१९ वर्षांखालील आशिया चषक जिंकणाऱ्या संघाचा कर्णधार विजय झोल हाच आगामी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारताचे नेतृत्व करणार आहे. ही स्पर्धा फेब्रुवारी महिन्यात संयुक्त अरब अमिरातीमध्ये आयोजित केली जाणार आहे.
झोल याच्याच नेतृत्वाखाली भारताने गतवेळी १९ वर्षांखालील गटाची विश्वचषक स्पर्धा जिंकली होती. त्यानेच आशिया चषक जिंकून दिल्यामुळे पुन्हा त्याच्यावरच निवड समितीने विश्वास टाकला आहे. निवड समितीची येथे बैठक झाली. त्यांनी भारताच्या पंधरा खेळाडूंची निवड जाहीर केली. तीन वेळा विश्वचषक जिंकणाऱ्या भारतास यंदा साखळी गटात पाकिस्तान, स्कॉटलंड व पापुआ न्यू गिनी यांच्याबरोबर खेळावे लागणार आहे. आशिया चषकाच्या अंतिम लढतीत भारताने पाकिस्तानला हरविले होते. विश्वचषक स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात १५ फेब्रुवारी रोजी भारत व पाकिस्तान हे एकमेकांशी खेळणार आहेत. झोल याने नुकत्याच झालेल्या रणजी स्पर्धेत महाराष्ट्रास मुंबईविरुद्ध विजय मिळवून देण्यात मोठा वाटा उचलला होता.
भारतीय संघ-विजय झोल (कर्णधार), अखिल हेरवाडकर, अंकुश बेन्स, रिकी भुई, संजू सॅमसन, श्रेयस अय्यर, सर्फराझ खान, दीपक हुडा, कुलदीप यादव, अमिर गनी, करण काईल, सी.व्ही.मिलिंद, अवीश खान, मोनूकुमारसिंग, अजित सेठ.