूत ६८ धावा केल्या. यानंतर अफगाणिस्तानचे दोन फलंदाज लागोपाठ बाद झाले. चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेल्या बाहिर शाहने संघाचा डाव सावरला. ४४ व्या षटकात अफगाणिस्तानची धावसंख्या ५ बाद २२६ होती. मात्र, यानंतर बाहिरने अझमतुल्लाह ओमरझाईच्या मदतीने सहा षटकांत ७९ धावांची बरसात करत संघाला ३०० पल्ला ओलांडून दिला. ओमरझईने २३ चेंडूत ६६ धावा चोपल्या. अफगाणिस्तानने ५० षटकांत ६ विकेटच्या मोबदल्यात ३०९ धावा केल्या.

फलंदाजीसाठी मैदानात उतरलेल्या न्यूझीलंडची सुरुवात अडखळती झाली. सलामीवीर आर. रविंद्र दुसऱ्याच षटकात धावबाद झाला. त्यांचे आघाडीचे चार फलंदाज अवघ्या २० धावांवर माघारी परतले. यानंतर कॅटन क्लार्कने ३८ धावांची आणि डेल फिलिप्सने ३१ धावांची खेळी करत संघाचा डाव सावरला. या दोघांचा अपवाद वगळता न्यूझीलंडचा एकही फलंदाज खेळपट्टीवर तग धरु शकला नाही. न्यूझीलंडचा डाव १०७ धावांमध्येच आटोपला. अफगाणिस्तानतर्फे मुजीब आणि अहमद यांनी प्रत्येकी चार विकेट घेत किवींना दणका दिला.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Icc under 19 world cup afghanistan create history beat host new zealand enter semi final azmatullah omarzai