संजू सॅमसन आणि कुलदीप यादव यांच्या प्रेक्षणीय कामगिरीच्या बळावर भारताने दुबळ्या पपूआ न्यू गुनिआवर २४५ धावांनी दणदणीत विजय मिळवला आणि युवा (१९ वर्षांखालील) विश्वचषक क्रिकेट स्पध्रेत आपली विजयी मालिका कायम राखली.
शारजा क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या साखळीमधील अखेरच्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना गतविजेत्या भारताने ६ बाद ३०१ धावा उभारल्या. त्यानंतर पपूआ न्यू गुनिआचा डाव २८.२ षटकांत फक्त ५६ धावांत गुंडाळला. या विजयामुळे भारताने गटात अव्वल स्थान राखले आहे.
आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सॅमसनने चौखूर फलंदाजीचे प्रदर्शन करीत क्रिकेटरसिकांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. त्याने ४८ चेंडूंत ८ चौकार आणि ४ षटकारांसह ८५ धावांची लाजवाब खेळी साकारली. भारताला अंकुश बेन्स (५९) आणि अखिल हेरवाडकर (३७) यांनी १२ षटकांत ५८ धावांची सलामी नोंदवून दिली. कर्णधार विजय झोलने ३५ धावांचे योगदान दिले. परंतु सॅमसन येताच भारताच्या धावांचा वेग वाढला. त्याला श्रेयस अय्यरने छान साथ दिली. सॅमसन आणि अय्यर यांनी चौथ्या विकेटसाठी १२.४ षटकांत ११६ धावांची भागीदारी रचली. अखेरच्या हाणामारीच्या षटकांमध्ये सर्फराझ खानने १९ चेंडूंत ३ चौकार आणि एका षटकारानिशी नाबाद ३४ धावा केल्या.
त्यानंतर डावखुरा फिरकी गोलंदाज यादवने ८.२ षटकांत फक्त १० धावांत ४ बळी घेण्याची किमया साधली, तर मध्यमगती गोलंदाज मोनू कुमारने ६ षटकांत १३ धावांत ३ बळी घेतले. ऑफ-स्पिनर दीपक हुडाने ५ षटकांत ५ धावांत २ बळी घेतले.